Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

मोर्चेकरी महिलांना खाकी खाक्या! मंगळसूत्र चोर ठरवून अंगझडती
सशस्त्र पहाऱ्यातून महिला पोलिसाच्या मंगळसूत्राची चोरी
आयुक्तालयातील खळबळजनक प्रकार
औरंगाबाद, १८ जून/प्रतिनिधी

मानसी देशपांडे हिचा खून करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी सजग महिला संघर्ष समितीने आज काढलेल्या मोर्चावेळी पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातूनच महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेले.

‘नको क्षुद्र शृंगार’
पुण्यात मिटिंगला गेले की, तिची भेट व्हायची. मिटिंग संपली की, संध्याकाळी आम्ही जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या पाताळेश्वराच्या मंदिरात जायचो. काळ्या पाषाणाचा पहाड वरून खाली कोरून बनवलेलं हे मंदिर. अगदी अनोखं. गुहेत असल्यासारखं. कसलीच कलाकुसर तिथं नाही. अनघड नैसर्गिकपण हेच त्याचं सौंदर्य. रस्त्यापासून ५०-६० मीटर आत आणि १५-२० फूट खोल असं हे कातळातील मंदिर. रस्त्यावरून दिसही नाही. प्रचंड रहदारीच्या रस्त्यावर असूनही मनाला प्रसन्न करणारी शीतल शांतता तिथे असते. घटकाभर तिथे बसलं की, दिवसभराचा शीण हलका व्हायचा.

तरुण शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
नांदेड, १८ जून/वार्ताहर

गावातील नातेवाइकांकडून शेतीसाठी होणारा छळ, पैशांच्या मोहापायी अर्धापूर पोलिसांनी केलेले दुर्लक्ष यामुळे नैराश्य आलेल्या एका तरुण शेतकऱ्याने आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच आत्महत्येचा प्रयत्न केला. माधव गणपती राजेगोरे (वय ३०, शेळगाव बुद्रुक, अर्धापूर) असे त्याचे नाव आहे.माधवने आज दुपारी दोन वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच अंगावर रॉकेल ओतून घेतले. तो पेटवून घेणार त्याच दरम्यान तेथे असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्याला झडप घालून पकडले. अंगावर रॉकेल ओतून घेण्यापूर्वी त्याने रॉकेल प्यायले होते, असे सांगण्यात आले. माधवला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

निलंग्याची पालिका काँग्रेसकडे; नगराध्यक्षपदी नितनवरे
निलंगा, १८ जून/वार्ताहर

भारतीय जनता पक्षाचे आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या सत्ताधारी आघाडीत बिघाडी झाल्याने नगरपालिकेची सत्ता आज काँग्रेसच्या ताब्यात गेली. चुरशीच्या व अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या राजेश्वरी नितनवरे (बाहेती) यांची नगराध्यक्षपदी व काँग्रेसचेच वीरभद्र स्वामी यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. ही घोषणा होताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून विजयी मिरवणुकीने आनंदोत्सव साजरा केला.

पाऊस झाला खोटा
प्रदीप नणंदकर, लातूर, १८ जून

‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ या आळवणीलाही पाऊस आता दाद देईनासा झाला आहे. दर वर्षीच तो थापा मारत असल्यामुळे तो खोटा झाला असल्याची भावना लहानांपासून थोरापर्यंत पसरते आहे. त्याच्या अनिश्चितीमुळे अनेकांच्या समोर जीवन-मरणाचा प्रश्न उभा राहतो आहे.

वीज पडून चार जण मृत्युमुखी
हिंगोली, १८ जून/वार्ताहर

सेनगाव तालुक्यातील बनबरडा व म्हाळसापूर येथे आज वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. सेनगाव तालुक्यातील बनबरडा येथे विजय तुकाराम चोले (वय २८) व म्हाळसापूर येथील हिंमतराव गव्हाणे (वय ५०) यांचा वीज पडल्याने मृत्यू झाला. ही दुर्घटना चार ते साडेचारच्या सुमारास घडली.

