Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शिपाई दिलीप सिडामची हत्या, दोघांना अटक
चंद्रपूर, १७ जून/ प्रतिनिधी

न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या शासकीय निवासस्थानी पोलीस दिलीप सिडाम याच्या सोमवारी

 

रात्री झालेल्या मृत्यूप्रकरणी रामनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून जयंत सोमाजी तोडासे व महेश प्रल्हाद शेडमाके या दोन पोलिसांना अटक केली आहे. आरोपींची २२ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक व्ही.डी. रूडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला. न्यायाधीश एस.एस.गोसावी यांच्या शासकीय निवासस्थानी १५ जूनच्या रात्री पोलीस हवालदार हरिश्चंद्र सदाशिव कडूकर, शिपाई जयंत सोमाजी तोडासे, महेश प्रल्हाद शेडमाके व दिलीप कवडू सिडाम तैनात होते. मध्यरात्री हवालदार कडूकर गैरहजर होते. शिपाई तोडासे, शेडमाके व सिडाम तैनात होते. १६ जूनच्या पहाटे ३ ते ६ वाजेपर्यंत शिपाई महेश शेडमाके तैनात होता. सकाळी ६ वाजता येणारा सिडाम कामावर उशिरा पोहोचला. या कारणावरून सिडाम, ताडासे व शेडमाके यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने शिपाई तोडासेने दिलीप सिडामवर बंदुकीतून गोळी झाडली. या गोळीने सिडामचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे तपासात उघडकीस आले. शिपाई जयंत तोडासे याच्या बंदुकीच्या चेंबरमध्ये दोन काडतुसे अडकून आहेत तसेच जमिनीवर काही काडतुसे पडलेली होती. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तंबूतील पलंगावर रक्त आढळले. निवासस्थानाच्या पश्चिमेस असलेल्या भिंतीवर रक्त सांडलेले दिसले. पोलिसांनी सिडामचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्याच्या गळय़ावर कंठाखाली गोळी आरपार गेल्याचे दिसले तेव्हा ही हत्याच असल्याचे उघड झाले. पोलीस शेडमाके व तोडासे यांनी घटनास्थळावरील पुरावा नष्ट करण्यासाठी सिडामचा मृतदेह विश्रामभवन परिसरातील विहिरीत टाकला. या सर्व पुराव्यांच्या आधारावर तोडासे व शेडमाके या शिपायांना अटक करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक व्ही.डी. रूडे यांनी दिली. दिलीप सिडामच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. रामटेके व डॉ. तोडासे यांनी केली. या शवविच्छेदनात शिपायाचा मृत्यू बंदुकीच्या गोळीने व नंतर पाण्यात बुडून झाल्याचे निष्पन्न झाले. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातही सिडामच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी मृतदेह नागपूरला पाठवण्यात आला आहे. घटनास्थळावरील उपलब्ध पुरावा व दिलीप सिडामचा भाऊ खुशाल सिडाम याच्या तक्रारीवरून दोघांविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार रूडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पराग मनेरे करीत आहेत.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्हय़ातील न्यायाधीशांना पोलिसांची सुरक्षा आहे. पोलिसांच्या असंतोषामुळे सुरक्षा यंत्रणेचे बारा वाजले आहेत. आठ दिवसापूर्वी वरोरा पोलीस ठाण्यात शिपायाने आत्महत्या केली. वर्षभरापूर्वी शहर पोलीस ठाण्यात एका शिपायाच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीने दुसऱ्या शिपायाचा घात केला. अशी प्रकरणे उघडकीला येत आहेत. हा संपूर्ण प्रकार पोलीस दलातील बेशिस्तीमुळे होत आहे. यामुळे न्यायाधीशांच्या वर्तुळात दहशत निर्माण झाली आहे.