Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

व्यक्तिवेध

कोल्हापूर म्हटलं की, चटकन रांगडय़ा व्यक्तिमत्त्वाचे पैलवान डोळ्यासमोर येतात; पण याच शहरातून सरस्वतीचे पूजकही दाही दिशा गाजवतात. ‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून नियुक्त केले गेलेले डॉ. गणपती यादव हे याच कोल्हापुरातील. अर्जुनवाडा या छोटय़ाशा गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यामुळे कोल्हापुरातील आखाडय़ात त्यांनीसुद्धा कधी काळी कुस्तीमध्ये प्रतिस्पध्र्याबरोबर दोन हात केले होते. अर्जुनवाडा येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी राजाराम महाविद्यालयातून इंटर सायन्स केले. डॉ. यादव यांना तेव्हा ‘आयआयटी, मुंबई’सारख्या नावाजलेल्या संस्थेमध्ये प्रवेश मिळत असूनसुद्धा रसायनशास्त्रामध्ये संशोधनपर शिक्षण घेण्याकरिता त्यांनी ‘युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ (UDCT) येथे केमिकल

 

इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला व तेथून पदवी मिळविली. तसेच या संस्थेमधून ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. एम. एम. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेटसुद्धा मिळविली. डॉ. यादव हे केमिकल इंजिनीयर म्हणून प्रसिद्ध आहेतच; शिवाय ग्रीन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, एनर्जी इंजिनीयरिंग आणि कॅटॅलिक सायन्स यासारख्या विषयांमध्ये केलेल्या मूलभूत संशोधनामुळे एक विख्यात शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘कॅटॅलिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, डॉ. जी. डी. यादव हे कॅटॅलिसिस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या क्षेत्रातील भारतातील प्रथम क्रमांकाचे शास्त्रज्ञ ठरले आहेत. तसेच ‘कौन्सिल फॉर सायन्टिफिक इंडस्ट्रियल रिसर्च’ (CSIR) या संस्थेने डॉ. यादव यांचा, ‘भारतातील पहिल्या वीस शास्त्रज्ञांमध्ये असलेला एकमेव इंजिनीयर,’ असा उल्लेख केला आहे. डॉक्टरेट मिळविल्यानंतर डॉ. यादव सुमारे सहा वर्षे अमेरिकेतील विद्यापीठामधून अध्यापन करीत होते त्यांना तेथेच कायम वास्तव्य करणे सहज शक्य असूनही आपल्या अनुभवाचा उपयोग मायभूमीला मिळावा, असा हेतू बाळगला. डॉ. यादव भारतात परतले. त्यांनी संशोधन आणि अध्यापन हे आपले छंद जोपासण्यासाठी, ज्या संस्थेमधून शिक्षण घेतले तेथेच शिक्षक म्हणून रुजू झाले. आजपर्यंत डॉ. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल पंच्चावन्न विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट मिळविली आहे. डॉ. यादव यांचे जवळपास दोनशे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्याचबरोबर सुमारे तीस पेटंट्स् त्यांच्या नावावर आहेत. केवळ शैक्षणिक भागच त्यांनी पाहिला असे नाही तर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अडचणी, सुविधा यांबाबतही ते जागरूक असत. UDCT येथे मुख्य वॉर्डन म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या होस्टेल्स आणि कँटीनच्या व्यवस्थापनामध्ये विशेष लक्ष देऊन त्यामध्ये आमूलाग्र बदल केले. तसेच UDCT च्या आवाराबाहेर झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून ते अतिक्रमण हटविले. त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी पदपथावर आणि बाहेरच्या आवारामध्ये सुशोभीकरण केले. त्या ठिकाणी भरपूर झाडे लावली. वीस वर्षांच्या कारकीर्दीत डॉ. यादव यांना रॉय मेमोरिअल अ‍ॅवॉर्ड, प्रो. एस. के. भट्टाचार्य अ‍ॅवॉर्ड, के. जी. नाईक सुवर्णपदक अशा सन्मानांनी तसेच राज्य शासनातर्फे उत्तम शिक्षक म्हणून गौरविण्यात आले. अमेरिकेतील परडय़ू विद्यापीठातर्फे ‘उत्कृष्ट आशियाई विद्यार्थी’, म्हणून तर तैवान येथील लुंगवा विद्यापीठातर्फे ‘उत्कृष्ट प्राध्यापक’ म्हणून त्यांचा गौरव झाला होता. डॉ. गणपती यादव यांना इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमी (INSA) तर्फे सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. कॅनडा येथील वॉटर्लू विद्यापीठाने त्यांना मानद सदस्यत्व बहाल केले. डॉ. यादव यांनी प्रदूषणविरहित असे एक रसायन विकसित केले असून त्याचा फायदा भारतातील अनेक कंपन्यांना झाला आहे. भारत सरकारच्या अनेक समित्यांवर ते मानद सल्लागार आहेत. डॉ. यादव यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांमधून विपुल लेखन केले आहे. न्यूयॉर्क येथून प्रसिद्ध होणाऱ्या, विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील नामवंतांच्या नामावळीत (६ँह्ण२ ६ँ) डॉ. यादव यांचे नाव अग्रक्रमाने समाविष्ट करण्यात आले आहे.