Leading International Marathi News Daily
गुरुवार । १८ जून २००९
  एव्हरेस्ट अणि अस्मिता
  ओपन फोरम
स्वयंपाक करायला आवडतं का?
  ग्रूमिंग कॉर्नर
करिअर कन्फ्युजन
  थर्ड आय
नवीन शिक्षण पद्धती, श्रीमंती की..?
  मेल बॉक्स
  स्मार्ट बाय
  क्रेझी कॉर्नर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं ‘पिकॉक’
  यंग अचिव्हर्स
वेल बिगनइज हाफ डन्
  यंग अचिव्हर्स
‘मला कार्डिऑलॉजिस्ट व्हायचंय!’
  ब्यूटी कॉर्नर
दंतचिकित्सा : फक्त काही क्षणात

मेल बॉक्स
रॅगिंगला प्रतिबंध केलाच पाहिजे

रॅगिंग हा एक भयंकर प्रकार आहे. याला प्रतिबंध केलाच पाहिजे. रॅगिंगमुळे सीनियर्सची मजा होते. पण ज्युनियर्सचा जीव जातो त्याचं काय? नुसत्या समित्या स्थापन करुन काही होत नाही. त्यासाठी प्रॅक्टीकली काहीतरी करायला हवे. तेव्हाच सिनियर्सना कळेल की कायदा काय असतो. रॅगिंग करणारी मुले श्रीमंतांची असतील तर

 

प्राचार्य वा इतर शिक्षकही त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतात. यामुळेही रॅगिंगला मोठय़ा प्रमाणावर वाव मिळतो. यासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये अ‍ॅण्टी रॅगिंग सेक्शन स्थापन करुन योग्य ती कायदेशीर अथवा सामंजस्याने कारवाई करावी.
नितीन जमादार, डोंडाइचा

