Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

सोलापूर भागात दमदार पाऊस
सोलापूर, १८ जून/प्रतिनिधी

सोलापूर शहर व परिसरात उकाडय़ाने नागरिक हैराण झाले असतानाच गुरुवारी दुपारनंतर मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सारे वातावरण बदलून गेले आणि गारव्याने नागरिक सुखावले. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप चालू असल्याने सर्व रस्ते जलमय झाले होते. अडीच तासांत ४३.४ मि.मी. पाऊस बरसल्याची नोंद झाली आहे. दुपारी दोननंतर आकाशात काळेकुट्ट ढग जमा होऊन सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाला प्रारंभ झाला.

बोगस खतांच्या प्रश्नावर सेनेचे कोल्हापुरात आंदोलन
कोल्हापूर, १८ जून / विशेष प्रतिनिधी

सेंद्रिय खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना माती विकून कोटय़वधी रुपये मिळविणाऱ्या तथाकथित कारखानदारांमागे वरदहस्त उभ्या करणाऱ्या कृषी खात्यातील अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे. तसेच शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या जिल्हय़ातील अशा उद्योगांची भरारी पथकाद्वारे माहिती घेऊन हे कारखाने उद्ध्वस्त करावेत, या मागणीसाठी शिवसेनेने गुरुवारी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला लक्ष्य बनविले होते.

इस्लामपूर नगराध्यक्षपदी चिमण डांगे बिनविरोध
इस्लामपूर, १८ जून/वार्ताहर

उपनगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे यांना अपेक्षेनुसार प्रमोशन मिळून त्यांची थेट इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदीच वर्णी लागली आहे, तर उपनगराध्यक्षपदासाठी मुकुंद कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अ‍ॅड. चिमण डांगे व त्यांना डमी म्हणून शंकरराव चव्हाण असे दोनच अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून, येत्या सोमवार दि. २२ जून रोजी केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिर शताब्दी
पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या ग्रामीण व शहरी तपासणी मासिक नेत्रशिबिरांच्या शंृखलेमध्ये ५०० ते १५०० पर्यंत रुग्णांचा समावेश असायचा. मुख्यत्वेकरून चष्मेवाटप, औषधी उपचार, मोतीबिंदूसाठी शस्त्रक्रियेसाठी रुग्णाची निवड, काचबिंदूच्या रुग्णांचा शोध असे शिबिराचे स्वरूप १९७९ सालापासून होते. त्यामध्ये १० टक्के लहान मुलांचा समावेश असायचा आणि त्यामध्ये ४-५ मुलेमुली तिरळेपणाची दिसायची. मुलींचा समावेश प्रकर्षांने जाणवायचा. मी स्वत: तिरळेपणावरील प्रशिक्षण दिल्ली येथील राजेंद्रप्रसाद इन्स्टिटय़ूट ऑफ ऑपथॅलमिक रिसर्चमध्ये प्रा. डॉ. प्रेमप्रकाश या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तिरळेपणावरील नेत्रतज्ज्ञाकडे १९७२ मध्ये घेतले होते व माझ्या खासगी व्यवसायात नियमित शस्त्रक्रिया करीत होतो.

सोलापूरच्या रस्तेविकासाचा दुसरा टप्पा राबविण्याची मागणी
महापौरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सोलापूर, १८ जून/प्रतिनिधी

सोलापूर शहरात महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळामार्फत रस्तेविकासाचा दुसरा टप्पा राबविण्याची मागणी महापौर अरुणा वाकसे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.या संदर्भात महापौरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले असून, त्याची प्रत सार्वजनिक बांधकाममंत्री डॉ. विमल मुंदडा यांनाही पाठविली आहे. सोलापूर शहरात पाच वर्षांपूर्वी राज्य रस्तेविकास महामंडळामार्फत ९२ कोटी खर्च करून रस्तेविकासाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला होता. त्यानंतर या रस्त्यांच्या कामांचा दुसरा टप्पा शासन दरबारी निर्णयासाठी रखडला आहे. याबाबत शासनाने त्वरित निर्णय घ्यावा व त्यासाठी बैठक बोलवावी, अशी मागणी महापौर वाकसे यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे केली आहे. यापूर्वी सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते-पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असताना सोलापूर शहराच्या रस्तेविकास कार्यक्रमास चालना मिळाली होती. रस्त्यांच्या कामांचा पहिला टप्पा पूर्ण होऊन आता दुसऱ्या टप्प्याच्या कामाची सर्वाना प्रतीक्षा आहे. महापालिकेने याबाबत शिंदे व मोहिते-पाटील यांच्यामार्फत वेळोवेळी पाठपुरावा केल्यास रस्त्यांच्या दुसऱ्या टप्प्याचे काम मार्गी लागू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

