Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चाचेर शाखेवर शेतकऱ्यांची धडक
रामटेक, १७ जून / वार्ताहर

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत १० रुपयात शेतकऱ्याचे खाते उघडण्यास जय

 

महाराष्ट्र संघटनेच्या आंदोलनामुळे बँक व्यवस्थापकास मंजुरी द्यावी लागल्याचा दावा संघटनेच्या पत्रकातून करण्यात आला आहे.
सरकारने शेतकऱ्यांना धान पिकाची नुकसान भरपाई म्हणून एकरी १६०० रुपये अनुदान स्वरूपात दिले. ते पैसे जिल्हा बँकेत जमा करण्यात आले. खरीप हंगामाच्या तयारीसाठी बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी करण्याच्या उद्देशाने मिळालेली ही आर्थिक मदत घेण्याकरिता शेतकरी जिल्हा बँकेच्या चाचेर शाखेत गेले असता बँकेच्या अधिकाऱ्यांनी ३०० ते ५०० रुपयापर्यंत जमा करून खाते उघडण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी १० रुपयात शेतकऱ्यांचे खाते उघडण्याचा आदेश दिला असून शेतकऱ्यांवर खाते उघडण्यासाठी ३०० ते ५०० रुपये भरण्याची सक्ती करण्यात येत असल्याने ‘जय महाराष्ट्र संघटना’ चे जिल्हाध्यक्ष संजय सत्येकार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चाचेर शाखेत धडक दिली.
संतप्त शेतकऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना घेराव करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे १० रुपयात खाते उघडण्याची मागणी केली. शेवटी व्यवस्थापकांनी १० रुपयात शेतकऱ्यांचे खाते उघडून देण्याचे मान्य केले. जय महाराष्ट्र संघटनेच्या कोणत्याही शेतकऱ्याने १० रुपयापेक्षा जास्त पैशात खाते उघडू नये, असे आवाहन केले आहे. याप्रसंगी किशोर सहारे, हरिहर गुजरकर, भूषण कुंभलकर, बबन घजाळे, मारोती दारोडे, विलास दरवई, गजानन दोडके, बाजीराव मदनकर, दिवाळू मलेवार, हेमराज चाफले, प्रमोद चाफले उपस्थित होते.