Leading International Marathi News Daily
गुरुवार । १८ जून २००९
  एव्हरेस्ट अणि अस्मिता
  ओपन फोरम
स्वयंपाक करायला आवडतं का?
  ग्रूमिंग कॉर्नर
करिअर कन्फ्युजन
  थर्ड आय
नवीन शिक्षण पद्धती, श्रीमंती की..?
  मेल बॉक्स
  स्मार्ट बाय
  क्रेझी कॉर्नर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं ‘पिकॉक’
  यंग अचिव्हर्स
वेल बिगनइज हाफ डन्
  यंग अचिव्हर्स
‘मला कार्डिऑलॉजिस्ट व्हायचंय!’
  ब्यूटी कॉर्नर
दंतचिकित्सा : फक्त काही क्षणात

घरोघरी
रिझल्ट
देवकी- दिशा, अगं तुझं लक्ष कुठाय? कुठे हरवली आहेस एवढी? ती ब्रेडची स्लाईस केव्हाची हातात धरून बसली आहेस?
दिशा- अं, हं, हं.
देवकी- दिशा, परत तेच.
दिशा- आई, पहाटे पडलेली स्वप्नं खरी होतात का गं?

 

देवकी- ते स्वप्नांवर अवलंबून असतं.
दिशा- म्हणजे?
देवकी- म्हणजे असं वेडाबाई की, स्वप्नं छान असेल तर खरं होणार आणि वाईट असेल तर नाही खरं होणार.
दिशा- ए आई, सांग ना, असं काय करतेस?
देवकी- तुला पडलेलं स्वप्नं खरं होणार नाहीए.
दिशा- खरंच? मग बरं झालं, टेन्शन गेलं माझ्या डोक्यावरचं.
देवकी- हो नं. मग चल पटकन ब्रेकफास्ट संपव आणि मला भाजी चिरून दे बरं.
दिशा- आई, पण मला पडलेलं स्वप्नं तुला सांगितलंच कुठे मी?
देवकी- ..
दिशा- आणि तरी तू कसं म्हणालीस की स्वप्नं खरं होणार नाही म्हणून?
देवकी- आपण परीक्षेत नापास झालोय. सगळेजण आपल्याला हसताहेत. आपली चेष्टा करताहेत. कोणाला तोंड दाखवावंसं वाटत नाहीये. काय करावं कळत नाहीये..
दिशा- हो ग. अगदी असंच स्वप्नं पडलं मला, पण तुला कसं कळलं?
देवकी- रिझल्ट जवळ यायला लागला ना की अशीच स्वप्नं पडतात सगळ्यांना.
दिशा- आई, मी पास होईन ना गं?
देवकी- होणारच आहेस तू पास, यात काही शंकाच नाही.
दिशा- आणि समजा मी नापास झाले तर?
देवकी- पण तू नापास होणारच नाहीयेस तर.
दिशा- समजा गं. समजा मी नापास झालेच तर तू काय करशील?
देवकी- माहीत नाही बाई. कारण हा विचारच मी केला नाहीये. उलट तू पास झाल्यावर काय काय करायचं याची मात्र सगळी जय्यत तयारी केली आहे बरं का.
दिशा- आई, पण मला खूप भीती वाटते आहे.
देवकी- भीती? कशाची?
दिशा- नापास होण्याची.
देवकी- हे काय वेडय़ासारखं दिशा? कालपर्यंत तुला भीती वाटत नव्हती आणि अचानक कशी भीती वाटायला लागली.
दिशा- अगं, परवा हर्षू सांगत होता की या वर्षी पेपर खूप अवघड तपासले आहेत. त्यात मला आज सकाळी मी नापास झाल्याचं स्वप्न पडलं.
देवकी- हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. असं काही होणार नाही.
दिशा- पण आई, मी नापास झाले तर तुला आवडेनाशी होईन का गं?
देवकी- तू आम्हाला आवडणं, न आवडणं तुझ्या मार्कावर अवलंबून आहे का दिशा? आई-वडील आणि मुलांमधलं नातं इतक्या कच्च्या पायावर आधारलेलं नसतं.
दिशा- मग चिन्मयला कमी मार्क पडले तर त्याच्या आईबाबांनी त्याच्याशी बोलणंच टाकलं. अक्षदाला तर तिच्या आई वडिलांनी सांगितलय की, नापास झालीस तर सरळ लग्नच लावून टाकू.
देवकी- ..
दिशा- तुला माहित्येय, आमच्या शाळेत ती नंदिता होती ना तिनं तर आत्महत्याच केली..
देवकी- दिशा, उगीच नाही नाही ते विचार मनात आणू नकोस आणि हे बघ, तुझा रिझल्ट कसाही लागला तरी आम्हाला फरक पडणार नाही, तू पास झाल्याचा, चांगले मार्क मिळवल्याचा आनंद निश्चितच होईल. पण तुझा रिझल्ट समजा वाईट लागलाच तर आम्हाला वाईट वाटणार नाही, असं सांगितलं तर ते खोटं ठरेल. आम्हाला वाईट वाटेल ते तुझ्या कष्टाचं चीज झालं नाही म्हणून. पण हे वाईट वाटणं आपला कायमचा ताबा घेत नाही. कारण शेवटी हे अपयश म्हणजे आयुष्याचा शेवट नसतो, परत प्रयत्न करायचा एवढं काय? बरं, ते जाऊ दे. मी पण अगदी अशा थाटात तुला समजावते आहे की जसा काही तुझा रिझल्ट लागलाच आहे.
दिशा- जसा जसा रिझल्टचा दिवस जवळ येतोय ना, तसं तसं टेन्शन खूप वाढत चाललंय.
देवकी- अगं, सगळ्यांनाच असं होतं आणि मग नाही नाही ते विचार डोक्यात यायला लागतात, पण या नकारार्थी विचारांना कटाक्षानं दूर ठेवायचं. be positive... आणि आता जे काय होणार आहे ते होणारच आहे. ते बदलता येणार आहे का? मग कशाला टेन्शन घ्यायचं?
दिशा- तू म्हणतेस ते बरोबर आहे गं, पण कशातच मन लागत नाहीये.
देवकी- न लागायला काय झालं? चल, सगळेजण रिझल्ट लागल्यानंतर सेलिब्रेट करतात. आपण आधीच करू.
दिशा- आई, नको ना. माझा खरंच मूड नाहीये.
देवकी- दिशा, अगं माझा रिझल्ट होता ना, तेव्हा मलाही असंच टेन्शन आलं होतं. तेव्हा आजोबा मला चक्क एका सिनेमाला घेऊन गेले होते. आम्ही सिनेमा पाह्य़ला. नंतर हॉटेलमध्ये गेलो. ओ येईस्तावर खाल्लं आणि परत आलो. चल, आज आपणही तेच करूया.
दिशा- असं म्हणतेस? चल मग. पण आई, सिनेमाला नको. त्याऐवजी आपण लांब कुठे तरी फिरायला जाऊ या. खूप दिवस झाले, आपण कुठे गेलोच नाही. चालेल?
देवकी- चालेल? अगं, पळेल, पण एका अटीवर.
दिशा- ती काय?
देवकी- तिथे परत रिझल्टचा विषय काढायचा नाही.
दिशा-ओके बाबा, ओके, चल जाऊया.
शुभदा पटवर्धन
shubhadey@gmail.com