Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

स्टेट बँकेच्या मलकापूर शाखेवर सेनेचा मोर्चा
बुलढाणा, १७ जून / प्रतिनिधी

भारतीय स्टेट बँकेत शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी होणारी अडवणूक थांबवण्यासाठी शिवसेनेच्या

 

वतीने मलकापूर शाखेवर मोर्चा काढून धरणे धरण्यात आले.
केंद्र व राज्य सरकारने पंतप्रधान पॅकेज अंतर्गत हजारो शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे कर्ज माफ केल्याचे जाहीर करण्यात आले पण, प्रत्यक्षात मलकापूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना शासन व बँकेने ४६ पैसे, १० रुपये, १२० रुपये याप्रमाणे कर्ज माफ करून त्यांची क्रूर चेष्टा केली, असा सेनेचा आरोप आहे. या अन्याया विरोधात शिवसेनेने आंदोलनात्मक पवित्रा घेतला.
शिवसेना उपजिल्हा प्रमुख अ‍ॅड. हरीश रावळ, एकनाथ डवले, रवींद्र गव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी स्टेट बँकेच्या मलकापूर येथील कृषी शाखेवर मोर्चा काढला व जोरदार निदर्शने केली. शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेच पाहिजे, जय भवानी, जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणा देत शिवसैनिक व शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनाची दखल घेत बँकेचे व्यवस्थापक पांढरे हे पोलीस बंदोबस्तात बाहेर आले आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यामुळे शेतकरी शांत झाले. या आंदोलनात राजू नवले, किशोर नवले, सुनील पाटील, किसन पाटील, श्याम श्रीवास, डॉ. मोहन तायडे, डॉ. राऊत, ओंकारसिंग, भरत भीमजियाणी, गोविंदा मोरे, अताउल्ला शहा, सोहिलभाई दारासिंग, जलिल, साजिदखान, गणेश चित्ते, विजय धनके, संतोष घाटे, नाना बाबर, श्रीकृष्ण बगाडे, एकनाथ शेलकर, शिवाजी रायपुरे, नीळकंठ खर्चे, राहुल तायडे सहभागी झाले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.