Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

विशेष लेख

बी.एम.एम.
मराठीचा आग्रह की अरेरावी?

बॅचलर ऑफ मास मीडिया (बी.एम.एम.) या तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांसाठी मुंबई विद्यापीठाने अत्यंत घाईगर्दीने नवा अभ्यासक्रम तयार केला आहे. एखाद्या शैक्षणिक वर्षांतील रिव्हिजनसाठी हा अभ्यासक्रम असणार नाही. असे असूनही एफ.वाय. बीएमएमच्या एक व दोन सत्रांना प्रारंभ करण्यात आला. १ एप्रिल रोजी स्थापन करण्यात आलेल्या नव्या अ‍ॅड-हॉक बोर्डाने याबाबतचा अंतिम निर्णय घेतला. बीएमएम पदवीचा मराठी भाषेतील अभ्यासक्रम ठरविण्यासाठी प्रा. संजय रानडे हे निमंत्रक असलेल्या उपसमितीची स्थापना करण्यात यावी व तिच्याकडे या संदर्भातील सर्व अधिकार द्यावेत, असा निर्णय बीएमएम अभ्यासक्रमासंदर्भातील अ‍ॅड-हॉक बोर्डाच्या १५ जानेवारी २००९ च्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयावर बोर्डाच्या २५ फेब्रुवारी २००९ रोजी झालेल्या बैठकीत पुन्हा शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याला अ‍ॅकॅडेमिक कौन्सिलच्या २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात

 

