Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भंडारा जिल्ह्य़ातील १४१ गावांना पुराचा धोका
भंडारा, १७ जून / वार्ताहर

भंडारा जिल्ह्य़ातील नदीकाठावर असलेल्या एकूण १५९ गावांपैकी १४१ गावांना पुराचा धोका

 

असून, पुरामुळे ४३ गावांचा संपर्क इतर गावांशी तुटण्याची शक्यता असल्याने त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
भंडारा जिल्ह्य़ातील वैनगंगा, कन्हान, सूर, बावनथडी, चुलबंद या नद्यांच्या पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता मागीलवर्षीप्रमाणे जिल्हा प्रशासन यावर्षीही तयार असून जिल्ह्य़ातील सातही तालुके मिळून १४१ गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक प्रभावित तालुक्यांमध्ये पवनी तालुक्यातील ३४ गावे, भंडारा तालुक्यातील २६ गावे, मोहाडी तालुक्यातील १८ गावे, तुमसर तालुक्यातील २४ गावे, लाखांदूर तालुक्यातील २८ गावे, लाखनी तालुक्यातील ९ गावे तर साकोली तालुक्यातील २ गावांचा समावेश आहे तर नदी, नाले आणि धरणांमुळे नुकसान सोसणाऱ्या आबादी गावांची संख्याही बरीच आहे.
संभाव्य धोका उद्भवल्यास तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या दृष्टीने असलेली उपाययोजना आणि ठिकाण याचे नियोजनही करून ठेवण्यात आले आहे.
पुरामुळे अनेक गावांचा मुख्य गावांशी संपर्क तुटतो, अशा गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १४, मोहाडी तालुक्यातील ५, तुमसर तालुक्यातील ६, पवनी तालुक्यातील ३, साकोली तालुक्यातील ३, लाखांदूर तालुक्यातील ८ आणि लाखनी तालुक्यातील ४ अशा एकूण ४३ गावांचा समावेश आहे. भंडारा शहराच्या शेजारून बांधण्यात आलेली सुरक्षा भिंत यावर्षी चिंतेचा विषय ठरू शकते. त्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी लक्षात घेता ही संरक्षण भिंत बांधण्यात आली असली तरी संबंधित विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.