Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

यवतमाळवर पाणी टंचाईचे संकट
यवतमाळ, १७ जून / वार्ताहर

भीषण पाणी टंचाईच्या काळातही मुबलक आणि शुद्ध पाण्यासाठी विदर्भात प्रसिद्ध असलेल्या

 

यवतमाळवरही आता पाणी टंचाईचे संकट कोसळणार आहे.
जनतेने पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्रश्नधिकरणचे अधीक्षक अभियंता व्ही.एन. राठोड आणि कार्यकारी अभियंता यशवंत वाघ यांनी केले आहे.
शुद्ध, निर्मळ आणि गोड पाण्यासाठी यवतमाळची ख्याती आहे आणि भीषण पाणी टंचाईच्या काळातही लोकांना मुबलक पाणी पुरवण्याचे काम जीवन प्रश्नधिकरण करीत आहे. त्यामुळे ‘पाणीटंचाई म्हणजे काय?’ याचा खरा अनुभव यवतमाळकरांना नाही. आता मात्र हा कटू अनुभव घेण्याची पाळी यवतमाळकरांवर येईल, अशी चिन्हे आहेत.
जून महिन्याचा पंधरवडा उलटून गेला तरी पावसाचा थेंब आला नाही. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्या तर खोळंबल्याच पण, पाणीटंचाई उग्ररूप घेऊ लागली आहे. यवतमाळ शहर आणि नजीकच्या वडगाव, वाघापूर, लोहारा, भोसा, पिंपळगाव या ग्रामपंचायतींनासुद्धा जीवन प्रश्नधिकरणमार्फत पाणीपुरवठा होत असते.
‘एक दिवसाआड पाणी’ हे जीवन प्रश्नधिकरणचे धोरण गेल्या ३० वर्षापासून आहे. त्यात बदल झाला नसला तरी लोकांना पाणी मात्र पुरेसे मिळते, हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही. महाराष्ट्र जीवन प्रश्नधिकरणतर्फे निळोणा आणि चापडोह या दोन धरणातून पाणीपुरवठा होत आहे.
जवळपास वीस हजार उपभोक्तयांना जीवन प्रश्नधिकरणने कनेक्शन दिले आहेत. पाण्याचे दरमहा देयक ४० लाख रुपये असते आणि वसुलीसुद्धा ३५ ते ३७ लाख रुपये होत असते.
जलवाहिन्या फुटणे, वीज भारनियमन यासारख्या अडथळ्यांच्या शर्यती पार करूनही पाणीपुरवठा ‘बंद’ होणार नाही, याची काळजी जीवन प्रश्नधिकरण घेत असले तरी आता मात्र निसर्गाची अवकृपा भीषण पाणीटंचाईचा अनुभव यवतमाळकरांना देईल, असे दिसते.
अधीक्षक अभियंता व्ही.एन. राठोड (अमरावती) यांनी मंगळवारी चापडोह आणि निळोणा या दोन्ही धरणांना भेटी दिल्या. त्यांच्यासोबत कार्यकारी अभियंता यशवंत वाघ, उपविभागीय अभियंता गायकवाड, व्यवस्थापन विभागाचे अभियंता संजय देशपांडे यांच्यासह अधिकाऱ्यांची चमू होती.
दोन्ही धरणातील साठा आता फक्त २० टक्केच असल्याने बुधवारपासून १० टक्के पाणी कपात सुरू करण्यात आली आहे आणि पाऊस आला नाही तर १ जुलैपासून २० टक्के कपात करण्यात येणार आहे.
सध्या नागरिकांना दरडोई १०० लिटर पाणी देण्यात येते, तर ग्रामीण भागात ४० लिटर दिले जाते. चापडोह आणि निळोणा या दोन्ही धरणातून दररोज २५ दशलक्ष घन लिटर पाणी उपसून जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध करून जनतेला पुरवले जाते. आता मात्र त्यात एक दशलक्ष घन लिटरची कपात करण्यात आली आहे.
नजीकचे जलसंकट उग्ररूप धारण करण्याची भीती व्यक्त होत असून नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे महाराष्ट्र जीवन प्रश्नधिकरणचे कळकळीचे आवाहन आहे. अर्थात, यवतमाळकरांना आणखी पंधरा वीस दिवसांपर्यंत तरी फार चिंतेचे कारण नाही. कारण तोपर्यंत वरूणराजाच्या कृपेची आशा आहे.