Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

इंडोनेशियन बॅडमिंटन : भारताला संमिश्र यश
सायना नेहवाल व अदिती मुटाटकर यांची आगेकूच तर अरविंद भट्ट व आनंद पवार पराभूत
नवी दिल्ली, १७ जून/पीटीआय

 

भारताच्या सायना नेहवाल व अदिती मुटाटकर यांनी इंडोनेशियन खुल्या बॅडिमटन स्पर्धेत आगेकूच राखली, मात्र अरविंद भट्ट व आनंद पवार यांना पुरुष गटात पराभूत व्हावे लागले.सहाव्या मानांकित सायनाने बल्गेरियाच्या पेत्या नेदेलचेवा हिचा २१-१८, २१-१२ असा ३० मिनिटांच्या लढतीनंतर पराभव केला. तिने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा सुरेख खेळ केला, तसेच तिने सव्‍‌र्हिसवरही चांगले नियंत्रण राखले होते.
मुटाटकर हिला मात्र निकोली ग्रेथर हिच्यावर मात करताना संघर्षपूर्ण लढत द्यावी लागली. तिने चुरशीचा हा सामना २१-१९, १९-२१, २१-७ असा जिंकला. हा सामना ५१ मिनिटे चालला होता.
पुरुष गटात भट्ट याला चीन तैपेईच्या युहिसिंग हिसेहा याच्याकडून पराभव पत्करावा लागला. ३० मिनिटे चाललेल्या या लढतीत हिसेहाने २२-२०, २१-१२ असा जिंकला. पवार याने इंडोनेशियाच्या सोनी देईवु कुन्कोरो याला चिवट लढत दिली. हा सामना कुन्कोरोने २१-१५, १३-२१, २१-१८ असा घेता आगेकूच राखली.
महिलांच्या दुहेरीत ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांनी शानदार सुरुवात केली. प्रथमच दुहेरीत एकत्र खेळणाऱ्या या जोडीने अमेरिकेच्या मोना सान्तोसो व सिथिंया तुवानकोट्टा यांचा रंगतदार लढतीनंतर पराभव केला. हा सामना त्यांनी २१-१९, २१-२३, २१-१६ असा जिंकला.