अभारतीय रॅगिंग!
‘से नो टू रँगिंग’ लेखामधले रॅगिंग हा गुन्हा आहे व त्याला कळत नकळत पाठिंबा देणे हाही गुन्हाच आहे हे सर्वानी समजून घ्यायला हवे. तरच रॅगिंग करणाऱ्यावर जरब बसेल, हे स्वाती केतकर यांचे विचार पटतात.
भारतीय संस्कृतीत अपशब्दोच्चारण, धूम्रपान, मद्यप्राशन, तंबाखू सेवन, अभक्ष भक्षण, जुगार, शिकार (हिंसा-परपीडा) विवाहपूर्व/ विवाहबाह्य़ स्त्री-पुरुष लैंगिक संबंध व भ्रष्टाचार या नऊ निंद्य निषिद्ध गोष्टींची गणना कुव्यसनात होते. रॅगिंगमध्ये परपीडा (शारीरिक/ मानसिक) सामावत असल्याने भारतीय संस्कृतीसाठी ते कुव्यसनच आहे. व्यसन म्हणजे वाईट खोड आणि ‘जित्याची खोड..’ ही म्हण प्रसिद्धच आहे. रॅगिंगची दीक्षा मिळालेला व रॅगिंग करण्यास चटावलेला विद्यार्थी पुढे त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाचे रॅगिंग (छळ) करून त्यामधून विकृत असुरी आनंद मिळवत असतो. त्यामुळे रॅगिंग ही विषवल्ली मुळापासून उखडून काढायला हवी.
रॅगिंग हा भारतीय संस्कृतीस घातक असा प्रकार १९६० च्या सुमारास पश्चिमेकडून भारतात आयात झाला. १९५९ जूनमध्ये एसएससीनंतर मी जेव्हा रुईया महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञानासाठी प्रवेश घेतला तेव्हा तिथे रॅगिंग हा प्रकारच नव्हता. किंबहुना रॅगिंग हा शब्दसुद्धा त्यावेळी माझ्या ऐकिवात नव्हता. पुढे १९६१ या जूनमध्ये मी जेव्हा व्हीजेटीआयमध्ये दाखल झालो तेव्हा पहिल्याच दिवशी महाविद्यालयाच्या व्हरांडय़ात मला काही सीनियर्सनी हटकले व प्रथम सरळसाधे व नंतर हळूहळू तिरकस (फालतू) प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. शेजारून माझा रुईयामधला एक मित्र जात होता. त्याने मला पाहिले व थांबून मला म्हणाला, ‘डोंट वेस्ट युवर टाइम इन टॉकिंग टू फूल्स’ व माझ्या हाताला धरून पुढे घेऊन गेला. नंतर मला म्हणाला, ‘तू आता जे अनुभवलेस त्याला रॅगिंग म्हणतात.’ असा माझा रँगिगशी परिचय झाला. आमचा रुईयामधला मित्रांचा ग्रुप मोठा असल्याने आम्हाला कुणालाही रॅगिंगचा त्रास झाला नाही.
रॅगिंग सीनियर-ज्युनियर या एकदिशी संबंधाची तुलना परंपरागत सासू-सून या एकदिशी नातेसंबंधाशी केली जाते ते चुकीचे आहे. कारण सासू सुनेचा छळ करायची तो तिला वळण लावण्यासाठी/ घडविण्यासाठी (बहुसंख्य सुनांनी नंतर हे कबूल केले आहे.) पण सीनियर्स ज्युनियर्सचे रॅगिंग (छळ) करतात त्यातून विकृत/असुरी आनंद मिळविण्यासाठी व त्यांना उपरोक्त सर्व कुव्यसनाच्या दीक्षा घेऊन बिघडविण्यासाठी. तीन-चार वर्षांपूर्वी दूरचित्रवाणीवरच्या ‘बिनधास्त’ कार्यक्रमात एक रॅगिंग करण्यात प्रवीण विद्यार्थी, ‘नवे विद्यार्थी लाजरे-बुजरे, भेदरलेले असतात. रॅगिंगच्या माध्यमातून आम्ही त्यांना रफ-टफ बनवितो, आजच्या जगात जगायला लायक (की नालायक?) बनवतो ज्यामध्ये ‘भ’च्या व ‘म’च्या बाराखडीपासून अनेक प्रगत ट्रेनिंग्ज असतात,’ अशा फुशारक्या मारीत होता!
आपल्या महाविद्यालयामध्ये/वसतिगृहामध्ये रॅगिंग चालते हे सर्वच प्रिन्सिपल्स, प्रोफेसर्स, रेक्टर्स, वॉर्डन्स जाणतात. पण ते थोपविण्यासाठी लागणारी धडाडी, यंत्रणा व आर्थिक तरतूद त्यांच्याकडे नसते. (अपवाद फक्त २००४ साली पुण्याच्या विधी महाविद्यालयामध्ये झालेल्या भयानक सामूहिक रॅगिंगचा. तिथल्या प्राचार्या वैजयंती जोशी यांनी सखोल चौकशी करून २६ दोषी विद्यार्थ्यांना- ज्यामध्ये सात विद्यार्थिनी होत्या- महाविद्यालयामधून काढून टाकले होते. अर्थात नंतर महाविद्यालयाच्या संचालकांनी कच खाऊन ती कारवाई रद्द करून वैजयंती जोशींच्या धाडशी कृतीवर पाणी फिरवले होते.)
या समस्येवर मला एक उपाय सुचतो. सर्वसाधारणत: रॅगिंगचे प्रकार महाविद्यालयामधून व वसतिगृहामधून कॉलेजच्या सुरुवातीचे १-२ महिनेच चालतात. या कालावधीमध्ये स्वत:स हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या राजकीय पक्षांनी/ संघटनांनी आपल्या स्वयंसेवकां/ सैनिकांकरवी शहरातल्या सर्व महाविद्यालयांमध्ये व वसतिगृहांमध्ये दिवसाची व रात्रीची गस्त घालावी व रॅगिंग रोखावे. त्या त्या गावामधल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनासुद्धा या भारतीय संस्कृती संरक्षणाच्या महत्त्वपूर्ण कामात हातभार लावता येईल. रॅगिंग करणारे बहुसंख्य विद्यार्थी परप्रांतीय- बडे बापके बेटे- असतात असे आढळून आले आहे. त्यामुळे मराठी माणूस हा मुद्दा घेऊन मराठी माणसाचे भले करू पाहणाऱ्या राजकीय पक्षांनासुद्धा या मोहिमेत भाग घेऊन परप्रांतीय गुंडांचा बंदोबस्त करता येईल व महाराष्ट्र धर्म राखता येईल.
अशोक सहस्त्रबुद्धे, मुलुंड

योग्य ती पावले उचलणे गरजेचे
मी व्हिवामधील रॅगिंगविषयीचे आर्टिकल वाचले. कॉलेजमध्ये नवीन प्रवेश घेणारी मुले त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक नवीन पाऊल उचलत असतात आणि त्याच वाटेवर त्यांना काही वेळा रॅगिंगसारख्या प्रकाराला सामोरे जावे लागते.
कोणतीही गोष्ट एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गेली की तिचे दुष्परिणाम समोर येतात. रॅगिंगचेही तसेच आहे. आयुष्यात मौजमजा, मस्ती कोणाला नको असते. पण ते साध्य करताना दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्याचा, जीवनाचा खेळ होत असेल तर त्याहून वाईट गोष्ट कोणतीच नसेल.
नवीन विद्यार्थ्यांने स्वत:चा इंट्रो करून देणं, सीनियर्सना (काही वेळापुरतं) सर/मॅडम म्हणणं, त्यांच्या समोर गाणं म्हणणं इतपर्यंत ठीक आहे. पण त्याला शारीरिक, मानसिक त्रास होईल असं कृत्य करणं, लाज वाटेल किंवा इजा होईल असं करणं हे नक्कीच घृणास्पद आहे.
रॅगिंग विरोधी समित्या स्थापून काही निष्पन्न होणार नाही. जागृती करायची झाली तर ती मुळातच व्हायला हवी. त्यासाठी मुलांनाच काहीतरी करणे आवश्यक आहे. निदान शिक्षकांनीच त्यांचे याविषयी प्रबोधन करणे (तेही ज्युनिअर्सना) गरजेचे वाटते. कारण रॅगिंग करणारेच काही वर्षांपूर्वी त्या फेजमधून गेलेले असतात. हा प्रकार काय आहे किंवा काय होऊ शकेल हे ते जाणून असतात.
ज्युनियर्सना जर योग्य मार्गदर्शन केले तरच ते पुढे जाऊन सीनियर्स झाल्यावर त्यांच्या ज्युनियर्सना असे काही करावयास भाग पाडणार नाहीत.
रॅगिंगचे लोण शाळेत पोहोचण्यापूर्वीच योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे.
अजय पडवळ, ओमान

