Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

बुलढाणा जिल्हा न्यायालयाचा १७ जुलैला शताब्दी महोत्सव
राष्ट्रपती उपस्थित राहणार

बुलढाणा, १७ जून / प्रतिनिधी

बुलढाणा जिल्हा न्यायालय व बार असोशिएशनला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येत्या १७ जुलै रोजी येथे शताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला असून या सोहोळ्यास राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंग पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती बुलढाणा बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय सावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चंद्रपूर जिल्ह्य़ात ७५ हजार सभासद नोंदणीचे राष्ट्रवादीचे उद्दिष्ट
चंद्रपूर, १७ जून/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी अभियानाची चंद्रपूर जिल्ह्य़ात सुरुवात करण्यात आली असून जिल्ह्य़ात पक्षाला अधिक बळकट करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केले. संपूर्ण जिल्ह्य़ात ७५ हजाराच्या वर कार्यकर्त्यांनी पक्षाचे सभासद करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार याप्रसंगी करण्यात आला.

गोंदियात ‘प्रहार’ संघटनेच्या कार्यकर्त्यांचे संमेलन
गोंदिया, १७ जून / वार्ताहर

‘प्रहार’ संघटनेच्या जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांचे संमेलन नुकतेच येथे झाले. ‘प्रहार’ने समाजसेवेचे घेतलेले व्रत पुढेही कायम राखण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. ‘प्रहार’ सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी नेहमी लढला. निवडणुकीत आम्ही पडलो याचा अर्थ हा नाही की, ‘प्रहार’ थंडावला. उलट या निवडणुकीत कोण आमच्या सोबत आहे आणि कोण नाही हे कळले.

खासदार राजू शेट्टी यांचा बुलढाणा येथे मंगळवारी सत्कार
बुलढाणा, १७ जून / वार्ताहर

स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांचा सस्नेह जाहीर सत्कार स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांच्या उपस्थितीत येत्या मंगळवारी २३ जूनला दुपारी १२ वाजता गर्दे हॉल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी लता गोयनका
खामगाव, १७ जून / वार्ताहर

लायनेस क्लब अध्यक्षपदी लता गोयनका तर सचिवपदी उर्मिला केला यांची नुकतीच निवड झाली. कोषाध्यक्षपदी फाल्गुनी शाह यांची निवड करण्यात आली. लायनेस क्लबची उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. आयपीपी दिशा पनपालिया, उपाध्यक्ष डिम्पल शाह, डॉ. किरण राठी, अर्चना जाधव, सहसचिव हरप्रित बग्गा, अंजली नांदेश्वर, सहकोषाध्यक्ष स्मिता देशमुख, हर्षा कमानी, टेमर अरुणा टावरी, टेलटय़ुस्टर संध्या कोठारी, पीआरओ रितु बडजात्या, संध्या गोयनका, डायरेक्टर मिनु मेहता, तारा राठी, सपना मुणोत, भारती नावंदर, अलका भुतडा, सुनीता गांधी, मंगला शंकरवार, सविता भुतडा, मंगला झांबड, माधुकर कमाणी, सीमा चोपडा, नीता चांडक, सल्लागार समिती निर्मला जैन, डॉ. अर्पणा बावस्कर, डॉ. सुषमा सरोदे यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.

नगराध्यक्षांची निवडणूक
यवतमाळ जिल्ह्य़ात चार पालिका अपक्षांकडे, दोन राष्ट्रवादी काँग्रेसकडे
यवतमाळ, १७ जून / वार्ताहर
यवतमाळ जिल्ह्य़ातील सहा पालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुका बुधवारी पार पडल्या असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, अपक्ष दोन, विकास आघाडी एक, परिवर्तन पॅनेल एक अशी स्थिती असून घाटंजी पालिकेच्या निवडणुकीला स्थगनादेश आहे.

