Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नगराध्यक्षांची निवडणूक
यवतमाळ जिल्ह्य़ात चार पालिका अपक्षांकडे, दोन राष्ट्रवादी काँग्रेसकडे
यवतमाळ, १७ जून / वार्ताहर

यवतमाळ जिल्ह्य़ातील सहा पालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुका बुधवारी पार पडल्या असून

 

त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, अपक्ष दोन, विकास आघाडी एक, परिवर्तन पॅनेल एक अशी स्थिती असून घाटंजी पालिकेच्या निवडणुकीला स्थगनादेश आहे.
यवतमाळच्या नगराध्यक्षपदी भाजप समर्थित अपक्ष उमेदवार निर्मला हातागडे या बिनविरोध निवडून आल्या. दिग्रस पालिकेच्या अध्यक्षपदी अपक्ष आमदार संजय देशमुख यांच्या परिवर्तन पॅनेलचे श्याम पाटील हेही बिनविरोध निवडून आले. घाटंजी पालिकेत वत्सला धुर्वे यांचा एकमेव अर्ज होता त्यामुळे त्याच नगराध्यक्ष होणार हे स्पष्ट झाले पण, उच्च न्यायालयाच्या स्थगनादेशामुळे त्यांची निवड जाहीर होऊ शकली नाही.
पुसद, उमरखेड, दारव्हा आणि वणी या चार पालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुका फारच चुरशीच्या झाल्या, पुसद पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा गंधेवार यांनी काँग्रेसच्या नाजमा बी यांचा १७ विरुद्ध आठ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पालकमंत्री मनोहर नाईक यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पुसद पालिकेत राष्ट्रवादीचे १२ नगरसेवक असताना राष्ट्रवादीने १७ मते मिळवून काँग्रेसवर मात केली आणि नाईकांनी वर्चस्व सिद्ध केले.
दारव्ह्य़ात झालेली निवडणूक ऐतिहासिक ठरली कारण या निवडणुकीत चौघे उमेदवार होते पैकी दोघांनी स्वत:लाही मतदान केले नसल्याने त्यांना शून्य मते मिळाली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विद्यमान नगराध्यक्ष हरिभाऊ गुल्हाने यांना सेनेचे आमदार संजय राठोड यांचे समर्थन होते. त्यामुळे हरिभाऊ गुल्हाने यांनी बाजी मारली. त्यांनी अपक्ष सुभाष दुधे यांचा आठ विरुद्ध सात मतांनी पराभव केला. आमदार संजय राठोड मतमोजणीच्या वेळी हजर होते.
उमरखेडमध्ये काँग्रेसच्या सहकार्याने शहर विकास आघाडीचे राजू जयस्वाल विजयी झाले. त्यांनी उमरखेड विकास आघाडीचे व माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर (राष्ट्रवादी काँग्रेस) समर्थित उमेदवार माजी नगराध्यक्ष बाबा जागीरदार यांचा १३ विरुद्ध सात मतांनी पराभव केला.
वणी पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता हस्तगत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यादव सातपुते यांनी सेनेच्या घनश्याम पडोळे यांचा १४ विरुद्ध १० मतांनी पराभव केला. वणी पालिकेत सेना आमदार विश्वास नांदेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संजय देरकार यांच्यात ‘शक्ती परीक्षा’ होती. त्यात संजय देरकार यांनी बाजी मारली. मतमोजणीच्या वेळी सेना आमदार विश्वास नांदेकर हजर नव्हते.
‘डमी’ सातपुतेंना निवडून येण्याची ‘हमी’
वणी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण ढोके यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर ‘डमी’ उमेदवार म्हणून यादव सातपुते यांनी अर्ज दाखल केला.
छाननीत अधिकृत असलेले प्रवीण ढोके यांचा अर्ज अवैध ठरला. त्यांनी आयुक्तांकडे अपील केले, तेही फेटाळल्या गेले. ‘डमी’ असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यादव सातपुते नगराध्यक्षपदी निवडून आले. त्यांनी सेनेच्या घनश्याम पडोळे यांचा १४ विरुद्ध १० मतांनी पराभव केला. यालाच म्हणतात एखाद्याचं नशीब, दुसरे काय? ‘डमी’ निवडून येण्याची ‘हमी’ स्वत: यादव सातपुते यांना होती की नाही हे मात्र समजले नाही.
दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ
नगराध्यक्षपदांचे आरक्षण आणि अडीच वर्षांचा मर्यादित कार्यकाल यामुळे एकदा नगराध्यक्षपद भूषवलेल्या व्यक्तीला पुन्हा नगराध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळणे जवळ जवळ अशक्य झाले असताना दारव्ह्य़ात मात्र विद्यमान नगराध्यक्ष हरिभाऊ गुल्हाने (अपक्ष) यांनी दुसऱ्यांदा नगराध्यक्षपद पटकावले आहे.
दारव्ह्य़ात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना शह देण्यात सेना आमदार संजय राठोड एकही संधी सोडत नाही. चार वेळा आमदार व दोनदा मंत्री राहिलेल्या माणिकराव ठाकरेंचा २००४ च्या निवडणुकीत सेनेच्या संजय राठोड यांनी पराभव केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही ‘दारव्हा-दिग्रस’ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या हरिभाऊ राठोडपेक्षा सेनेच्या भावना गवळींना दहा हजार मते जास्त मिळाली याचा अर्थ ठाकरे यांच्यावर मात केली, असे आमदार राठोड सांगतात. आता नगराध्यक्षपदी काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ नये यासाठी सेना आमदार राठोड यांनी व्यूहरचना करून अपक्ष उमेदवार यांच्या पाठीशी सेना भाजपची शक्ती उभी केली आणि माणिकराव ठाकरे यांच्या व्यूहरचनेला छेद देऊन हरिभाऊ गुल्हाने यांच्या पदरात दुसऱ्यांदा नगराध्यक्षपद टाकले. गेल्यावेळी हरिभाऊ गुल्हाने काँग्रेसच्या मदतीने नगराध्यक्ष झाले होते तर यावेळी सेना भाजपच्या मदतीने नगराध्यक्ष झाले. दोन्ही वेळेला काँग्रेस आणि सेनेच्या भांडणात हरिभाऊंचाच लाभ झाला. जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि कार्य यामुळे यावेळी पुन्हा नगराध्यक्ष झालो. सेना भाजपने आपल्या पाठीशी शक्ती उभी केली ती नगराच्या विकासासाठी केली आहे आणि आपण विकास करून दाखवू अशी प्रतिक्रिया हरिभाऊ गुल्हाने यांनी निवडणूक निकालानंतर ‘लोकसत्ता’ जवळ व्यक्त केली.