Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पर्यावरण रक्षणासाठी वन महोत्सव
गडचिरोली, १७ जून / वार्ताहर

वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, वाहनांचे वाढते प्रमाण यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाला धोका

 

उद्भवत आहे.
त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षलागवड करण्यासाठी दरवर्षी ५ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण देशभर वनमहोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येतो, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक एन.डी. चौधरी यांनी दिली.
राष्ट्रीय वननीती १९८८ नुसार पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण भूभागाच्या सपाट भागात ३३ टक्के तर डोंगराळ भागात ६६ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादनाखाली असणे गरजेचे आहे. तथापि हे क्षेत्र सुमारे २० टक्के आहे.
वृक्षाखालील क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने दरवर्षी ५ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण देशभर वनमहोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येतो. हे उद्दिष्ट सन २०१२ अखेर गाठण्याकरिता केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने प्रत्येक राज्याकरिता वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सुद्धा निश्चित केले आहे. या कार्यक्रमासाठी सर्वाचा सहभाग अपेक्षित आहे.
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी तसेच ग्लोबल वार्मिग सारखे दुष्परिणाम टाळण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षलागवड करणे, त्यांचे संगोपन करणे ही काळाजी गरज आहे. वनमहोत्सवादरम्यान मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड व्हावी या दृष्टीने दरवर्षी गडचिरोली येथील सामाजिक वनीकरण विभागामार्फत सवलतीच्या दराने रोपांची विक्री करण्यात येते.
या विभागातील आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव, चामोर्शी, तालुक्यातील विक्रमपूर, अहेरी तालुक्यातील गेर्रा तसेच गडचिरोली येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेत विविध प्रजातींची रोपे उपलब्ध आहेत.
ही रोपे प्रश्नप्त करण्यासाठी व मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी लागवड अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपसंचालक एन.डी. चौधरी यांनी केले आहे.