जालन्यात भिंत पडून एक ठार
जालना, १८ जून/वार्ताहर

शहर आणि परिसरात काल रात्री वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. अंगावर भिंत पडल्याने एक जण ठार झाला. शहराच्या विविध भागांत विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठय़ात रात्रभर व्यत्यय आला. शहराच्या विविध भागांत १५ ते २० ठिकाणी झाडे तुटून विजेच्या तारांवर पडली. त्याचप्रमाणे शहरातील मस्तगड, मोतीबाग, गांधी चौक इत्यादी भागांत विजेचे जवळपास २५ खांब या वादळामुळे पडले. प्रशासकीय संकुल असलेल्या भागात विजेचा एक ट्रान्स्फॉर्मर जळून खाक झाला. मस्तगड भागात एक जुना वटवृक्ष पडला. जालना ते राजूर मार्गावर असलेल्या अभय कोटेक्स या उद्योगात भिंत कोसळल्याने बालाजी विश्वनाथ जाधव (वय ३८) ठार झाला. विजेच्या तारा अनेक ठिकाणी तुटल्यामुळे काल रात्रभर शहरातील बऱ्याच भागांत वीजपुरवठा बंद होता. गुरुवारी दुपारपर्यंत अनेक भागांत वीजपुरवठय़ात व्यत्यय आला. वीज वितरण कंपनीचे ऐंशीहून अधिक अधिकारी-कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दिवसभर प्रयत्नशील होते.

मजुरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
परभणी, १८ जून/वार्ताहर

पाथरीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या आमदार निधीतून केलेल्या कामाचा मोबदला न मिळाल्यामुळे मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. राजू चन्नाप्पा हुलमुंडे (रा. माळवटा, ता. वसमत, जि. हिंगोली) कोहिनूर कन्स्ट्रक्शन पाथरीअंतर्गत तरबेज खान अब्दुल रहेमान खान यांच्याकडे ६ फेब्रुवारीपासून मुकादम म्हणून कामाला होते. त्या दोघांमध्ये करारनामाही झाला होता. त्याप्रमाणे हुलगुंडे यांनी ८ लाख ४९ हजार ६५२ रुपयांचे काम केले आहे. त्यातील हुलगुंडे यांनी ४,३५८९६ इतकी रक्कम उचलली. कोहिनूर कन्स्ट्रक्शनकडे ४ लाख १३हजार ७३६ इतकी रक्कम बाकी आहे. ही रक्कम त्वरित देण्याच्या मागणीसाठी राजू चन्नाप्पा हुलगुंडे यांनी उपोषण सुरू केले आहे.

स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल रुग्णालयात
वसमत, १८ जून/वार्ताहर

ज्येष्ठ सवरेदयी नेते व स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात असताना त्यांना त्रास होऊ लागला. श्री. अग्रवाल उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथे सवरेदय मंडळाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला गेले होते. अधिवेशन सुरू असताना काल त्यांना रक्तदाब व संधीवाताचा त्रास होऊन चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे विभागीय मंडळाचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी सांगितले.

औरंगाबाद मनपाच्या विभाग कार्यालयाला कुलूप ठोकले
औरंगाबाद, १८ जून /प्रतिनिधी

अधिकाराच्या विकेंद्रीकरणानंतर प्रभाग कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे काम कोणाला सांगायचे असा प्रश्न करत क्रांतीचौक प्रभागाच्या कार्यालयाला दुपारी सभापती वीणा सिद्ध आणि नगरसेवकांनी कुलूप ठोकले. नगरसेवक सतीश कटकटे, सरला पोळ, पप्पू व्यास उपस्थित होते. तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी विभाग कार्यालयाचे सत्तेचे विकेंद्रीकरण केले होते. त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांकडे प्रत्येकी दोन विभाग सोपविण्यात आले होते. अन्य कर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आले. मात्र तेव्हापासून कार्यालयात कर्मचारीच उपस्थित राहत नाहीत आणि ते मोबाईलवरही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मलनिस्सारण वाहिनी दुरुस्ती सारखी लहान मोठी कामे कोणाला सांगावी, असा प्रश्न असतो. आज सकाळी नगरसेवक कार्यालयात गेले असता तेथे कोणीही नव्हते. अधिकाऱ्यांशी त्यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाही. यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी कार्यालयाला कुलूप ठोकले.

डॉ. हिरालाल नावंदर यांचे अपघातात निधन
परळी वैजनाथ, १८ जून/वार्ताहर
सिरसाळा येथील प्रसिद्ध डॉक्टर हिरालाल नावंदर यांचे अमरावतीजवळ एका अपघातात निधन झाले. ते ६८ वर्षाचे होते. हिरालाल नावंदर एका विवाहसोहळ्यानिमित्त अमरावती येथे गेले होते. तेथून परतत असताना एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे एक लहान भाऊ, मुलगा डॉ. आनंद, सून, नातवंड असा परिवार आहे.

