Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शाळेच्या जागेवर उभारलेल्या व्यापारी संकुलावर गदा
अकोला, १७ जून/ प्रतिनिधी

उर्दू शाळा पाडून त्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्यात आल्याप्रकरणी नगरविकास खात्याने

 

कठोर पावले उचलली आहेत. संकुलाच्या दोन भूखंडापैकी एकावर शाळा उभारण्याच्या बाजूने नगरविकास विभागाने अभिप्रश्नय दिला आहे. संकुलाचे बांधकाम अनधिकृत असल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या असून यामुळे संकुलावर गदा आली आहे.
अकोला महापालिकेच्या कार्यालयासमोर बहुमजली व्यापारी संकुल उभारण्यात येत आहे. महापालिकेच्या उर्दू शाळेची इमारत पाडून त्या जागेवर संकुल उभारले जात आहे. वेगाने पूर्ण होत असलेले हे संकुल अनधिकृत असल्याची तक्रार अ‍ॅड. शरद गांधी यांनी शासनाकडे केली आहे. संकुलाच्या पहिल्या माळयावर शाळा सुरू करण्यात येईल, असे कंत्राटदार आणि महापालिको यांच्यातील करारानुसार ठरले होते. मात्र तसे न झाल्यामुळे अद्यापही शाळेतील विद्यार्थी अधांतरी असून पालकांनीही यासंदर्भात महापालिके कडे तक्रारी केल्या आहेत.
अनधिकृत संकुलाविरुध्द मुंबईत लोकशाही दिनी अ‍ॅड. गांधी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हालचाली सुरू झाल्या. नगरविकास खात्याने यासंदर्भात महापालिका आयुक्तांना संपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. परंतु सुनावणीला आयुक्त गैरहजर राहिले. त्यामुळे संकुलालासाठी दिलेल्या दोन भूखंडापैकी पूर्वी ज्या भूखंडावर शाळेची इमारत होती, त्या भूखंडावर शाळा असावी, असा अभिप्रश्नय नगरविकास विभागाने दिला आहे.
पुढील कारवाईसाठी महसूल खात्याक डे हे प्रकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. महसूल खात्याची भूमिका मात्र संदिग्ध असल्याचा आरोप तक्रारकर्ते अ‍ॅड. गांधी यांनी केला आहे.
दरम्यान, या संकुलाच्या कामाला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली होती. या आदेशाला न जुमानता संकुलाचे बांधकाम सुरूच ठेवण्यात आले. संकुलाचा नकाशा मंजूर न करताच बांधकाम सुरू करण्यात आल्याचा आरोप गांधी यांनी तक्रारीतून केला आहे. शाळेकरिता संकुलामध्ये नियमानुसार जागा देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.