Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ज्ञानगंगात केवळ १० टक्के जलसाठा
खामगाव, १७ जून / वार्ताहर

मान्सूनचा पाऊस लांबणीवर पडला असताना खामगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ज्ञानगंगा

 

प्रकल्पात केवळ ९.७४ एवढा जलसाठा उरला असल्याने पाणी टंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत. तालुक्यातील मन, मस व तोरणा प्रकल्प कोरडे पडले असून लाखनवाडा २२ गाव पाणीपुरवठा योजनेला मनच्या मृतसाठय़ातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात आल्याने शेतकऱ्यांसह पाणी टंचाईवर उपाययोजना शोधणाऱ्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, नंतर मान्सूनने दिशा बदलल्याने १५ तारखेपर्यंतही विदर्भात पावसाचे आगमन झाले नसल्याने पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे.
खामगाव शहराला सध्या ज्ञानगंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू आहे. या प्रकल्पात सध्या केवळ ३.३० दलघमी (९.७४ टक्के) एवढाच जलसाठा उरला असल्याने पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. दरम्यान, खामगाव शहराला ज्ञानगंगा धरणातून सरळ पाणीपुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या १८ कोटी रुपयांच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असले तरी अद्यापही या योजनेचे पाणी शहरवासीयांना मिळालेले नाही. माटरगाव गेरु येथे जलवाहिनीसाठी खोदलेल्या विहिरीसाठी मंजूर झालेल्या स्पेशल फिडरचे काम वीज कंपनीने पूर्ण केलेले नसल्याने तात्पुरत्या वीज कनेक्शनद्वारे पंपिंग करून या योजनेच्या टेस्टिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. या जलवाहिनीतील बऱ्याच ठिकाणी लिकेज आढळल्याचे आणखी काही दिवस टेस्टींगचे हे काम सुरू राहणार त्यामुळे महिनाभर तरी या योजनेपासून शहरवासीयांना पाणी मिळणे कठीण आहे, अशा परिस्थितीत पावसाळा लांबल्यास ज्ञानगंगेचे नदीपात्रातून मिळणारे पाणी किंवा टँकर हेच पाणी पुरवठय़ाचे एकमेव साधन शहरवासीयांसाठी राहणार आहे.
खामगाव शहरात सध्याच पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. शहरातील पाण्याची पातळी खूपच खोल गेल्याने विहिरी कुपनलिका व हातपंप कोरडे पडले आहे.
नगरपालिकेद्वारे ५ ते ८ दिवसांनंतर पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न होत असून आमदार सानंदा यांनी काही भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. १ हजार लिटर पाण्याला १०० रुपये या प्रमाणे पाण्याची विक्री होत आहे. दुसरीकडे खामगाव तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेले मन धरण सध्या कोरडे पडले आहे. चांगला पावसाळा होईल या आशेवर मन प्रकल्पावरून सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी दिले गेल्याने सध्या मनमध्ये ४.६० दलघमी मृतसाठय़ाशिवाय काहीच शिल्लक नाही. मनमध्ये उपयुक्त साठा नसल्याने लाखनवाडा २२ गाव पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे. यावर उपाय म्हणून शासनाने मनच्या मृतसाठय़ातून २२ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी देणे सुरू केले आहे.
पावसाळा लांबल्यास या योजनेवर अवलंबून असलेल्या गावावरही पाणी टंचाईची कु ऱ्हाड कोसळणार आहे. मनसारख्या मोठय़ा प्रकल्पातच पाणी नसल्याने मन नदी कोरडी पडली असून या नदीकाठावर असलेल्या गावांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.