Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

.. तर सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राच्या नशिबी मिट्ट काळोख - उद्धव ठाकरे
शिवसेना वर्धापनदिनानिमित्त विशेष मुलाखत
सुधीर जोगळेकर/श्रीकांत बोजेवार
गेल्या दहा वर्षांत आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भल्याचे कोणतेच पाऊल उचललेले नाही, नवे उद्योगधंदे सुरू झालेले नाहीत की रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झालेल्या नाहीत, मुंबईची सुरक्षा तर धोक्यात आलेली आहेच, पण मुंबईची आर्थिक उपेक्षाही मोठय़ा प्रमाणावर केंद्राकडून केली जाते आहे. हे असेच राहणार असेल तर सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राच्या नशिबी पुढल्या दहा वर्षांत केवळ मिट्ट काळोखच भरलेला असेल अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली. (सविस्तर वृत्त)

९०:१०ची अधिसूचना जारी
मुंबई, १८ जून / प्रतिनिधी

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी ९० टक्के तर सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी १० टक्के खीव जागा ठेवण्याच्या निर्णयाबाबत अखेर शालेय शिक्षण विभागाने आज अधिसूचना जारी केली. मात्र या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा सीबीएसई, आयसीएसईचे समर्थक झेव्हीयर लुईस यांनी दिला असल्याने आता न्यायालयीन लढाई अटळ ठरणार आहे. त्यामुळे यंदाही प्रवेशाचा घोळ न्यायालयीन लढाईत अडकण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनेही सीबीएसई, आयसीएसईचे समर्थक न्यायालयात जाणार असल्याचे गृहीत धरून हे प्रकरण हाताळण्यासाठी ज्येष्ठ वकिलांची नेमणूक केली आहे.

सातबारा उताऱ्यांबरोबरच संगणकीकृत ‘फेरफार’ही मिळणार
पुणे, १८ जून / खास प्रतिनिधी

हस्तलिखित सातबारा उतारे देण्याच्या प्रक्रियेतून तलाठय़ांना हद्दपार करण्याची पहिली पायरी म्हणून भूमि अभिलेख खात्याच्या संकेतस्थळावर सातबारा उतारे उपलब्ध करण्यात आले आहेत. तलाठय़ांचे हे अधिकार गोठवितानाच शेतजमिनीची १९५० सालापासूनचे फेरफार उतारेही संकेतस्थळामार्फत देण्याची सोय लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.
राज्यातील सुमारे २ कोटी ११ लाख सातबारा उताऱ्यांची नोंद संगणकावर घेण्याचे काम भूमि अभिलेख खात्याने पूर्ण केले आहे. हे पूर्णत्वास गेल्यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांनी संगणकीकृत सातबारा उतारे देण्याची व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.

पुण्यातील जमीन बळकाव प्रकरण
मानकर यांचा ठावठिकाणा सांगा दहा हजार रु. मिळवा
पुणे, १८ जून / प्रतिनिधी
जमीन बळकावल्याप्रकरणी फरार असलेले काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या ठावठिकाण्याविषयी माहिती देणाऱ्या व्यक्तीला दहा हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा शहर पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी केली. ‘राजकीय व्यक्तींनी बिल्डरशी
संगनमत करून दहशत माजवून जमिनी बळकावल्या असतील, तर नागरिकांनी थेट पोलीस आयुक्तालयात किंवा गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात संपर्क साधावा,’ असे आवाहन डॉ. सिंह यांनी या वेळी पुन्हा केले.

