Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

रिमेक ‘बनवाबनवी’चा?
चार मित्रांना राहायला जागा हवी असते. पण काही केल्या त्यांना भाडय़ाचे घर मिळत नसते. शेवटी एक घर त्यांना मिळते. केवळ जोडप्यांनाचाच भाडय़ाने घर देणार, अशी मालकाची अट असते. मग त्यांच्यापैकी दोनजण स्त्रीवेष परिधान करतात. ही आहे ‘पेइंग गेस्ट’ची कथा. लगेचच तुम्हाला ‘अशी ही बनवाबनवी’ आठवला असेल ना! सध्या सुरू असलेल्या प्रश्नेमोजवरून तरी हा ‘बनवाबनवी’चाच रिमेक वाटत आहे.

‘एक्स- मेन’ जाणून घेण्यासाठी
आपल्याकडे हॉलीवूडच्या सुपरहिरोंमधील सर्वात डावी म्हणून ओळखली गेलेली सिरीज म्हणजे ‘एक्स-मेन’. ‘स्पायडरमॅन’, ‘सुपरमॅन’ आणि काही प्रमाणात ‘हल्क’ यांना मिळालेली लोकप्रियता या मालिकेला मिळाली नाही. या मालिकेतील चौथा म्हणजेच ‘एक्स- मेन ओरिजिन्स : व्हुल्वरिन’ प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट ‘व्हुल्वरिन’ या म्युटन्टच्या हिंसक भूतकाळाविषयी माहिती देतो. त्याचप्रमाणे ‘टीम एक्स’ सोबत त्याचा संपर्क येऊन ‘वेपन -एक्स’द्वारे त्याच्या शरीररचनेत विशिष्ट बदल कसे झाले, या विषयीची स्पष्टीकरणे देतो.

जुना विषय नवा चित्रपट
बहुतेकदा चित्रपटाचे पोस्टर पाहून, चित्रपट कसा असेल याचा अंदाज येतो. ‘तिन्हीसांजा’च्या पोस्टरवर डोळ्यात करुणा असलेले रमेश देव, डोक्याला पट्टी असलेल्या आशालता वाबगावकर असे कलाकार पाहूनच चित्रपटाच्या कथेची कल्पना येते. धकाधकीच्या जीवनात मुलगा आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात जायला सांगतो. त्याचप्रमाणे करिअर घडविण्याच्या धावपळीत तरुण जोडप्यांचे संसाराकडे कसे दुर्लक्ष होते, वगैरे वगैरे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. गेली ३०-३५ वर्षे याच विषयावर मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये चित्रपट येऊन गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तोच विषय, भावनाप्रधान संवाद पाहण्यासाठी प्रेक्षक कितपत उत्सुक असतील ही शंकाच आहे. मालिकांमध्येही फॅमिली ड्रामा असतोच, तो पाहून ज्या प्रेक्षकांची हौस भागली नसेल त्यांना हा चित्रपट पाहण्याचा चॉइस उपलब्ध आहे.
टॉकीजवाला

समन्वयाची परीक्षा
जोडीदारांमध्ये समन्वय असणे फार आवश्यक ठरते. त्यामुळेच ‘जोडी जमली रे’च्या शुक्रवारच्या भागात जोडादारांमधील समन्वय किती आहे हे जोखणारा खेळ खेळण्यात येईल. यात प्रत्येक जोडीमधील एका स्पर्धकाने पाइपच्या माध्यमातून चेंडू खाली आणायचा असून दुसऱ्या जोडादाराने चेंडू मारायचा आहे. या धमाल फेरीत स्पर्धकांच्या काय-काय गमतीजमती घडतात ते ‘स्टार प्रवाह’वर रात्री १० वाजता दाखविण्यात येणाऱ्या ‘जोडी जमली रे’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये पाहायला मिळणार आहे.