दरोडय़ातील आरोपी पकडले
बीड, १८ जून/वार्ताहर

वासनवाडी शिवारातील दळवी वस्तीवरील दरोडय़ातील आरोपींना पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने काल मुद्देमालासह केज येथे पकडले.अयोध्याबाई लक्ष्मण दळवी यांच्या घरावर आठ दिवसांपूर्वी पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकून दहा हजार रुपये, दोन मोबाईल व सोन्या-चांदीचे दागिने असा ३७ हजार रुपयांचा ऐवज नेला होता. या गुन्ह्य़ाचा तपास करणाऱ्या दरोडा प्रतिबंधक पथकाने काल केज तालुक्यातील केवडा शिवारात अशोक शिंदे, सिकंदर शिंदे, संजय पवार, सतीश काळे, सतीश शिंदे यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून दळवी वस्तीवरील ऐवज जप्त करण्यात आला.

जालना जिल्ह्य़ात शस्त्रबंदी
जालना, १८ जून/वार्ताहर

जिल्ह्य़ात शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश ३० जूनपर्यंत लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार शस्त्र जवळ बाळगण्यास तसेच पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अविनाश पाठक यांनी या संदर्भातील आदेश जारी केला.

दोन बालगुन्हेगारांना अटक
जालना, १८ जून/वार्ताहर

राजेंद्र शहा यांच्या घरातून १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या २ बाल गुन्हेगारांना काल विशेष कृतिदलाच्या पोलिसांनी अटक केली आहे. संभाजीनगरमधील व्यापारी राजेंद्र शहा हे कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरला होता. विशेष कृती दलाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना या घरफोडीची माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी लक्कडकोट येथील दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. दोघांनी घरफोडीची कबुली दिली व चोरलेला ऐवज पोलिसांच्या हवाली केला.

व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा
परळी वैजनाथ, १८ जून/वार्ताहर

माहेराहून एक लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करून घराबाहेर काढल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी एका व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुरुषोत्तम पंढरीनाथ मानधने (गणेशनगर) असे त्याचे नाव आहे. आरोपींना अटक करून जामिनावर सोडण्यात आले.

आरोपीची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस
औरंगाबाद, १८ जून /प्रतिनिधी
मानसीचा खून करणाऱ्याची माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा पोलीस आयुक्त के. एल. बिष्णोई यांनी गुरुवारी सायंकाळी केली.
माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. आरोपीची माहिती असणाऱ्याने कोणताही अधिकारी किंवा थेट पोलीस आयुक्तांकडे दूरध्वनी अथवा थेट भेट घेऊन माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुनाबाई चौडिये यांचे निधन
औरंगाबाद, १८ जून /प्रतिनिधी

द्वारकापुरी, एकनाथनगर येथील रहिवासी पुनाबाई राधाकिशन चौंडिये यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६६ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

साधू महाराज यांच्या दिंडीचे माळेगावात स्वागत
लोहा, १८ जून/वार्ताहर

माझे जिवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी.. अशा भक्तिपूर्ण उत्साही वातावरणात, टाळमृदंगाच्या गजरात कंधार येथील साधू महाराज यांच्या दिंडीचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या कुटुंबीयांनी माळेगाव येथे स्वागत केले. कंधारच्या साधू महाराजांच्या दिंडीची मंगळवारी सुरुवात झाली. लोहा येथे काल लक्ष्मीकांत चन्नावार, विजय चन्नावार यांच्या निवासस्थानी दिंडीचे स्वागत करण्यात आले. बुधवारी दिंडी माळेगावात मुक्कामाला होती. जिल्ह्य़ाच्या सरहद्दीवर गोविंदराव पाटील-चिखलीकर, आमदार प्रताप पाटील यांच्या पत्नी प्रतिभा चिखलीकर यांनी दिंडीप्रमुख व पालखीची पूजा केली. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रुस्तूम धूळगंडे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रमुनी मस्के, स्वप्नील लुंगारे, नगरसेवक करीम शेख, रावसाहेब मजलवाड, माळेगावचे सरपंच नागोराव वाघमारे, पंचायत समिती सदस्य बाबुराव कांबळे आदींनी दिंडीचे दर्शन घेतले. त्यानंतर दिंडी पंढरपुराकडे रवाना झाली.

शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची एकच गर्दी
लातूर, १८ जून/वार्ताहर

चालू शैक्षणिक वर्ष सोमवारपासून सुरू झाले असून विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्यासाठी लातूरच्या बाजारपेठेत एकच गर्दी होत आहे. शैक्षणिक साहित्य, वह्य़ा, गणवेश खरेदीसाठी लातूरच्या मुख्य बाजारपेठेत पालकांची गर्दी दिसून येत आहे. गंजगोलाई, हनुमान चौक, शिवाजी चौक, औसा रोड, अंबाजोगाई रोड या परिसरात ही दुकाने थाटली आहेत. बाजारपेठेत किमान ३० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत बॅग उपलब्ध आहेत, अशी माहिती बॅग विक्रेते सतीश सोनवणे यांनी दिली. हैदराबाद, पुणे येथून बॅगा लातूरच्या बाजारपेठेत आल्या आहेत.

महावितरणची गंगाखेडमध्ये धडक वसुली मोहीम बावीस हजाराची दंडवसुली
गंगाखेड, १८ जून/वार्ताहर

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आज वीजचोरांविरुद्ध मोहीम सुरू केली. तालुक्यातील रोकडेवाडी येथील तीन जणांविरुद्ध तसेच शहरातील एका व्यापाऱ्याविरुद्ध दंड आकारणी करीत २२ हजार रुपये वसूल केले. महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रशांत धायरे, प्रदीप लटपटे, शेख रफियोद्दीन यांच्या पथकाने तालुक्यातील रोकडेवाडी येथील गवळणबाई मारोती माळगे, भगवान केशव निळे, गोविंद लक्ष्मण अळनुरे यांच्याकडून प्रत्येकी ५ हजार ९४० रुपये, तसेच शहरातील अशोक रामराव राष्ट्रकुट यांच्याकडून ४ हजार ८० रुपये दंड वसूल केला. वीजचोरांचा शोध घेत कुठल्याही क्षणी छापा टाकून दंड करण्यात येईल, असे सहायक अभियंता राजेंद्र कव्वाल यांनी सांगितले.

औशाच्या नगराध्यक्षपदी प्रश्न. अफसर शेख
औसा, १८ जून/वार्ताहर

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रश्न. अफसर शेख यांनी आज १० मतांनी विजय मिळविला. त्यांना १४ मते व काँग्रेसचे बाबा मुंगळे यांना चार मते मिळाली. उपनगराध्यक्षपदी सोमनाथ येळेकर यांची बिनविरोध निवड झाली. नव्या पदाधिकाऱ्यांची शहरातून मिरवणूक काढण्यातआली. नगरपालिकेत काँग्रेसचे सात, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच, भारतीय जनता पक्षाचे चार, शिवसेनेचे दोन असे संख्याबळ आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस, भा. ज. प., शिवसेना यांच्या झालेल्या आघाडीला काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मुजोबद्दीन पटेल, मुख्तार कुरेशी, मधुकर नळगे यांनी पाठिंबा दिला. यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रश्न. शेख यांनी १४ मते मिळवून काँग्रेसचे बाबा मुंगळे यांचा दणदणीत पराभव केला. उपनगराध्यक्षपदासाठी भा. ज. प.च्या सोमनाथ येळेकर यांनी एकमेव अर्ज दाखल केला होता. त्यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून अरुण आनंदकर यांनी काम केले.

‘ममता हॉस्पिटलचे कार्य कौतुकास्पद’
लातूर, १८ जून/वार्ताहर

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून ममता हॉस्पिटलतर्फे केले जाणारे समाजकार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अमर सोलापुरे यांनी केले.
ममता हॉस्पिटलच्या वतीने दुर्बिणीद्वारे स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन संपूर्ण वर्षभर मोफत करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, डॉ. मोहन भालेराव, डॉ. सविता भालेराव, डॉ. मधुकरराव कुलकर्णी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात नांदेडच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सविता भालेराव यांना नांदेडभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, डॉ. सविता भालेराव यांची समयोचित भाषणे झाली. गरजू रुग्णांनी या शिबिराचा जास्तीतजास्त लाभ घेण्याचे आवाहन या वेळी डॉ. गोपाळराव पाटील यांनी केले.

गेवराई नगराध्यक्षपदी पवार; दाभाडे उपाध्यक्ष
गेवराई, १८ जून/वार्ताहर
नगराध्यक्षपदी लक्ष्मण पवार यांची व उपाध्यक्षपदी महेश दाभाडे यांची आज बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्षपदासाठी श्री. पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्याच दिवशी त्यांची निवड निश्चित झाली होती. पीठासीन अधिकारी महेंद्र हारपाळकर यांनी आज अधिकृत घोषणा केली. त्याचबरोबर उपाध्यक्षपदासाठी महेश दाभाडे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. दोन्ही नव्या पदाधिकाऱ्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.