Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

भारताची पराभवाची हॅट्ट्रीक
दक्षिण आफ्रिकेने १२ धावांनी नमविले
नॉटिंगहॅम, १७ जून/ पीटीआय

 

‘सुपर एट’ फेरीतील शेवटचा सामना जिंकून ऊरली सुरलेली लाज वाचविण्यात भारतीय संघाला सपशेल अपयश आले आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात भारताला १२ धावांनी पराभव पत्करावा लागला. हा सामना गमाविल्याने गतविजेत्यांनी यंदाच्या विश्वचषकात पराभवाची हॅट्ट्रीक साधली आहे.
इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाला १५३ धावांचे आव्हान गाठता आले नव्हते, पण या सामन्यात तर त्यांना विजयासाठी आवश्यक असलेल्या १३१ धावांचे माफक आव्हानही पेलता आले नाही. भारताचा श्वास ११८ धावापर्यंतच चालला.
यावेळी भारताची गोलंदाजी चांगली झाली. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना बांधून ठेवण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले आणि त्यामुळेच त्यांना २० षटकांमध्ये १३० धावा करता आल्या. यावेळी धोनीने चक्क आठ गोलंदाज वापरले. दक्षिण आफ्रिकेचा ए. बी.डी‘व्हिलिअर्सचा (६३) चा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही.
धावांचा पाठलाग करताना भारताच्या सालामीवीरांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. ‘सुपर एट’ मध्ये फ्लॉप ठरत असलेल्या रोहित शर्माने यावेळी २९ तर गौतम गंभीरने २१ धावा फटकाविल्या.
गंभीर आणि रोहित यांनी डेल स्टेन, वेन पार्नेल आणि अ‍ॅल्बी मॉर्केल या वेगवान गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. भारताने बिनबाद ४८ धावा जमविल्यावर कर्णधार गॅ्रमी स्मिथने फिरकीपटू जोहान बोथाच्या हाती चेंडू सोपवला आणि भारतीय संघाच्या तोंडून दक्षिण आफ्रिकेने घास हिरावून घेतला. बोथाने गंभीरला बाद करीत संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर लगेचच सुरेश रैनालाही (३) तंबूत धाडत भारताला दुहेरी धक्के दिले. त्यानंतर जे. पी. डय़ुमिनीने रोहितला बाद केल्याने भारताचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. बोथा आणि डय़ुमिनीच्या अचूक माऱ्यामुळे बिनबाद ४८ असलेल्या भारताची अवस्था ५ बाद ६९ अशी झाली. रोहितनंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (५) तर आत्महत्या केली. चेंडू यष्टीरक्षकाकडे गेलेला असताना युवराज सिंगने धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. पण धोनी युवराजच्या दिशेन धावत गेला आणि धावचीत होऊन बसला. आक्रमक वाटणाऱ्या युसूफ पठाणचा अडसर यावेळी व्हॅन डर मव्‍‌र्हने दूर केला.