Leading International Marathi News Daily
गुरुवार । १८ जून २००९
  एव्हरेस्ट अणि अस्मिता
  ओपन फोरम
स्वयंपाक करायला आवडतं का?
  ग्रूमिंग कॉर्नर
करिअर कन्फ्युजन
  थर्ड आय
नवीन शिक्षण पद्धती, श्रीमंती की..?
  मेल बॉक्स
  स्मार्ट बाय
  क्रेझी कॉर्नर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं ‘पिकॉक’
  यंग अचिव्हर्स
वेल बिगनइज हाफ डन्
  यंग अचिव्हर्स
‘मला कार्डिऑलॉजिस्ट व्हायचंय!’
  ब्यूटी कॉर्नर
दंतचिकित्सा : फक्त काही क्षणात

थर्ड आय
नवीन शिक्षण पद्धती, श्रीमंती की..?

आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणाऱ्यांना डोळे उघडायला लावणारं सदर ‘थर्ड आय’.
तिच्या नवीन शाळेचा तो पहिला दिवस होता. शक्यतो शाळा, दप्तर, गणवेश यांचा मुलांना कंटाळा असतो. पण ती त्या दिवशी खूप खूश होती. कारण एका मोठय़ा सुट्टीनंतर तिला त्या दिवशी तिच्या मित्र-मैत्रिणी भेटणार होत्या आणि मुख्य म्हणजे आता या शाळेत रोज गणवेश घालायला लागणार; शूज आणि सॉक्स आणि टाय बांधायला लागणार याचं तिला कौतुक होतं. आणि कुतूहलसुद्धा!
कुतूहल एवढय़ासाठी की अगदी गेल्या वर्षीपर्यंत, बालमंदिरात ती तिच्या आवडीचे, फुलाफुलांचे, रंगीबेरंगी असे कुठलेही कपडे घालून शाळेत जायची. आणि आता पहिलीत गेल्यावर (सॉरी सॉरी स्टॅण्डर्ड फस्र्ट) रोज तेच तेच कपडे घालून शाळेत

 

जायचं ह्य़ाचं तिला अप्रूप वाटत होतं. आता पूर्वीसारखं शाळेच्या वर्गापर्यंत सोडायला कोणी आलं नव्हतं. आता शाळेच्या फाटकातूनच तिने पाठीवरच ‘फर्स्ट स्टॅण्डर्डचं’ ओझं घेऊन, तिसऱ्या मजल्यावरचा आपला वर्ग गाठला होता. गेली एकदाची पोरं शाळेत, असं म्हणत पालकही घरी परतले.
संध्याकाळी मात्र शाळा सुटल्यावर ती हमसून हमसून रडली. थैमान घातलं तिने! या वर्षी तिच्या सर्व मैत्रिणी विखुरल्या गेल्या होत्या. कोणी एस.एस.सी.च्या इंग्रजी माध्यमात, तर कोणी ‘माय मराठी’ माध्यमात! कउरए च्या श्रीमंत शिक्षणात ती आज एकटी पडली होती. मग तिचा आई-बाबांवर प्रश्नांचा भडिमार सुरू झाला. ‘आम्ही सगळ्या एकाच शाळेत ना? सगळ्या फर्स्टमध्ये ना? मग त्या दोघी मराठीत का? आणि त्या तिघी एस.एस.सी.ला का? आई एस.एस.सी. म्हणजे काय असतं? बाबा कउरए म्हणजे काय असतं? आमच्या सगळ्यांची शाळा एकच, मग त्यांना युनिफॉर्म वेगळा आणि आम्हाला वेगळा असं का? माझ्या सर्व वह्य़ा-पुस्तकांना कम्पल्सरी कव्हर्स आणि त्यांच्या मात्र छान छान डिझाईनच्या वह्य़ा, असं का?
बालवयातल्या तिच्या त्या प्रश्नांना उत्तरे देताना, तिच्या पालकांच्या मात्र नाकी नऊ आले. सेक्रेटरीविना, नवखा मंत्री पत्रकारांच्या प्रश्नांच्या भडिमाराने जसा भांबावून जातो ना, तसंच झालं अगदी त्या पालकांचं! पण ‘तू गप्प बस! तुझे आई-बाबा तुझ्या भल्यासाठीच सगळं करतायत’ असं ऐकवून तिला त्यांनी गप्प केलं खरं. पण खरं उत्तर त्यांच्याकडेही नव्हतं. अख्खं जग आता या जीवनपद्धतीच्या अभ्यासक्रमाला चांगलं म्हणतंय, शिक्षकसुद्धा मनात ‘तेच’ भरवतायत म्हणून ते भल्यासाठी! मोर नाचला म्हणून लांडोर नाचते तसा प्रकार!!
खरंच, किती पालकांना या जुन्या-नव्या शिक्षणपद्धतीतला फरक माहीत असेल, हल्ली तर जवळजवळ दर आठवडय़ाला या नव्या शिक्षणपद्धतीबद्दल कुठे ना कुठे तरी, काही तरी छापून येत असतं. पण किती पालकांना त्याबद्दल जाणून घ्यावसं वाटतं? काहीजण तर कउरए म्हणजे ‘भूत’ असं समजून त्याचा बागुलबुवा उभा करतायत. तर काही जण कउरए म्हणजे अतिश्रेष्ठ अशी शेखी मिरवतायत. पण पहिली यत्तेत गेलेल्या त्या चिमुरडीची तर आता कुठे जीवनाची सुरुवात होते आहे. हसण्या-खेळण्याचं, बागडण्याचं वय आणि मग त्यातूनच सहवासातून शिक्षणाची गोडी निर्माण होत असते या वयात! तिथे पालकांच्या मर्जीनुसार, खरं तर अट्टहासापायी, तिच्या त्या बालविश्वात आतापासूनच फाटाफुटीचं दु:ख ती पचवू शकेल?
‘लहान मुलांना काय कळतंय?’ असं म्हणून, हिणवून त्या चिमुरडय़ांना नेहमीच आपण क्षुल्लक तर मानत नाही ना? आपल्याच शाळेतल्या, आपल्याच बरोबरीच्या दुसऱ्या मैत्रिणीशी, आज ती चिमुरडी तुलना करू लागली. ती आणि तिच्या मैत्रिणी एकाच शाळेत, पण दोघींच्या शिक्षणपद्धतीत आणि ती राबवण्यात भेदभाव का? हा तिचा बालप्रश्न रास्त असू शकत नाही का? कउरए या नव्या श्रीमंत शिक्षणपद्धतीच्या नियमावलीत एक नियम आहे. शाळेच्या एकाच प्रांगणात, एकाच इमारतीत दोन भिन्न शिक्षणपद्धती राबवू नयेत, असा कडक नियम आहे. मग किती शाळा या नियमांचं पालन करतात? अशी नियमांची पायमल्ली करून जर शाळा चालवल्या जात असतील, तर आमच्यात भेदभाव का? असा प्रश्न त्या चिमुरडय़ा बालकांनी उपस्थित केला तर त्यात चूक काय?
जुनी शिक्षणपद्धती व नवीन शिक्षणपद्धती, यात श्रेष्ठ काय? हा वाद तर रोज रंगतच जाणार आहे. बुिद्धवंतांमध्ये त्यावर बुद्धी हा खेळ खेळण्याची आणि आपापल्या बुद्धिमत्तेनुसार अकलेचे तारे तोडण्याची स्पर्धा तर कधीच सुरू झाली आहे. एखाद्या जुनाट गोष्टीत, आमूलाग्र बदल घडवून आणायचा म्हणजे हे असे वाद रंगणारच. परंतु तो आमूलाग्र बदल, त्याची नियमावली आपण कोळून प्यायलो आहोत अशा आविर्भावात जर आपले शिक्षणसम्राट, शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षक, मनमानी कारभार करत असतील तर मग असे वाद रोज रंगणारच.
नवीन शिक्षणपद्धती ही ‘श्रीमंत’ शिक्षणपद्धती आहे यात मात्र वाद नाही, पण ती जाणूनबुजून ‘श्रीमंत’ केली गेली का? कउरए आणि उइरए सारख्या शिक्षणपद्धतीत, शिक्षणाचं माध्यम इंग्रजीच असावं, असा नियम आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तुलनेत, इथलं शिक्षण कमी पडू नये हा त्यामागचा उद्देश असू शकेल कदाचित! पण म्हणून शैक्षणिक माध्यम इंग्रजी या सबबीखाली, पूर्ण शालेय जीवनक्रमच ‘पाश्चात्त्य’ असायलाच हवा का? शिक्षणाच्या मूलभूत गरजांपेक्षा, मुलांच्या बाह्य़ स्वरूपालाच श्रीमंती थाटात सजवायची गरज आहे का? नवीन ‘श्रीमंत’ शिक्षणपद्धती अवलंबलेल्या कित्येक शाळांमधून मुलांच्या गणवेशात, मुलांच्या शूज-सॉक्समध्येच जरा अति श्रीमंती लक्ष दिलं जातं. कउरए च्या नियमावलीत मात्र कुठेच अशा ‘छानछोकी’चा उल्लेख नाही. आता काही शाळा तर आपल्या विद्यार्थ्यांच्या दप्तरांचेही ठरविक रंग असावेत, असा हट्ट करू लागल्या आहेत. मग कदाचित अतिउत्साही शाळावाले, विद्यार्थ्यांची हेअरस्टाइल आणि विद्यार्थिनींच्या हेअरकटवरसुद्धा ‘स्टाइल’ ठरवतील. पण खरंच अशा छानछोकी, दिखाऊपणाची या शिक्षणपद्धतीला जोड असण्याची काही गरज आहे का?
उलट या नवीन शिक्षणपद्धतीची नियमावली बघितलीत, तर कित्येक गोष्टी खूप अभ्यास करून, विचार करून अमलात आणण्यासारख्या आहेत. या नवीन शिक्षणपद्धतीच्या नियमावलीनुसार, वर्गात जास्तीत जास्त ४० विद्यार्थीच असावेत, असा नियम आहे. वर्गाचे क्षेत्रफळही २० फूट ७ २० फूट असावे असे निर्देशित केले आहे. शाळेची इमारत व शाळेचे प्रांगण हे किमान दीड ते दोन एकर जागेत असायलाच हवे असे कडक निर्देश आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा वेळ आणि इतर वेळ याची विभागणी करताना, त्या विद्यार्थ्यांला मानसिक दडपण येणार नाही याची काळजी घेता येईल, असा हा अभ्यासक्रम आहे. जुन्या शिक्षणपद्धतीतही विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीकडे आणि मानसिक दडपणाकडे लक्षच दिलं गेलं नाही, असं अजिबात नाही, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसे.
जुनी किंवा पारंपरिक एसएससी शिक्षणपद्धती श्रेष्ठ की, नवीन श्रीमंती थाटाची कउरए शिक्षणपद्धती श्रेष्ठ, असा वादाचा मुद्दा का आणि कोणी उपस्थित केला कोणास ठाऊक? विद्यार्थ्यांचं, पालकांचं मत लक्षात घेण्याऐवजी, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणसम्राट आणि काही शिक्षक मंडळीच हा श्रेष्ठत्वाचा वाद पेटता ठेवत आहेत की काय असं वाटतं. कारण अनेक कउरए शिक्षणपद्धतीच्या शाळांमधून, आता विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मदतीसाठी पालक संघटना आहेत. त्या पालकांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल (?) भवितव्यासाठी स्वखुशीनं निवडलेली ही शिक्षणपद्धती आहे. त्यामुळे पालकांचा या नव्या आमूलाग्र बदलाला विरोध असण्याची शक्यताच नाही. पण..
पण आपल्या ईर्षेमुळे किंवा हट्टापायी आपण आपल्या मुलाबाळांवर, नकळत ही शिक्षणपद्धती लादत तर नाही ना? याचाही पालकांनी विचार करायलाच हवा आणि तेही दुसरी, जुनी, पारंपरिक शिक्षणपद्धती अजूनही उपलब्ध असताना! एकाच वेळी, एकाच शाळेत, दोन भिन्न शिक्षणपद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं (खरं तर, जे कउरए च्या नियमावलीला धरून नाही) तेव्हा नकळत त्या विद्यार्थ्यांमध्ये उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ असे भाव निर्माण होत नाहीत ना? याचीही काळजी घ्यायला हवी. पारंपरिक शिक्षणपद्धतीतून घेतलेलं शिक्षण कनिष्ठ किंवा तुच्छ आणि श्रीमंती थाटातलं शिक्षण म्हणजेच सुखदायक किंवा श्रेष्ठ असा समजही या विद्यार्थ्यांच्या मनात येता कामा नये ही जबाबदारी ‘सुजाण’ पालकांची!
संपूर्ण लेखात, मी या नवीन शिक्षणपद्धतीचा उल्लेख करताना ‘श्रीमंती शिक्षणपद्धती’ असा उल्लेख जाणूनबुजूनच करत आहे. कारण अनेक पालकांचा या शिक्षणपद्धतीला विरोध नसून खरं तर त्या शिक्षणपद्धतीच्या ‘श्रीमंती थाटा’लाच विरोध आहे. परंतु चंगळवादाच्या मागे लागलेली ही मनुष्यजात, ही वस्तुस्थिती स्वत: मान्य करत नाही. आणि विरोधच करायचा असेल तर आमूलाग्र बदलापेक्षा, त्यातल्या छानछोकी, कॉर्पोरेट प्रेझेन्टेशनला विरोध करायची धमक बाळगत नाही हेच खरं दु:ख आहे.
संजय पेठे
sanjaypethe@yahoo.com