‘सह्याद्री’वर ‘जलसा’ संगीताचा
एकामागून एक ‘रिअ‍ॅलिटी शो’ज येतात आणि जातात. जवळपास प्रत्येक ‘शो’मध्ये प्रेक्षकांकडून एसएमएस मागविणे, स्टेजवर घडणारे (काही वेळा घडवून आणलेले) भावूक प्रसंग इत्यादींची रेलचेल असते. गेली तीन वर्षे दूरदर्शन वाहिनीवर सुरू असलेल्या ‘जलसा’ या ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये मात्र असे काहीच नसते. भारतातीय संगीताचा प्रसार करणे हेच त्याचे ध्येय आहे. अलीकडेच हा कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर सुरू झाला आहे. बुधवारी संध्याकाळी ५.३० ते ६ या वेळेत प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात भारतीय संगीतातील दिग्गज गायक, नवोदित गायक आणि लोकप्रिय गायक गीते सादर करणार आहेत. संजीव अभ्यंकर आणि नेहा राजपाल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात.

गौरव महाराष्ट्राचा हा निश्चितच अभिमानास्पद कार्यक्रम
गजेंद्र सिंग यांचे प्रतिपादन

ई टीव्ह मराठीवर दाखविला जाणारा ‘गौरव महाराष्ट्राचा’ हा तरुण गायक-गायिकांचा स्पर्धात्मक कार्यक्रम निश्चितच अभिमानास्पद कार्यक्रम असून ‘जनरेशन नेक्स्ट’चे १०० टक्के प्रतिनिधित्व करणारा रिअ‍ॅलिटी शो आहे, असा दावा गजेंद्र सिंग यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना केला. काही वर्षापूर्वी छोटय़ा पडद्यावर झळकलेल्या ‘अंताक्षरी’, ‘सारेगमप’ तसेच अलीकडे गाजलेल्या ‘व्हॉइस ऑफ इंडिया’, ‘चक दे बच्चे’ अशा अनेक कार्यक्रमांची संकल्पना गजेंद्र सिंग यांची आहे.

