Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पुण्यातील जमीन बळकाव प्रकरण
मानकर यांचा ठावठिकाणा सांगा दहा हजार रु. मिळवा
पुणे, १८ जून / प्रतिनिधी

 

जमीन बळकावल्याप्रकरणी फरार असलेले काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या ठावठिकाण्याविषयी माहिती देणाऱ्या व्यक्तीला दहा हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा शहर पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी केली. ‘राजकीय व्यक्तींनी बिल्डरशी
संगनमत करून दहशत माजवून जमिनी बळकावल्या असतील, तर नागरिकांनी थेट पोलीस आयुक्तालयात किंवा गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात संपर्क साधावा,’ असे आवाहन डॉ. सिंह यांनी या वेळी पुन्हा केले. मानकर यांच्यासह आठजणांचा अटकपूर्व जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर मानकर यांच्या अटकेसाठी पोलिसांनी जोमाने प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, ‘लॅण्ड माफिया’ प्रकरणांची गंभीर दखल घेऊन, चतु:शृंगी ठाण्यामध्ये मानकर यांच्याविरूद्ध दाखल असलेल्या अतिक्रमणाच्या गुन्ह्य़ात आणखी कलमे लावण्यात येणार असल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले. मानकर हे पुण्याबाहेर पळून गेल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. डॉ. सिंह यांनी याबाबतची अधिक माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘मानकर यांना अटक
करण्यालाच सध्या पुणे पोलिसांचे सर्वाधिक प्राधान्य आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पाच पथकांना वेगवेगळी कार्यक्षेत्रे देण्यात आली आहेत. मानकर यांना पकडण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मानकर यांच्या घरी, तसेच कार्यालयांवर या पथकांनी छापे मारले आहेत. यापैकी एका ठिकाणी मानकर असल्याची खबर मिळाली होती. मात्र पोलीस पथक तेथे पोहोचण्यापूर्वीच मानकर तेथून पळून गेले.’’ मानकर यांच्याविरूद्ध शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले गुन्हे किंवा आलेल्या तक्रारींची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मानकर यांचे पूर्वीचे ‘रेकॉर्ड’ काढण्यात आले असून त्या गुन्ह्य़ांचा अभ्यासही सुरू करण्यात आला आहे, असेही डॉ. सिंह या वेळी म्हणाले.