ज्ञानगंगात केवळ १० टक्के जलसाठा
खामगाव, १७ जून / वार्ताहर

मान्सूनचा पाऊस लांबणीवर पडला असताना खामगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ज्ञानगंगा प्रकल्पात केवळ ९.७४ एवढा जलसाठा उरला असल्याने पाणी टंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत. तालुक्यातील मन, मस व तोरणा प्रकल्प कोरडे पडले असून लाखनवाडा २२ गाव पाणीपुरवठा योजनेला मनच्या मृतसाठय़ातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

यवतमाळवर पाणी टंचाईचे संकट
यवतमाळ, १७ जून / वार्ताहर

भीषण पाणी टंचाईच्या काळातही मुबलक आणि शुद्ध पाण्यासाठी विदर्भात प्रसिद्ध असलेल्या यवतमाळवरही आता पाणी टंचाईचे संकट कोसळणार आहे. जनतेने पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्रश्नधिकरणचे अधीक्षक अभियंता व्ही.एन. राठोड आणि कार्यकारी अभियंता यशवंत वाघ यांनी केले आहे. शुद्ध, निर्मळ आणि गोड पाण्यासाठी यवतमाळची ख्याती आहे आणि भीषण पाणी टंचाईच्या काळातही लोकांना मुबलक पाणी पुरवण्याचे काम जीवन प्रश्नधिकरण करीत आहे. त्यामुळे ‘पाणीटंचाई म्हणजे काय?’ याचा खरा अनुभव यवतमाळकरांना नाही. आता मात्र हा कटू अनुभव घेण्याची पाळी यवतमाळकरांवर येईल, अशी चिन्हे आहेत.

बोरगावात पाणी टंचाईचा बळी; विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
चिखली, १७ जून / वार्ताहर

तालुक्यातील पाणीटंचाईने कळस गाठला असून विहिरीतील पाणी काढताना आज एका महिलेला प्रश्नणास मुकावे लागले. बोरगाव काकडे येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. टँकरद्वारे पोहोचवण्यात आलेले पाणी येथील ग्रामपंचायतीच्या विहिरीत टाकण्यात येते. विहिरीतून पाणी काढण्यासाठी महिला-पुरुषांची झुंबड होते. अशाच प्रकारात बुधवारी सकाळी टँकरने विहिरीत टाकलेले पाणी काढण्याच्या प्रयत्नात गोदावरी रमेश काळे (४२) विहिरीतील खडकावरच कोसळली. डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

विविध मागण्यांसाठी शिवसेनेचे धरणे
खामगाव, १७ जून / वार्ताहर

शेतकरी, शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेच्यावतीने येथे धरणे धरण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. शेतकऱ्यांना बियाण्यांचे परमीट त्वरित देण्यात यावे, रासायनिक खते व बी-बियाणे व शासकीय दराप्रमाणे देण्यात यावे, बँकांनी शेतकऱ्याना पीककर्ज द्यावे, विजेचे भारनियमन बंद करावे, तालुक्यातील पाणी टंचाईवर त्वरित उपाययोजना करावी, ज्ञानगंगा नदी पात्रातून पाणी सोडण्यात यावे, दुबार पेरणीचा मोबदला त्वरित देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलना तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

मटण खाण्यावरून हाणामारी
खामगाव, १७ जून / वार्ताहर
शिजवलेले मटण खाण्यासाठी न दिल्याने दोन मजुरांनी एकाला विळा मारून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री १० वा. सुमारास घाटपुरी येथे घडली. पुलाच्या कामावर असलेल्या धुमसिंग राठीया (बीड) यांनी मटण शिजवून स्वत:च्या ताटात घेतले होते. त्यावर चिडून जाऊन त्यांना जंगलु कुपय्यया राठीया व शिवलाल राठीया यांनी हातावर विळ्याने मारून जखमी केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून जंगलु व शिवलाल यांना अटक केली आहे.

घर जळीत प्रकरणातून निर्दोष
तालुक्यातील उमरा अटाळी येथील घर जळीत प्रकरणातून अरुण वारे यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. २६ मार्च २००८ रोजी दुर्गा प्रभाकर वारे यांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी अरुण वारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

मेहकर बसस्थानकावर चोरी
मेहकर, १७ जून / वार्ताहर

मेहकर बसस्थानकावर औरंगाबाद- वणी बस (क्र. एम.एच. ४०- ८९५३) उभी असताना आत्माराम कान्होबा सास्ते यांच्या जवळील १२ हजार रुपये तर सुभाष मोरे यांचे एक हजार रुपये असे एकूण १३ हजार रुपये चोरटय़ांनी लांबवले.

तहसील कार्यालयावर ‘घागर’ मोर्चा
आर्णी, १७ जून / वार्ताहर

तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक तीव्र झाली असूनही प्रशासन मात्र उदासीन आहे. यामुळे देऊरवाडी (बुटले) येथील संतप्त महिलांनी घागर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. या मोर्चात मोठय़ा संख्येत पाणी टंचाईग्रस्त नागरिक सहभागी झाले होते. पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांची चाऱ्याची समस्या मोठय़ा प्रमाणात भेडसावत असल्याने तालुक्यातील जवळा, चांदनी, देऊरवाडी, आर्णी, तळवी अशा एकूण २० ते २५ गावात पाण्याची समस्या सुरू झाली आहे.

सामाजिक बांधिलकीतून कूपनलिका
भंडारा, १७ जून/ वार्ताहर

टंचाई काळातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन नरकेसरी वॉर्डातील केशवराव तिडके यांनी स्वखर्चाने नागरिकांसाठी कूपनलिका करून दिली असून आपल्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला.

धरणाच्या कामावरील कामगाराचा मृत्यू
भंडारा, १७ जून / वार्ताहर

गोसेखुर्द धरणाच्या वक्रद्वाराचे काम करताना पाय घसरून धरणाच्या पाण्यात इरफान मनवर खाँ पठाण (३०) याचा मृत्यू झाला. इरफान मुळचा नागभीडचा राहणार आहे; परंतु सध्या तो कुटुंबासोबत गोसे (बु.) येथे राहात होता. सकाळी ९ वाजता तो १६ क्रमांकाच्या वक्रद्वाराच्या, उतारावर दाराचे नट बोल्ट मजबूत केल्यावर पॅकींग भरत असताना अचानक घसरून धरणाच्या खोल पाण्यात बुडाला. त्याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. धरणाच्या वक्रद्वाराचे काम ओम मेटल कंपनी करत असून रविवार सुटीचा दिवस असताना कामाचे अतिरिक्त पैसे मिळत असल्याने १० ते १५ कामगार सुरक्षा बेल्ट पुरवित नसल्यामुळे ही घडली. इरफानला पत्नी व ५ वर्षाचा मुलगा आहे. इरफानच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाला कोणीही आधार उरला नाही.

तुमसर तहसील कार्यालयाविरुद्ध विद्यार्थी-पालकांचा रोष
तुमसर, १७ जून / वार्ताहर
तुमसर तहसील कार्यालयाच्या रामभरोसे कारभाराविरुद्ध विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला आहे. तहसील कार्यालयात कामावर असलेल्यांच्या खुच्र्या रिकाम्या राहत असल्याची तक्रार आहे. परीक्षांचे निकाल लागले की विद्यार्थ्यांना जातीचे, चारित्र्याचे उत्पन्नाचे दाखले पाहिजे असतात. दाखल्याचे प्रकरण तहसील कार्यालयात आल्यावर ती भंडारा येथे सक्षम अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरीसाठी न्यावे लागतात. ही प्रकरणे नियमित भंडारा येथे जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास उशीर होत आहे. त्याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये रोष आहे. अनेक प्रकरणे पडून आहेत पण, अधिकाऱ्यांच्या खुच्र्या नेहमीच रिकाम्या राहत असल्याने याची तक्रार आमदार मधुकर कुकडे यांना करावी लागली. वरिष्ठांनी याकडे पाठ फिरविली आहे. तहसील कार्यालयाच्या कारभाराविरुद्ध आंदोलन छेडण्याच्या तयारीत विद्यार्थी आहेत.

