Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

अभिषेक नायरने दिले आयपीएलला श्रेय
मुंबई, १७ जून / क्री. प्र.

 

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळालेल्या मुंबईच्या अभिषेक नायरने आपल्याला ही संधी इंडियन प्रीमियर लीगमधील कामगिरीमुळे मिळाल्याचे म्हटले आहे.नायर म्हणाला की, ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी माझा भारतीय संघात समावेश होईल, अशी मला अपेक्षा होती. पण दुर्दैवाने ती संधी मला मिळाली नाही. मी निराश झालो. पण आता मात्र माझी निवड झाल्याने आनंद झाला.
आयपीएलमधील कामगिरीबाबत नायरने सांगितले की, जगातील अव्वल खेळाडूंसह खेळण्याची संधी मिळाल्यामुळे अनुभवात मोलाची भर पडली. सचिन तेंडुलकरसारख्या खेळाडूकडून वेळोवेळी बहुमूल्य सल्लाही मिळाला.
डावखुरा फलंदाज व वेगवान मध्यमगती गोलंदाज असलेल्या नायरने सांगितले की, नैसर्गिक खेळाकडे लक्ष दे. तुझ्यातील विश्वासाला तडा जाईल, असा खेळ करू नको.
सचिनचा हाच सल्ला लक्षात ठेवून केलेल्या फलंदाजीमुळे नायरने इंडियन प्रीमियर लीगमध्ये तडाखेबंद कामगिरी केली.
भारतीय ‘अ’ संघातून खेळल्याचाही आपल्याला फायदा झाल्याचे तो म्हणाला.
यावेळी शॉन टेटसारख्या खेळाडूशी अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाल्याचे त्याने सांगितले.