Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बुलढाणा जिल्हा न्यायालयाचा १७ जुलैला शताब्दी महोत्सव
राष्ट्रपती उपस्थित राहणार
बुलढाणा, १७ जून / प्रतिनिधी

बुलढाणा जिल्हा न्यायालय व बार असोशिएशनला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येत्या १७ जुलै

 

रोजी येथे शताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला असून या सोहोळ्यास राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंग पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती बुलढाणा बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय सावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुलढाणा बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय सावळे यांच्या नेतृत्वाखाली वकिलांच्या एका शिष्टमंडळाने दिल्ली येथे जाऊन राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती डॉ. प्रतिभाताई पाटील व त्यांचे पती डॉ. देवीसिंग शेखावत यांची नुकतीच भेट घेतली. बुलढाणा जिल्हा न्यायालय व बार असोशिएशनच्या शताब्दी महोत्सवाचे निमंत्रण दिले. राष्ट्रपतींनी निमंत्रणाचा स्वीकार करत तातडीने तारीख देण्याचे मान्य केले. त्यानुसार येत्या १७ जुलै रोजी राष्ट्रपती बुलढाणा दौऱ्यावर येणार असल्याचे राष्ट्रपती भवनातर्फे राज्यपाल व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.
जिल्हा न्यायालय व बार असोशिएशनचा शताब्दी सोहोळा जिल्हा न्यायालय परिसरात १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होईल. त्यानंतर नजीकच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये राज्य वकील परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती करतील. या शताब्दी सोहोळ्याला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक, केंद्रीय कायदा मंत्री विरप्पा मोईली, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश के.जी. बालकृष्णन, न्यायमूर्ती विलास शिरपुरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार, भूषण धर्माधिकारी, महाराष्ट्राचे राज्यपाल जमीर, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्राचे विधि व न्यायमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव उपस्थित राहणार आहेत.
स्वातंत्र्यानंतर देशाच्या राष्ट्रपती बुलढाण्याला प्रथमच येत आहे. बुलढाणा शहर व जिल्ह्य़ासाठी ही अभिमानाची बाब आहे, असे अ‍ॅड. सावळे यांनी सांगितले.
शताब्दी महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. सावळे यांनी दिली. पत्रकार परिषदेला अ‍ॅड. दत्ता चव्हाण, अ‍ॅड. लहाने, अ‍ॅड. मनोज चोरडीया, अ‍ॅड. अमोल बल्लाळ, अ‍ॅड. केसाळे उपस्थित होते.