ज्ञानेश्वरी भागवत दिंडीचे स्वागत
भंडारा, १७ जून / वार्ताहर
ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या २३ मे ०९ रोजी डोंबिवलीहून निघालेली ज्ञानेश्वरी भागवत दिंडी नाशिक, धुळे, मुक्ताईनगर, नांदुरा मार्गे विदर्भात पोहोचली असून तिचे येथे स्वागत करण्यात आले. यवतमाळ, नागपूर येथे श्रीमद् भागवत हरिकथा ज्ञानयज्ञ आणि ज्ञानेश्वरी प्रणीत आत्मसाक्षात्कार साधना या विषयांवर प्रवचने झाली. ज्ञानेश्वरी स्वर्णिमा पाक्षिक चे संपादक अनिरुद्ध रनाळकर यांच्या नेतृत्वाखाली कामठी, मनसर, रामटेक, तुमसर, गोंदिया, आमगाव या शहरांमधून लोकसंपर्क केला. समाज प्रबोधनाची धुरा अनिरुद्ध रनाळकर वाहत आहेत. ही दिंडी बुलढाणा, वेरूळ, संभाजीनगर मार्गे पुणे येथे जाणार आहे. या दौऱ्यात अनिरुद्ध रनाळकर यांनी ज्ञानेश्वरीचा टपालाद्वारे अभ्यासक्रम परीक्षेबद्दलही माहिती दिली.

दगडफेक प्रकरणी एकास अटक
खामगाव, १७ जून / वार्ताहर

काँग्रेस भवन मैदानावर गेल्या ३ डिसेंबरला झालेल्या दगडफेकीबद्दल पोलिसांनी गणेश अरुण शिंदे यांना अटक केली आहे. शिंदे यांनी राणा चषक सामन्या दरम्यान दगडफेक केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

नाना पटोले समर्थकाची प्रशासक पदावरून उचलबांगडी
भंडारा, १७ जून / वार्ताहर

लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदावरून नाना पटोले समर्थक भुमेश्वर महावाडे यांना काढून त्यांच्याऐवजी नरेश दिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नरेश दिवटे हे लाखांदूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

मेहकर शहरात मोटारसायकलची चोरी
मेहकर, १७ जून/ वार्ताहर

शहरातील मुख्य बाजारपेठेतून नवीन हिरोहोंडा स्प्लेंडर चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली. रवींद्र सिंग कुलवंतसिंग सेठी यांनी हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस (एमएच २८ एच ४८८८) मोटार सायकल घेऊन पेट्रोल पंपाचे कर्मचारी सुनील अशोक अडेलकर हे पैसे जमा करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेत गेले होते. तेथून परतत असताना खाजगी कामाकरिता पूजा ड्रेसेस समोर त्यांनी मोटार सायकल उभी केली. दुकानातून परत आले असता त्यांना मोटारसायकल न दिसल्यामुळे त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

चारा डेपो सुरू करण्याची शिवसेनेची मागणी
नेरपरसोपंत, १७ जून / वार्ताहर

मृगनक्षत्रही कोरडे जाणार की काय, या भीतीने नेरवासीयांना ग्रासले आहे. गुराढोरांना पुरेसे पाणी आणि चारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची भीती वाढतच आहे, अशा दयनीय अवस्थेत कमीत कमी जनावरांना चारा मिळाला पाहिजे आणि त्यासाठी नेर तहसीलदारांनी त्वरित चारा डेपो स्थापित करावा, अशी मागणी शिवसैनिक प्रमोद राणे, खुशाल मिसाळ यांनी केली आहे. अन्यथा जनावरे सोबत घेऊन ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी एका पत्रकाद्वारे शासनाला दिला आहे.