आली. तसेच बीएमएम पदवीच्या इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रमाच्या सादर करण्यात आलेल्या रचनाबंधाला आहे त्या स्वरूपात या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्या अभ्यासक्रमात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. मात्र एप्रिलमध्ये अ‍ॅड-हॉक बोर्डाची स्थापना झाली त्या वेळेस या इंग्रजी अभ्यासक्रमात कोणतेही कारण न देता बदल करण्यात आले होते. बीएमएमच्या पहिल्या वर्षांतील दोन्ही सत्रांना देण्यात आलेल्या विविधांगी विषयातील तज्ज्ञांना या प्रक्रियेत समाविष्ट करून न घेताच हा निर्णय घेण्यात आला होता.
नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरच फेरबदल करण्यात आलेला हा अभ्यासक्रम सर्व महाविद्यालयांच्या हाती पडला. प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमात काही बदल केले गेले असताना, अशा रीतीने ही बाब कळविली जाणे हेच मुळात अशैक्षणिक आहे. ते बदल का करण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अभ्यासक्रमामध्ये बदल करणे, तो अद्ययावत करणे आवश्यक आहे, असे सांगितले जात असले तरी ही सर्व प्रक्रिया मूळ उद्दिष्टापासून भरकटलेली असून, ते निर्णय पूर्ण विचार करून घेतले जात असावेत असे वाटत नाही. पदवीचे मुख्य उद्दिष्ट व विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम बनविण्यात आलेला नाही.
विषयाचा गाभा व उद्दिष्टे यांच्याशी अजिबात ताळमेळ बसत नसलेल्या या अभ्यासक्रमामध्ये अनेक चुका आहेत. त्यामध्ये संदर्भग्रंथांची सूची दिलेली नाही. जिथे जिथे संदर्भग्रंथांचा उल्लेख केला आहे तिथे ग्रंथाचे शीर्षक व लेखकाचे नाव बऱ्याचदा चुकीचे दिलेले आढळते. त्यामुळे अभ्यासक्रम तयार करण्याचा अनुभव नसलेल्या लोकांकडून तो तयार करून घेण्यात आला असावा, असे स्पष्टपणे जाणवते. ‘बुद्धिवंतांची खाण’ असा लौकिक असलेल्या मुंबई विद्यापीठाचा उपहास करण्याची संधी या अभ्यासक्रमामुळे सर्वाना मिळत आहे. बीएमएमच्या सत्र १ च्या ‘इफेक्टिव्ह कम्युनिकेशन’ या विषयाच्या अभ्यासक्रमात काही गृहीतकांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याबद्दल तर न्यायालयातच दाद मागायला हवी.
प्रसारमाध्यमांसंदर्भातील अभ्यासक्रमाच्या मराठी अनुवादाबद्दल बरेच काही म्हटले गेले आहे. यासाठी समर्थनार्थ अनेक विदेशी विद्यापीठांचे दाखले देण्यात येत आहेत. मात्र इंग्लंड, अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग, ऑस्ट्रेलियासारख्या देशांतील अग्रगण्य विद्यापीठे, तसेच भारतातील जेएनयू, जामिया मिलिया, सिम्बियॉसिस, एक्सआयसी यासारख्या विद्यापीठांतील प्रसारमाध्यमविषयक अभ्यासक्रम तपासल्याचे, अभ्यासक्रमाचा सरसकट अनुवाद करून तो समाविष्ट केला गेल्याचे कुठेही आढळून येणार नाही.
पत्रकारिता, जाहिरात, जनसंपर्क, मार्केटिंग या क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षण देता यावे यासाठी सध्याच्या बीएमएम अभ्यासक्रम निश्चित केला असल्याचे सांगितले जाते. पण इथे हे सांगितले पाहिजे, की अन्य बहुतांश विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचा अभ्यासक्रम ‘अंडरग्रॅज्युएट’ पातळीवर राबविण्यात आलेला नाही. हा अभ्यासक्रम शहर व राज्यांमध्ये विलक्षण लोकप्रिय आहे. साऱ्या देशातून मुले या अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. विद्यार्थी इथे शिकायला येतात (त्यांना नोकऱ्या मिळाव्यात, हे इथे प्रमाण उद्दिष्ट नाही.) हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांचे, तसेच प्रसारमाध्यमे व जाहिरात क्षेत्राचे या अभ्यासक्रमाबद्दल अत्यंत अनुकूल असेच मत आहे.
बीएमएम अभ्यासक्रमाच्या अनेक विषयांमधील पाठय़क्रमात करण्यात आलेले बदल गुणवत्तेच्या निकषावरसुद्धा पूर्णपणे उतरत नाहीत. सुधारित पाठय़क्रम हा घाईगर्दीने तयार केला असून, दर्जेदार वाटत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून केलेला नाही. या संदर्भातील सर्व टीकेबाबत दुर्लक्ष करण्यात आले. या टीकेची साधी दखलही अ‍ॅकॅडेमिक बैठकीत घेण्यात आली नाही.
बीएमएमचा सुधारित अभ्यासक्रम मुंबईतील पत्रकार, तसेच मराठीच्या प्राध्यापकांचा समावेश असलेल्या ‘टीम’ने तयार केला आहे. या टीममध्ये समावेश असलेल्या बीएमएम विषयाच्या दोन प्राध्यापकांच्या गाठीशी हा विषय शिकविण्याचा फक्त दोन वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे बीएमएमचा सुधारित इंग्रजी अभ्यासक्रम तयार केलेल्या तज्ज्ञांनी या प्रक्रियेत इंग्रजी प्रसारमाध्यमांतल्या पत्रकारांनाही सामावून घेणे आवश्यक होते. बीएमएम विषय शिकविणाऱ्या अनुभवी शिक्षकांना, जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञांनाही अभ्यासक्रम सुधारणा समितीवर घेण्यात यायला हवे होते. त्यामुळे काही शिक्षणतज्ज्ञांनी या सर्व घडामोडींबाबत व्यक्त केलेली चिंता व टीका योग्यच आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न ५६ विद्यापीठांत बीएमएमचा अभ्यासक्रम उत्तम प्रकारे चालविला जातो. अशा पाश्र्वभूमीवर सुधारित अभ्यासक्रमात उणिवांवर होणाऱ्या टीकेचा गांभीर्याने विचार केला जायला हवा.
प्रा. नंदिनी सरदेसाई
(अनुवाद : समीर परांजपे)