Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

विविध

मुख्यमंत्री खंडुरींना हटविण्यासाठी कोशियारींची राजीनाम्याची खेळी
नवी दिल्ली, १७ जून/खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांतील पराभवानंतर भाजपमध्ये धुमसत असलेला असंतोष संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. उत्तराखंडमध्ये भाजपचा धुव्वा उडाल्यानंतर मुख्यमंत्री भुवनचंद्र खंडुरी यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी व माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोशियारी यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची खेळी करून भाजपमधील कलह आणखी तीव्र केला.

हिंसाचार रोखण्यासाठी स्वत:ची सशस्त्र दले तैनात करा
बुध्ददेव सरकारला केंद्राचा सल्ला
नवी दिल्ली, १७ जून/खास प्रतिनिधी
माओवाद्यांच्या िहसाचाराचे थैमान अनुभवणाऱ्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात राज्य पोलिसांना मदत करण्यासाठी पुरेसे निमलष्करी दल पाठविल्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने पूर्ण शक्तीनिशी वेळीच पावले उचलावी, असा सल्ला केंद्रीय गृहखात्याने आज बुद्धदेव भट्टाचार्य सरकारला दिला. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडत चालल्याबद्दल गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी चिंता व्यक्त केली.

मेरठमध्ये संचारबंदी
मेरठ, १७ जून/पी.टी.आय.

रस्त्यावर वाहन उभे करण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान दोन गटांतील हाणामारीत होऊन जमावाने पोलिसांवरही हल्ला केल्यामुळे येथील काही भागांत आज सकाळी संचारबंदी लागू करण्यात आली. त्याआधी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे स्थानक परिसरात एका व्यक्तीने ट्रॅक्टर आणून उभा केला असता तेथील दुकानदाराने त्यास आक्षेप घेत ट्रॅक्टरचालकास मारहाण केली. त्यातून दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला असता जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.

पाकची बिगरलष्करी मदत तिप्पट करण्यास अमेरिकी सिनेट समितीची मंजुरी
वॉशिंग्टन, १७ जून/पीटीआय
अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या बिगरलष्करी मदतीत तिप्पट वाढ करण्याच्या विधेयकास अमेरिकी सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीने एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे आता पाकिस्तानला दीड अब्ज डॉलरची मदत मिळणार आहे. पाकिस्तान मदत व सहकार्य विधेयक २००९ (पीस अॅक्ट) अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने याआधीच संमत केले होते. या विधेयकाला आता अमेरिकी सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांच्या कालावधीत पाकिस्तानला अमेरिका दरवर्षी दीड अब्ज डॉलरची मदत देईल.

इराणमध्ये आज शोकदिन
तेहरान, १७ जून/पीटीआय

इराणच्या अध्यक्षपदी अहमदिनेजाद यांच्याकडून पराभूत झालेले उमेदवार मीर हुसैन मौसवी यांनी तेहरानमध्ये एका मोर्चाचे आयोजन केले व उद्या शोकदिन पाळण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात मौसवी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, इराणच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरव्यवहार झाले आहेत. या निवडणुकीतील निकालाचा निषेध करण्यासाठी सुरू असलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत आहे. या दडपशाहीत आपले अनेक समर्थक ठार तसेच जखमी झाले असल्याचा दावा त्यांनी केला. या आंदोलकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी उद्या शोकदिन पाळण्याचे मीर हुसैनी मौसवी यांनी ठरविले आहे.

ऑस्ट्रेलियातील काही हल्ले वांशिक असल्याची कबुली
नवी दिल्ली, १७ जून/पी.टी.आय.

ऑस्ट्रेलियामधील भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या काही घटना वांशिक कारणातून घडल्या असल्याची कबुली ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त जॉन मॅकार्थी यांनी आज दिली. या प्रकारच्या घटना रोखण्यासाठी आपल्या सरकारने प्रभावी उपाययोजना केल्याचेही त्यांनी सांगितले. ‘सीएनबीसी’ वाहिनीवर करण थापर यांच्याशी बोलताना मॅकार्थी म्हणाले की, गेल्या महिनाभरात भारतीय विद्यार्थ्यांवर जे हल्ले झाले, त्यातील बहुतांश घटना मेलबर्नच्या गरीब वस्त्यांमध्ये घडल्या असून या भागांत गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. मेलबर्नमध्ये अलीकडील काळात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे ते म्हणाले.