Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राज्य समितीकडून शिवणी गावाची पाहणी
भंडारा, १७ जून / वार्ताहर

गावांना स्वच्छतेतून समृद्धीकडे घेऊन जाणाऱ्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात

 

राज्यस्तरीय स्पर्धेत असलेल्या लाखनी तालुक्यातील निर्मलग्राम शिवणी (मोगरा)ची पाहणी राज्य पातळीवरील समितीने नुकतीच केली.
या समितीत सुलभ इंटरनॅशनल अ‍ॅकॅदमी अलाहाबादचे प्रश्न. कुलगुरू सत्येंद्र त्रिपाठी, राज्य आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, तामिळनाडू येथील स्कोप या संस्थेचे संचालक एम. शुब्बुरायन, संवाद व क्षमता विकास कक्षाचे राज्य समन्वयक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, आदींचा समावेश होता.
शिवणी येथे गावाच्या प्रवेशद्वारावर सरपंच विजय खोब्रागडे व ग्रामस्थांनी समिती सदस्यांचे स्वागत केले. २५२ कुटुंब असलेल्या शिवणी गावामध्ये २५२ घरी शौचालये आहेत व त्याचा नियमित वापर होतो. शिवणी गाव शंभर टक्के हागणदारी मुक्त असून ४ जून २००७ ला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते सरपंच विजय खोब्रागडे यांचा गौरव करण्यात आला होता.जलस्वराज्य प्रकल्पाच्या माध्यमातून गावाला शुद्ध व स्वच्छ पाण्याचा नियमित पुरवठा करण्यात येत आहे. गावातील महिला ग्रामसभेच्या पुढाकाराने दारूबंदी व नशाबंदी झाली आहे. महिलांना कपडे धुण्याकरिता दोन पाणवठय़ाची निर्मिती करण्यात आली आहे. मागील १० वर्षांपासून गावात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा २००६-०७ चा जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार २००७-०८ चा प्रथम पुरस्कार, विभागीय पातळीवरील द्वितीय पुरस्कार या गावाने पटकावला आहे. गावात शेती पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय असून जवळपास ४०० लीटर दुधाचे संकलन गावात होत आहे. गावातील १२ महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक बचतीची सुरुवात केली आहे. गावातील लोकांनी ६ लाख ५५ हजार ५०० रुपयाची लोकवर्गणी व ३ लाख ६५ हजार ५०० रुपयाचे श्रमदान गावाच्या विविध विकासासाठी केले आहे. गावातील लोकांनी केलेले श्रमदान व लोकसहभागातून केलेल्या कामाचे आर्थिक मूल्यांकन १० लाख २१ हजार इतके आहे. गावात १० लाभार्थ्यांच्या घरी बायोगॅसवर चालणारे विद्युतदिवे असून किचन बायोगॅसचासुद्धा उपयोग करण्यात येतो. गावाच्या बाहेरील नाल्यावर वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले आहे. गावातील १६३ कुटुंबांनी सांडपाण्यातून परसबाग फुलवली आहे.
मागील ३ वर्षात या गावात एकही फौजदारी गुन्हा घडलेला नाही. शासनाने नेमून दिलेल्या सर्व समित्यांची स्थापना शासनाच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. गावात शिवकालीन पाणी साठवण योजनेच्या दोन टाक्या सामूहिक नियोजन व लोकसहभागातून बांधल्या आहेत.
महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानातून ३ वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या ३ वर्षात गावात एकही साथीचा रोग उद्भवला नाही. गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताभोवती ‘प्लॅटफॉर्म’ बांधून ते स्वच्छ ठेवून तेथून वाहणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर शेती व फळबागेसाठी करण्यात येत आहे.
शासनाच्या ध्येयधोरणाची माहिती लोकांपर्यंत जावी यासाठी शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिकाची वर्गणी गावातील २५२ कुटुंबांनी भरली आहे. त्यामुळे शिवणी हे गाव लोकराज्य ग्राम झाले आहे. साध्या चुली २३०, निर्धूर चुली १२, गोबरगॅस २९, बायोगॅस २९, किचन बायोगॅस ११ आहेत.
शिवणी ग्रामस्थांनी लोकसहभागातून व श्रमदानातून गावाचा कायापालट करून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यपातळीवरील तपासणी समितीने शिवणी गावाची पाहणी केली.