आकर्षण पडद्यामागचे!
चित्रपटात अभिनय करून लोकप्रियता मिळते आणि आर्थिक गरजही भागते. पडद्यावर असणाऱ्या काही अभिनेत्यांना पडद्यामागचेही आकर्षण असल्याचे अलीकडे दिसून आले आहे. गेल्या दोन वर्षात अनेक अभिनेत्यांनी पडद्यामागच्या भूमिकाही साकारल्या. बहुतेक जण निर्मितीत शिरले तर काहींनी दिग्दर्शनाची वाट चोखाळली. त्यांना हे पडद्यामागचे आकर्षण का वाटले, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न..
अशोक सराफ
कलाकारांना चित्रपटनिर्मितीच्या प्रत्येक अंगाविषयी आकर्षण असतेच. परंतु निर्मिती करायची झाली तर त्या कामासाठी पूर्ण वेळ देता येणे गरजेचे होते. चित्रपट निर्मिती करण्याचा विचार गेली अनेक वर्षे होता. निर्मितीत शिरण्याचे मुख्य कारण म्हणजे इतरांकडे काम करताना त्यांना हवे तसे काम करावे लागते. दरवेळी माझ्या मनाप्रमाणे विनोदनिर्मिती होईलच असे नाही. चित्रपटाच्या माध्यमातून मला अपेक्षित असलेला विनोद सादर करता आला. पण इथे एक गोष्ट सांगावी लागेल की, ‘एक डाव धोबीपछाड’ची निर्मिती करताना निवेदिताची खूप मदत झाली. तिच्यामुळेच हे शक्य झाले. या पुढेही निर्मिती करत राहण्याची इच्छा आहे.
अंकुश चौधरी
मला दिग्दर्शनाची सुरुवातीपासूनच आवड होती. ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदरपंत’ या नाटकांसाठी मी सहाय्यक दिग्दर्शनाचे काम केले होते. त्यानंतरही ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटासाठीही मी असोसिएट दिग्दर्शकाचे काम केले होते. त्यानंतर मला .. या चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली. दिग्दर्शकाला कथा पटकथा, संवाद, अभिनेते या सर्वावर नियंत्रण ठेऊन काम करावे लागते. चित्रपटनिर्मितीच्या काळात मी इतर कोणतेही काम स्वीकारले नव्हते. एखादे चांगले कथानक हाती आले तर पुन्हा दिग्दर्शनाच्या वाटेवर जायला नक्की आवडेल. पण अभिनय की दिग्दर्शन यातून निवड करायची झाली तर माझी प्रथम पसंती मात्र अभिनयालाच आहे.
सयाजी शिंदे
केवळ मराठीच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही सयाजी शिंदे यांची लोकप्रियता वाढतच चालली आहे. त्यांची निर्मिती असलेला ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. सयाजी म्हणाले की, चित्रपटात केवळ एखादी व्यक्तिरेखा साकार करतो. त्यात दरवेळी आपले म्हणणे मांडता येतेच असे नाही. स्वत:च्या मनातल्या काही गोष्टी मांडायच्या होत्या. त्यासाठी चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश केला. मकरंद अनासपुरे, नागेश भोसले यांची साथही लाभली. ‘गल्लीत गोंधळ..’ आणि ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या दोन्ही चित्रपटांची योजना एकाच वेळी करण्यात आली. निर्मिती करताना बजेटचा विचार करावा लागतो, पण लोकांचे प्रश्न लोकांसमोर मांडणे मला यामुळे शक्य झाले.
श्रेयस तळपदे
वेगवेगळ्या चित्रपटांतून अभिनय करताना आणि पूर्वीही नाटक, मालिकांमधून काम करत असतानाही या इंडस्ट्रीने आपल्याला मोठे केले, नाव मिळवून दिले म्हणून अभिनयाच्या पलीकडे जाऊन सिनेमा माध्यमाच्या अन्य कुठल्यातरी डिपार्टमेंटमध्ये आपण काम करायला हवे ही जाणीव झाली. पण तत्पूर्वी आणखी हिंदी चित्रपटांतून काही काळ अभिनय करूया आणि मग अन्य नवीन भूमिकेत काम करावे, असे मनात होते. ‘मुक्ता आर्ट्स’सोबत चत्रपट करत असताना सुभाष घई यांनी चित्रपटनिर्मितीबद्दल विचारणा केली आणि तू ही जबाबदारी समर्थपणे करू शकशील असा विश्वास त्यांनी दाखविला म्हणून ‘सनई चौघडे’ चित्रपटाची निर्मिती केली. आपल्याकडे अभिनयातून देण्यासारखे आहे ते देत असतानाच त्यापलिकडे विचार करून अधिक काही करावे ही उर्मी सतत मनात असते. आता आणखी एक चित्रपट करतोय. त्याची पटकथा तयार करण्याचे काम सुरू आहे.
संकलन - सुनील डिंगणकर आणि सुनील नांदगावकर

‘फॅन्टसी क्रिकेट’
आयपीएलला भारतीय क्रिकेटरसिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. संघाचा मालक, प्रत्येक खेळाडूचे मानधन, त्यांची कामगिरी, त्यानंतर त्या संघाला किंवा खेळाडूला मिळणारे जाहिरातदार, प्रश्नयोजक याबाबत सर्वसामान्यांमध्ये चर्चा होऊ लागली. या क्रिकेट फिव्हरमध्ये ‘नेट’कर सामील झाले नसते तर नवल होते. www.dream11.com या संकेतस्थळावर ‘फॅन्टसी क्रिकेट’ खेळता येऊ शकते. यात तुम्ही तुमची आवडती टीम तयार करू शकता. त्याचप्रमाणे यात खेळाडूंच्या कामगिरीप्रमाणे त्यांचे गुण कमी-जास्त होतात. ऑनलाईन क्रिकेट सामन्यांमध्ये सहभागी झाल्यावर प्रत्येक धाव, विकेट, कॅच इत्यादींसाठी गुण मिळत जातात. विजेत्यांना बक्षिसेही देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ‘गेमिंग हंगामा’ या कंपनीने त्यांच्या www.gaminghungama.com या संकेतस्थळावर क्रिकेटशी संबंधित गेम सुरू केले आहेत. यात क्रिकेट शब्दकोषावर आधारित ‘क्रिकेट वर्ड्स’, ‘क्रिकेट जिग्सॉ’, ‘क्रिकेट कलर्स’ आणि ‘रीच द पीच’ या गेमचा समावेश आहे.
प्रतिनिधी