नगरसेवक मानकर काँग्रेसमधून निलंबित
मुंबई, १८ जून / खास प्रतिनिधी

पुण्यातील नातूवाडयाची जागा बिल्डरला मिळवून देण्यासाठी मालकाला काँग्रेसच्या मुख्यालयात नेऊन धमकाविणारे वादग्रस्त नगरसेवक दीपक मानकर यांना काँग्रेसमधून आज निलंबित करण्यात आले. मानकर यांनी नातू यांना काँग्रेसच्या मुख्यालयात जबरदस्तीने नेऊन धमकाविले होते. मानकर यांचे उद्योग समोर आल्याने काँग्रेसमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली होती. मानकर यांच्यामुळे काँग्रेसच्या प्रतिमेला धक्का बसला होता. या पाश्र्वभूमीवर मानकर यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जाहीर केले. मानकर हे दोषी आहेत का, हे कालांतराने स्पष्ट होईल, पण त्यांनी धमकाविल्याची तक्रार आल्याने पक्षाने त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याचे ठाकरे यांनी सांगितले. नगरसेवक मानकर हे काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांचे निकटवर्तीय मानले जातात. विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून मानकर हे प्रयत्नशील होते.

बेहरामपाडय़ातील भीषण आगीत दोन बालकांचा मृत्यू
मुंबई, १८ जून / प्रतिनिधी

वांद्रे पश्चिम येथील बेहरामपाडय़ात आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत दोन बालकांचा होरपळून मत्यू झाला. गेल्या काही वषार्ंत मुंबईत लागलेल्या आगींपैकी ही सर्वात मोठी आग असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. पहाटे तीन वाजता लागलेली आग एवढी भीषण होती की, आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला दुपापर्यंत झुंजावे लागले. आगीत किती जणांचा मृत्यू झाला या विषयी गोंधळाची स्थिती असून पालिका, रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून वेगवेगळे आकडे सांगण्यात येत आहेत. अग्निशमन दलाने दोन बालकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले, मात्र स्थानिकांनी किमान चारजणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पहाटेच्या साखरझोपेत असतानाच वांद्रे पूर्व येथील अनंत काणेकर मार्गाजवळील झोपडय़ांना आग लागली. काही क्षणातच ही आग पसरत गेली. या वस्तीतील घरे दाटीवाटीने बांधण्यात आलेली आहेत. त्यामुळे आग सहज परसत गेली. काही वेळातच किमान चाळीस झोपडय़ा जळून खाक झाल्या. आग विझविण्यात आली तोपर्यंत सुमारे दोनशे झोपडय़ांचे नुकसान झाले होते.

रायगड जिल्हा भारनियमनमुक्त
अलिबाग, १८ जून / प्रतिनिधी
आज दुपारी १२ वाजल्यापासून रायगड जिल्हा वीज भारनियमन मुक्त करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. जिल्ह्यात ३ लाख ८६ हजार ५७४ वीज ग्राहक असून त्यांची एकूण विजेची गरज ६६८.८० मेगावॅट आह़े रायगडमधील वीज भारनियमन शून्य करण्यासाठी लागणाऱ्या प्रतिदिन २८ मेगावॅट विजेचा
पुरवठा 'ह्युमॅनिस्ट कंझ्युमर कौन्सिल ही संस्था करणार असून त्यासाठी त्यांनी टाटा पॉवर कंपनीसोबत करार केला आह़े वीज नियामक आयोगाने प्रतीयुनिट १६ पैसे विश्वसनीयता शुल्क आकारण्यास मंजुरी दिली असली तरी १०० युनिटपर्यंत वापर असणारे घरगुती ग्राहक व कृषी ग्राहक यांना यामधून वगळण्यात आले आह़े परिणामी २ लाख ६६ हजार घरगुती तर ११ हजार ८३२ कृषी ग्राहकांना हे विश्वसनीयता शुल्क भरावे लागणार नाही़ मात्र १०० युनिटपेक्षा अधिक वीज वापर असणारे घरगुती व अन्य अशा एकूण १ लाख ८ हजार ७४२ ग्राहकांना मात्र प्रतियुनिट १६ पैसे विश्वसनीयता शुल्क अतिरिक्त भरावे लागणार आह़े रायगड जिल्हा वीज भारनियमन मुक्त करण्यासाठी ग्राहक संघटनांना संघटित करणारे अ‍ॅड़ दत्ता खानविलकर, अलिबागचे आमदार मधुकर ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, जिल्हाधिकारी डॉ़ विनायक निपुण, जिल्हा पोलीस अधिक्षक पी़ डी़ शिंदे, वीज वितरण व टाटा पॉवर कंपनीचे वरिष्ट अधिकारी उपस्थित होत़े