गेल्या महिन्यातील (२८ मे) रॅगिंगचं आर्टिकल वाचलं. त्यात बऱ्याच गोष्टींचा आढावा न घेतल्याचं आढळलं.
आपल्या जवळपास अशा कित्येक घटना घडत असतात; परंतु त्यांची दखल कोणीच घेत नाही. म्हणून या रॅगिंगशी संबंधित दोन घटना शेअर कराव्याशा वाटल्या.
मी ज्या कॉलेजमध्ये होते तेथे सीनियर आपल्याच धुंदीत असायचे. मुलींना धक्का मारणे, त्यांना बघून कॉमेण्ट पास करणं एवढंच नाही तर मुलं लेडीज टॉयलेटमध्ये जाऊन नंतर सॉरी म्हणायची. आम्ही नवीन असल्यामुळे त्यांची तक्रार कोणाकडे करायची हे माहीत नव्हते. आपण फार ग्रेट आहोत, असा आव आणत सगळीकडे फिरणं हेच या सिनीयर्सचे काम.
पण एके दिवशी या सर्व गोष्टींचा कहर झाला. माझ्या वर्गातील एका मुलीच्या लांबलचक केसांना च्युइंगम चिकटवले व ते तिला कळलेदेखील नाही. आपल्या केसांवर अतोनात प्रेम करणाऱ्या या मुलीला दुर्दैवाने तिचे केस कापावे लागले. तेव्हा तिला कॉलेजमध्ये ‘च्युइंगम कट’ म्हणून चिडवू लागले. त्यामुळे या मुलीने पुढे कॉलेजला यायचे टाळले. तिचं ते तर वर्ष वाया गेलच पण नंतर ती कधीच कॉलेजला आली नाही. याबाबतची दखलही कॉलेजने घेतली नाही. याचं अजूनही वाईट वाटतं.
असंच काहीसं घडलं ते माझ्या मित्रासोबत. आयटी इंजिनीयर असल्यामुळे मुंबईहून बंगलोरला जाण्याची संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने केले पण काही महिन्यांतच तो परत आला. घरी आल्यावर मात्र भरभरून बोलणारा ‘तो’ गप्प झाला. घरातल्यांना तर्क लावण्यापलीकडे काही पर्यायच उरला नाही. तो कोणाशीच बोलेनासा झाला. मी जेव्हा त्याला भेटायला गेले तेव्हा त्याला पाहून माझ्या अंगावर काटाच आला. टक्कल पडलं होतं. डोळ्याच्या खाली काळं वर्तुळं होतीं. अर्धमेल्या अवस्थेत तो एका कोपऱ्यात एकटाच बसला होता. तो माझ्याशीही काही बोलला नाही. काही दिवसांनी माझ्याच इतर मित्रांकडून कळलं की त्याच्या ऑफिसमध्ये त्याला मानसिक त्रास दिला गेला. सिगरेट पिऊन त्याच्या हातावर चटके दिले. त्याचे मुलांबरोबर वेडेवाकडे फोटो काढून ऑर्कुटवर टाकले. त्याचे केस वाकडेतिकडे कापले. हे सर्व दररोजचे झाले त्यामुळे तो परत आला. आज तो त्याच अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असता हा प्रकार रॅगिंगमध्ये मोडत नाही, अशा गुन्ह्याचे कलम आम्हाला ठाऊक नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन फाइल बंद केली.
या सर्वाची दखल जरी घेतली नसली तरी हा रॅगिंगचाच प्रकार आहे ना? मग याची दखल कोण घेणार?
त्याची दखल कोणी तरी घ्यावी.
स्वप्ना तांबे, पार्ले

व्हिवाचं कौतुक करणाऱ्या पत्रांचं आम्हाला निश्चितच कौतुक आहे. पण त्याहीपेक्षा आम्हाला आवडतील विश्लेषणात्मक पत्रं. तुम्ही विचार करा आणि इतरांना विचार करायला लावा.
व्हिवासाठी मजकूर किंवा पत्र खालील पत्यावर पाठवा- व्हिवा-लोकसत्ता , लोकसत्ता संपादकीय , एक्सप्रेस टॉवर्स , पहिला मजला , नरीमन पॉईंट , मुंबई - ४०० ०२१. अथवा खालील ई मेलवर पाठवा. viva.loksatta@gmail.com