गोवा मुक्ती संग्रामातील नेते अप्पासाहेब देसाई यांचे निधन
कराड, १८ जून/वार्ताहर

गोवा मुक्ती स्वातंत्र्यलढय़ातील आघाडीचे नेते व देशभक्त अप्पासाहेब देसाई यांचे आज (वय ८३) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
गोवा मुक्ती संग्रामाचे नेते पी. के. सावंत व कमलाताई भागवत यांचे निकटचे सहकारी असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ज्ञानदेव ऊर्फ अप्पासाहेब केशव देसाई यांनी संयुक्त सातारा जिल्ह्य़ातील सुमारे दीडशेजणांच्या तुकडीत मोठी कामगिरी बजावली होती. त्यांनी गोवा मुक्ती लढय़ात योगदान देणाऱ्या सहकाऱ्यांना शासकीय मानधन व सवलती मिळवून देण्यासाठीही विशेष परिश्रम घेतले. एक तत्त्वनिष्ठ स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. पुरोगामी विचारांचे अप्पासाहेब देसाई काँग्रेसच्या प्रांतिक कमिटीचे सदस्य, तर जिल्हा कमिटीचे उपाध्यक्ष होते. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

वडगावात पुन्हा घरफोडी
पेठवडगाव, १८ जून/वार्ताहर
दहाच दिवसांत पेठवडगावात आणखी एक घरफोडीचा प्रकार घडला असून, येथील मुख्य रहदारीच्या पालिका चौकातील रविराज ट्रेडर्स अँड कम्युनिकेशनमधील मोबाईल हँडसेट, रिचार्ज व्हाऊचर व रोख १८ हजार ५०० रुपये, असा ४७ हजार रुपयांचा माल अज्ञातांनी लांबविला. पेठवडगाव (ता.हातकणंगले) येथील पालिका चौकात माजी उपनगराध्यक्ष राजन शेटे यांचे बंधू व मुलांचे रविराज ट्रेडर्स व कम्युनिकेशन्स हे दुकान आहे. काल रात्री या बंद दुकानाचे पत्रे उचकटून चोरटय़ांनी दुकानात प्रवेश केला आणि सात मोबाईल संच, रोख रक्कम, रिचार्ज व्हाऊचर नेले. आज सकाळी दुकान उघडल्यानंतर हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. दहाच दिवसांपूर्वी प्रदीप राठोड यांच्या बंद घराचे दार तोडून सव्वादोन लाख रुपयांचे दागिने लंपास केले होते. त्यापूर्वी चार घरफोडय़ा झाल्या आहेत. घरफोडीची मालिका चालूच राहिल्याने पेठवडगावची बाजारपेठ चक्रावून गेली आहे.

आशियाई जलतरण स्पर्धेसाठी सोलापूरच्या केतन शिंदेची निवड
सोलापूर, १८ जून/प्रतिनिधी

येत्या २९ जून ते ४ जुलै दरम्यान सिंगापूर येथे होणाऱ्या पहिल्या आशियाई युवक जलतरण क्रीडास्पर्धेसाठी सोलापूरचा राष्ट्रीय जलतरण डायव्हिंगपटू केतन शिंदे (वय २६) याची निवड झाली आहे. केतन शिंदे हा सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई मुकुंद शिंदे यांचा मुलगा आहे. त्याचा भाऊ इंद्रजित हा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता जलतरणपटू आहे. सोलापूर जिल्हा हौशी जलतरण संघटनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय जलतरण क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेला केतन हा आतापर्यंतचा अकरावा खेळाडू आहे. सोलापूर महापालिकेचे क्रीडाधिकारी मारेप्पा कंपली यांचे त्याला सहकार्य लाभले. सोलापूर जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष झुबीन अमारिया व सचिव दत्तात्रेय गुल्लापल्ली यांनी केतन शिंदे याचे अभिनंदन केले.

चुलतभावाचा खून
शाहूवाडी, १८ जून / वार्ताहर

शाहूवाडी तालुक्यातील कांडवण येथील विलास ज्ञानू कांबळे (वय ४०) याचा त्याचा चुलतभाऊ दादू चंदू कांबळे याने डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. संशयित आरोपी दादू कांबळे हा या घटनेनंतर फरारी झाला आहे. मयत विलास कांबळे हे मुंबई येथे नोकरीस असतात. कांही दिवसांपूर्वी ते आपल्या कांडवण या गावी आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. या खुनाचे कारण आजही उशिरापर्यंत समजू शकले नाही. दरम्यान, घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी तुषार पाटील यांनी भेट दिली. अधिक तपास शाहूवाडी पोलीस करीत आहेत.

राजेवाडीत दोन गटांतील मारामारीत सात जखमी
आटपाडी, १८ जून / वार्ताहर

राजेवाडी येथे किरकोळ कारणावरून दोन गटांत झालेल्या मारामारीत सातजण जखमी झाले. त्यापैकी दोघेजण गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली असून, आटपाडी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
याप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. संतोष चव्हाण यांनी कुत्र्याच्या कारणावरून रावसाहेब चव्हाण, शिवाजी चव्हाण, लहू चव्हाण, दाजी चव्हाण, शहाजी चव्हाण, नागेश चव्हाण, बंडू चव्हाण व मधुकर चव्हाण यांनी गज, तलवार व सायकल चेन यांनी मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे. दुसरीकडे दाजी चव्हाण यांनी जमिनीच्या कारणावरून महादेव चव्हाण, तुकाराम चव्हाण, मारुती चव्हाण, कुमार चव्हाण, सुनील चव्हाण, दादा चव्हाण व उमाजी चव्हाण यांनी लाथाबुक्क्या व दगडांनी मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे.