Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

प्रादेशिक

बेहरामपाडा आग : मृतांची संख्या वाढण्याची भीती
मुंबई, १८ जून / प्रतिनिधी

वांद्रे पश्चिम येथील बेहरामपाडय़ातील आगीत कितीजणांचा मृत्यू झाला या विषयी गोंधळाची स्थिती असून पालिका, रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून वेगवेगळे आकडे सांगण्यात येत आहेत. अग्निशमन दलाने दोन बालकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले, मात्र स्थानिकांनी किमान चारजणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्य सचिवांच्या मुदतवाढीवर हायकोर्टाची सरकारला नोटीस
मुंबई, १८ जून /प्रतिनिधी

मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांना निवृत्तीनंतर सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर राज्य व केंद्र सरकारला नोटीस काढून मुंबई उच्च न्यायालयाने आज यावर येत्या सोमवारी सुनावणी घेण्याचे ठरविले. त्या दिवशी संबंधित रेकॉर्डही सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. पूर्वाश्रमीचे पत्रकार असलेल्या व आता वकिली करणाऱ्या आर. आर. त्रिपाठी यांनी ही जनहित याचिका केली आहे. याच विषयावर औरंगाबाद खंडपीठाकडे केली गेलेली याचिकाही मुंबईतील याचिकेसोबत सुनावणीसाठी येथे मागवून घेण्यात आली आहे.

आणखी एका राष्ट्रीय महामार्गाचा प्रकल्प ‘आयआरबी’ला मंजूर
मुंबई, १८ जून/ व्यापार प्रतिनिधी

गोवा-कर्नाटक सीमारेषेवरील ८४ किलोमीटरच्या आणि पणजी ते गोवा या १५३.०७ किलोमीटरच्या एनएच-४ए महामार्गाच्या चौपदरीकरणाचा ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी)’ तत्त्वावरील आणखी एक प्रकल्प आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडने हस्तगत केला आहे. महत्त्वाकांक्षी सुवर्ण चतुष्कोन प्रकल्पाअंतर्गत एकाच विकासकाकडे सर्वाधिक ७.५ टक्के हिस्सा असलेली म्हणजे पुणे ते भरूच या ४१५ किलोमीटरच्या पट्टय़ात विविध कामे यापूर्वीच ‘आयआरबी’कडून सुरू झाली आहेत.

शायनीला २ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी
मुंबई, १८ जून / प्रतिनिधी

मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेला अभिनेता शायनी आहुजा याला आज अंधेरी महानगरदंडाधिकारी न्यायालयाने २ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आज सायंकाळी शायनीची आर्थर रोड तुरूंगात रवानगी करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शायनीला आज न्यायालयात हजर करण्यात आले.

‘हार्बर’वर १२ डबा लोकलसाठी ममतांना साकडे
मुंबई, १८ जून / प्रतिनिधी
नवी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे हार्बर मार्गावरील ताण वाढत असल्याने, या मार्गावर १२ डब्यांच्या लोकल चालविणे गरजेचे आहे. त्यामुळे मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत (एमयूटीपी-२) प्रस्तावित केलेल्या या सुमारे ८०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पासाठी आगामी रेल्वे अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची विनंती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्राद्वारे केली आहे. राज्यामध्ये रेल्वे सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी रेल्वेकडून उचलण्यात येणाऱ्या सर्व प्रयत्नांना राज्य शासन व स्थानिक संस्थांकडून सर्वेतोपरी सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. एमयूटीपी-१अंतर्गत हाती घेतलेली कामे सध्या अंतिम टप्प्यात असून, येत्या डिसेंबपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यानंतर हाती घेण्यात येणाऱ्या एमयूटीपी२ प्रकल्प २०१३-१४ मध्ये पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. या दोन्ही प्रकल्पांनंतर मध्य व पश्चिम रेल्वेवरील सर्व लोकल बारा डब्यांच्या होतील. मात्र त्यांचे नियोजन करताना, हार्बर रेल्वेवर बारा डब्यांच्या लोकल चालविण्याकडे दुर्लक्ष झाले होते, असेही त्यांनी नमूद केले आहे.

शिवानंदन यांचा सज्जड दम!
‘काम करा अन्यथा खुर्ची सोडून द्या’
मुंबई, १८ जून / प्रतिनिधी

पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळताना प्रभावी काम करा अन्यथा खूर्ची सोडून द्या. मला तुमचे काम दिसले पाहिजे, असा दम नवे पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना भरला आहे. या परिषदेला १५ दिवसांच्या सुट्टीवर गेलेले सहआयुक्त (गुन्हे) राकेश मारिया हे उपस्थित राहिल्याने शिवानंदन यांच्या नियुक्तीमुळे मारिया मोठय़ा सुट्टीवर जातील ही अटकळ आज फोल ठरली. उलटपक्षी शिवानंदन यांनी मारिया यांचे कौतुक केले.
सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची गुन्हे परिषद शिवानंदन यांनी काल बोलाविली होती. या बैठकीत शिवानंदन यांनी सुरुवातीपासूनच सर्व पोलीस अधिकाऱ्यांना उद्देशून चांगले काम करा आणि काम करायचे नसेल तर खुर्ची खाली करा, असे सांगितले. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला सौजन्याची वागणूक दिली पाहिजे. विशेषत: वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याबरोबरच अमलीपदार्थांची तस्करी रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहनही शिवानंदन यांनी केले.