Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

दक्षिण आफ्रिकेपुढे पाकिस्तानचे आव्हान
आज रंगणार पहिला उपान्त्य सामना
नॉटिंगहॅम, १७ जून/ पीटीआय

 

ट्वेन्टी-२० विश्वचषकामध्ये एकही सामना न गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघापुढे उद्या होणाऱ्या पहिल्या उपान्त्य फेरीत आव्हान असेल ते गेल्यावेळी अंतिम फेरीत मजल मारलेल्या पाकिस्तानचे. दोन्हीही संघांचा विचार केल्यास दक्षिण आफ्रिकेचे पारडे पाकिस्तान पेक्षा जड आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने यंदाच्या विश्वचषकातील एकही सामना गमावलेला नसून सलग पाच सामन्यांमध्ये त्यांनी विजय साकारलेला आहे. पण ऐनवेळी कच खाणारा संघ असा या संघाचा पूर्व इतिहास आहे. बाद फेरीत पोहोचल्यावर पराभूत होणे हे दक्षिण आफ्रिकेच्या पाचवीलाच पुजलेले आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हीही आघाडय़ांवर दक्षिण आफ्रिकेचा संघ चांगली कामगिरी करत आहे. फलंदाजीत जॅक कॅलिस, ग्रॅमी स्मिथ, हर्शेल गिब्ज आणि ए. बी. डी‘व्हिलिअर्स चांगल्या फॉर्मात आहेत. तर न्यूझीलंड आणि भारताविरूद्धच्या सामन्यात फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर गोलंदाजांनी संघाला सामनाजिंकवून दिलेला आहे. गोलंदाजीमध्ये डेल स्टेन, वेन पार्नेल, जोहान बोथा आणि व्हॅन डर मव्‍‌र्ह चांगल्या फॉर्मात आहेत. तर क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत त्यांचा हात कोणीही धरू शकू नाहीत.
पाकिस्तानच्या गोलंदाजीला चांगलीच धार आहे. उमर गुल चांगल्या फॉर्मात आहे. तर त्याला सुयोग्य साथ लाभत आहे ती आयसीएलमधून संघात पुनरागमन करणाऱ्या अब्दुल रझ्झाकची. शाहिद आफ्रिदी आणि सइद अजमल हे फिरकी गोलंदाज संघाला सातत्याने यश मिळवून देत आहेत. फलंदाजीमध्ये मात्र पाकिस्तानची चांगली कामगिरी होताना दिसत नाही. एखादा फलंदाज सामन्यात चालतो, पण त्या एकटय़ाच्या जोरावर त्यांना मोठी धावसंख्या उभारता येत नाही. त्यांना सामना जिंकायचा असेल तर त्यांचे दोन ते तीन फलंदाज चांगले खेळायला हवेत. कामरान अकमल फॉर्मात असला तरी युनूस खान आणि शोएब मलिक या अनुभवी फलंदाजांनी जबाबदारीने खेळ करायला हवा.