मान्सूनचे मुंबईसह कोकणात सोमवापर्यंत आगमन?
पुणे, १८ जून/खास प्रतिनिधी

मान्सून तब्बल बारा दिवस रत्नागिरीपर्यंत खोळंबला असला तरी तो येत्या सोमवापर्यंत मुंबईसह कोकणात दाखल होण्याची चिन्हे आहेत. याच काळात मध्य महाराष्ट्रातही नाशिकपासून ते कोल्हापूपर्यंतच्या पट्टय़ात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. मराठवाडा व विदर्भातील मान्सूनच्या आगमनाबाबत मात्र आताच निश्चितपणे काही सांगता येणार नसल्याचे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले. बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या अनुकूल हवामानामुळे मान्सून येत्या रविवार-सोमवापर्यंत मुंबईसह कोकणात पोहोचेल, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

पद्मसिंह यांच्या घरातून शस्त्रसाठा जप्त
मुंबई, १८ जून / प्रतिनिधी

काँग्रेस नेते पनवराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित नेते आणि खासदार पद्मसिंह पाटील यांच्या कुलाबा येथील घरावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज रात्री टाकलेल्या छाप्यामध्ये निंबाळकर हत्याप्रकरणाशी संबंधित बरीच कागदपत्रे तसेच मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा आणि रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितले. आज रात्री उशिरा सीबीआयने पाटील यांच्या कुलाबा येथील ‘शांघरिला’ अपार्टमेंटमधील घरावर छापा टाकला. या वेळी पाटील यांच्या घरातून निंबाळकर हत्या प्रकरण व तेरणा साखर कारखान्याशीसंबंधित अनेक कागदपत्रे सापडले. याशिवाय परवानाधारक आणि विनापरवाना शस्त्रेही पाटील यांच्या घरातून जप्त करण्यात आली असून त्यामध्ये एक रिव्हॉल्व्हर, एक पिस्तुल, दोन रायफल, ५५ तलवार आणि नऊ अत्याधुनिक वॉकी-टॉकीचा समावेश आहे. याव्यतिरिक्त सात लाख २६ हजार रुपयेही जप्त करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हा छापा सुरू होता.

राज्यात वीज पडून आठजणांचा मृत्यू
पुणे, १८ जून / प्रतिनिधी
राज्याच्या अनेक भागात आज विजांच्या कडकडाटात जोरदार वादळी पाऊस पडला. मराठवाडा तसेच सोलापूर जिल्ह्य़ात वीज पडून एकूण आठजणांचा मृत्यू झाला. मराठवाडय़ात हिंगोली जिल्ह्य़ात दोनजणांचा मृत्यू झाला. याशिवाय लातूर जिल्ह्य़ात चाकूर आणि बीड जिल्ह्य़ात प्रत्येकी एकजण वीज पडून मरण पावला. सोलापूर जिल्ह्य़ात सोलापूर शहर, बार्शी, अक्कलकोट येथे जोरदार पाऊस पडला. बार्शी येथे वीज पडून एका महिलेचा, तर अक्कलकोट येथे तिघांचा मृत्यू झाला. याशिवाय मिरज, कराड, कवठेमहांकाळ येथेही वादळी पावसाची नोंद झाली.

उद्यापासून मुंबईत पाणीकपात वाढणार
मुंबई, १८ जून / प्रतिनिधी
मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेने मुंबईत येत्या शनिवारपासून २० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पाण्याची पातळी खालावली आहे. यापूर्वीपालिकेने १० टक्के पाणीकपात लागू केली होती. आता यात आणखी १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी