Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

फलंदाजी व सांघिक कामगिरीतील अपयशानेच पराभूत - धोनी
नॉटिंगहॅम, १७ जून/पीटीआय

 

ट्वेन्टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाची धक्कादायक हार होण्यामागे आय.पी.एल. स्पर्धा भारतीय खेळाडूंना आलेला थकवा कारणीभूत असल्याचे प्रशिक्षक कर्स्टन यांनी म्हटले असले तरी कर्णधार धोनी मात्र त्यांच्या या मताशी सहमत नाही. आपले काही खेळाडू १०० टक्के फिट नव्हते हे मात्र त्याने मान्य केले आहे. इंग्लंडमध्ये आम्ही पूर्ण जोशात नव्हतो हे खरे आहे. कारण जानेवारीपासून आम्ही सातत्याने बाहेरच आहोत. या स्पर्धेत काही खेळाडू दुखापती घेऊनच येथे आले होते. आयपीएल दरम्यान त्यांना दुखापती झाल्या होत्या व त्यातून सावरण्यासाठी पुरेसा वेळही मिळाला नव्हता. संघातील फारच थोडे खेळाडू शंभर टक्के तंदुरुस्त होते. काहींना पायाच्या घोटय़ाची तर काहींना खांद्याची दुखापत झाली होती आणि त्यामुळेच क्षेत्ररक्षणात आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू शकलो नव्हतो. मात्र पराभवासाठी थकवा हे कारण नसल्याचे धोनी ठामपणे सांगितले.
धोनी पुढे म्हणतो, गेल्यावेळी थकव्याच्या कारणामुळेच मी श्रीलंका दौऱ्यावर न जाता ब्रेक घेणे पसंत केले होते; पण यावेळी मात्र तशी परिस्थिती नव्हती. सांघिक कामगिरीतील अपयशामुळे स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले असले तरी त्यातही फलंदाजीतील अपयश अधिक निराशाजनक होते. ८० टक्क्यांपर्यंत संघाची एकत्रित कामगिरी पाहण्याची आम्हाला सवय लागली होती; पण या स्पर्धेत आम्ही ६० टक्केही सांघिक कामगिरी करू शकलो नाही. फलंदाजी हे आमचे बलस्थान; पण आपल्यासह प्रमुख खेळाडूंचा फलंदाजीतील सूर हरविण्याने संपूर्ण स्पर्धेत आमची फलंदाजी लडखडताना दिसली. गोलंदाजीतही तीन गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना अन्य गोलंदाज भरकटायचे, असे धोनी म्हणाला.