Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सेवानिवृत्तांची ग्रॅच्युइटी थकली
बुलढाणा, १७ जून / प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील १५३ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्यापही उपदान व अंशराशीची २ कोटी ८९ लाख

 

८२ हजारांची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. थकलेली रक्कम तात्काळ मिळावी, यासाठी जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण समितीच्यावतीने लोकआयुक्ताकडे तक्रार करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेतील १५३ कर्मचारी २००८ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत परंतु, या सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना अद्यापही उपदान व अंशराशीची २ कोटी ८९ लाख ८२ हजार ५७१ रुपयांची रक्कम मिळाली नाही. ही रक्कम कर्मचाऱ्यांना मिळावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदन देऊन पाठपुरावा केला परंतु, मागणीची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न आयुक्तांकडे नेण्याचा सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण समितीने ठराव मांडला आहे. उपदानाचा प्रश्न आयुक्तांकडे जाणार असल्याची धास्ती घेत प्रशासनाने १० जूनला ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवाकडे एका पत्राद्वारे अनुदानाची मागणी केली आहे. याप्रकरणी वैयक्तिकरीत्या लोकआयुक्ताकडे तक्रारी दाखल करण्याकरिता २० जूननंतर प्रत्येक विकास खंडात कॅम्प घेऊन तक्रारी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये व्याजाची मागणी करण्यासाठी शासनाकडे अर्जाद्वारे पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सेवानिवृत्त कल्याण समितीचे सरचिटणीस रमेश होले यांनी दिली.