Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

९०:१०ची अधिसूचना जारी
मुंबई, १८ जून / प्रतिनिधी

 

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी ९० टक्के तर सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी १० टक्के खीव जागा ठेवण्याच्या निर्णयाबाबत अखेर शालेय शिक्षण विभागाने आज अधिसूचना जारी केली. मात्र या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा सीबीएसई, आयसीएसईचे समर्थक झेव्हीयर लुईस यांनी दिला असल्याने आता न्यायालयीन लढाई अटळ ठरणार आहे. त्यामुळे यंदाही प्रवेशाचा घोळ न्यायालयीन लढाईत अडकण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनेही सीबीएसई, आयसीएसईचे समर्थक न्यायालयात जाणार असल्याचे गृहीत धरून हे प्रकरण हाताळण्यासाठी ज्येष्ठ वकिलांची नेमणूक केली आहे. या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल झाल्यास आम्ही समर्थनार्थ याचिका दाखल करू, अशी माहिती पालक विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा प्रतिक्षा मांजरेकर व पालक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा सुनिता गोडबोले यांनी दिली. एसएससीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून ९०:१० चा कोटा लागू करण्याचा विचार पंधरवडय़ापूर्वी शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीच बोलून
दाखविला होता. परंतु, या कोटय़ाबाबत कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता असल्याने तो बारगळण्याची चिन्हे निर्माण झाली होती. त्यामुळे शिवसेना, मनसे, भाजपा, पालक विद्यार्थी संघटना, पालक शिक्षक संघटना इत्यादी विविध संघटनांनी ९०:१० कोटय़ाचे समर्थन करीत आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे राज्य सरकारचीही पंचाईत झाली होती. विद्यार्थी-पालक व संघटनांच्या दबावामुळे अखेर ९०:१० कोटा लागू करण्याचा निर्णय विखे-पाटील यांनी अधिकृतपणे जाहीर करत त्याबाबतची अधिसूचना जारी केली. प्रवेश प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्राचार्य, शिक्षक व पालक यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या तीन लाख असून सीबीएसई व आयसीएसईचे विद्यार्थी सात ते आठ टक्के आहेत, त्यामुळे एसएससीच्या विद्यार्थ्यांना ९० टक्के राखीव जागा ठेवण्यात काही गैर नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त
करून या निर्णयाचे समर्थन केले होते.
एसएससी विद्यार्थ्यांच्यासमर्थकांची बैठक
९०:१० कोटय़ाचे स्वागत करण्यासाठी तसेच पुढील दिशा ठरविण्यासाठी पालक शिक्षक संघटनेच्या वतीने उद्या शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ सायंकाळी ५ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी विद्यार्थी व पालकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे संघटनेच्या अध्यक्षा सुनिता गोडबोले यांनी केले. याबाबत अधिक माहितीसाठी ९८२०५१८९५७, ९८९२६५१४०६, ९८२०५१८९५७,९२२३४१८५६५ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.