Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

.. तर सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राच्या नशिबी मिट्ट काळोख - उद्धव ठाकरे
शिवसेना वर्धापनदिनानिमित्त विशेष मुलाखत
सुधीर जोगळेकर/श्रीकांत बोजेवार

 

गेल्या दहा वर्षांत आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भल्याचे कोणतेच पाऊल उचललेले नाही, नवे उद्योगधंदे सुरू झालेले नाहीत की रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झालेल्या नाहीत, मुंबईची सुरक्षा तर धोक्यात आलेली आहेच, पण मुंबईची आर्थिक उपेक्षाही मोठय़ा प्रमाणावर केंद्राकडून केली जाते आहे. हे असेच राहणार असेल तर सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राच्या नशिबी पुढल्या दहा वर्षांत केवळ मिट्ट काळोखच भरलेला असेल अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली. शिवसेनेच्या आज साजऱ्या होत असलेल्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्ताने ते लोकसत्ताशी बोलत होते.
महाराष्ट्राने आजवर देशाला दिशा दिली, नेतृत्व दिले, पण आता महाराष्ट्रालाच दिशा आणि नेतृत्व देण्याची गरज असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, संपन्न वारसा असलेला महाराष्ट्र भकास बनतोय, ग्रामीण आणि शहरी दोन्ही विभाग उपेक्षेने ग्रासले आहेत, विकासाचा वेग आणि दिशा यापासून भरकटून महाराष्ट्राची सर्व आघाडय़ांवर पीछेहाट होते आहे, ही चिंताजनक बाब आहे. शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे, युती सरकार सत्तेवर आले तर आमच्या पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही जे काही करून दाखवले त्यापेक्षा अधिक काही भरीव करून आम्ही हा काळोख संपूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न करू असे ठोस आश्वासनही त्यांनी या निमित्ताने बोलताना दिले. युतीच्या शासनाने केलेल्या विकासकामांचे, सुरू केलेल्या प्रकल्पांचे दान युतीच्या पदरात पडले नाही, याची खंत तर वाटतेच पण त्याचवेळेस २६/११ च्या घटनेनंतरही शहरी भागातील, विशेषत: मुंबईतील मतदार कॉँग्रेसलाच मते देतात याचे आश्चर्यही वाटते असेही ते म्हणाले.