Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

क्रिकेटप्रेमींनी जबाबदारीने वागावे
सचिन तेंडुलकर नाराज
लंडन, १७ जून/ पीटीआय

 

ट्वेन्टी-२० विश्वचषकातून गतविजेता भारतीय संघ झटपट बाहेर पडल्यानंतर भारतातील प्रेक्षकांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहता मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर नाराज झाला आहे. भारतीय प्रेक्षकांनी जबाबदारीने आणि योग्य तो समतोल राखून प्रतिक्रीया द्यावी असे मत त्याने यावेळी व्यक्त केले आहे.
भारताला विजेतेपद कायम राखता आले नसले तरी क्रिकेटप्रेमींनी जबादारींनी प्रतिक्रिया द्यायला हवी. अशा वेळी प्रेक्षकांनी त्यांना समजून घेऊन त्यांच्या पाठीशी राहायला हवे, असे सचिनने यावेळी सांगितले. तो पुढे म्हणाला की, जे काही घडले ते कोणीही बदलू शकणार नाही. चुकांमधूनच खेळाडू शिकत असतात आणि यावेळीही ते नक्कीच काहीतरी शिकले असतील. जर आपण त्यांना समजून घेतले तर ते सर्वासाठी फायद्याचे ठरेल. सचिन लंडनला त्याच्या कुटुंबासमवेत संघाला प्रोत्साहीत करण्यासाठी आला होता. पण भारतीय संघ उपान्त्य फेरीतही न पोहोचू शकल्याने भारतीय प्रेक्षकांसह तोसुद्धा नाराज आहे. या पराभवामुळे प्रेक्षकांनी धोनीच्या नेत्तृत्वावर ताशेरे ओढले आहेत. धोनीने या पराभवानंतर देशवासियांची माफी मागितलेली असली तर त्याच्या रांची या शहरात लोकांनी त्याच्याविरूद्ध नारेबाजी केली आणि त्याच्या प्रतिमेला चप्पलांचा हार घातला. या सर्व प्रकारावर सचिन नाराज झालेला आहे. सचिन यावेळी म्हणाला की, मी देशवासियांच्या भावना समजू शकतो आणि त्यांचा आदरही करतो. पण त्यांनीही योग्य तो समतोल राखून प्रतिक्रिया द्यायला हवी जेणेकरून कोणीही दुखावणार नाही. देशवासियांबरोबरच मी देखील नाराज झालो आहे. पण मला विश्वास आहे की, आगामी मालिकेमध्ये भारतीय संघ या गोष्टींतून धडा घेऊन संघाला गतवैभव परत मिळवून देईल. पण यावेळी त्यांना गरज आहे ती देशवासियांच्या पाठिंब्याची, असे आवाहन त्याने देशवासियांना केले आहे.