Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

संवर्ग विकास अधिकाऱ्यांना ग्रामसेवकांचा घेराओ
मलकापूर, १७ जून / वार्ताहर

पंचायत समिती प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे गेल्या तीन महिन्यांपासून ग्रामसेवकांना पगारच

 

मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामसेवकांनी प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांना केबीनमध्ये घेराओ घातला.
पंचायत समितीमधील ग्रामसेवकांचे मार्चपासूनचे पगार प्रलंबित आहेत. तालुका ग्रामसेवक युनियनने पगारासाठी बरेचदा संवर्ग विकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन पगाराची मागणी केली. मात्र, पंचायत समिती प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. जिल्हा परिषद प्रशासनाकडून मलकापूर पंचायत समितीला मार्चचे पगाराचे अनुदान मिळाले होते. मात्र, त्या अनुदानातून ग्रामसेवकांचे पगार न देता मार्च व एप्रिलचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात आले. त्यामुळे ग्रामसेवक पगारापासून वंचित राहिले. प्रकाश वाघ हे नैनीताल येथे प्रशिक्षणासाठी गेल्याने त्यांचा प्रभार एकात्मिक बाल विकास अधिकारी एस.पी. सावळे यांच्याकडे देण्यात आला आहे. पगार होत नसल्याने आज ग्रामसेवक संतप्त झाले. ग्रामसेवकांनी संघटनेचे तालुकाध्यक्ष दामोदर वराडे, सचिव निनाजी तांगडे, माजी सरचिटणीस रमेश होले यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी संवर्ग विकास अधिकारी सावळे यांना घेराओ घातला. यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाकडे ग्रामसेवकांच्या पगारासाठी अनुदान मागून लवकरात लवकर पगार वाटप करण्याचे आश्वासन दिले.