Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

केईएममधील अस्थिव्यंगशास्त्र विभागात मिळणार पंचतारांकित सुविधा!
राणावत यांच्या हस्ते होणार अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहाचे उद्घाटन

संदीप आचार्य

परळ येथील महानगरपालिकेचे केईएम रुग्णालय हे गेल्या ७० वर्षाहून अधिककाळ हजारो गोरगरीब रुग्णांसाठी ‘जीवनदायी’ ठरले आहे. किडनी ट्रान्सप्लांटपासून हृदयविकार शस्त्रक्रियांपर्यंत अनेक क्षेत्रात देशातील सार्वजनिक वैद्यकीय क्षेत्रात प्रथम असलेल्या केईएम रुग्णालय आणि शेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिरपेचात येत्या २३ जून रोजी आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या गुडघ्यावर जॉईंट रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करणारे अमेरिकेतील विख्यात अस्थिव्यंग शल्यविशारद डॉ. सी. एस. राणावत यांच्या हस्ते केईएमधील नूतनीकरण केलेल्या जाईंट रिप्लेसमेंट व स्पाईन सर्जरी थिएटरचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे हा विभाग आता पंचतारांकित इस्पितळाच्या तोडीस तोड होणार आहे.

लेगस्पेस वाढणार, आसनेही बदलणार
एमयूटीपी लोकलमध्ये पश्चिम रेल्वे सुधारणा करणार!

प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेवरील एमयूटीपीच्या नव्या लोकलमधील प्रथम वर्गाच्या डब्यांतील आसनांचे ओबडधोबड कुशन आणि अपुरी लेगस्पेस यामुळे या डब्यांतून प्रवास करणे प्रवाशांना दिवसेंदिवस असह्य होऊ लागला आहे. त्याबाबत प्रवाशांनी एसएमएसद्वारे पश्चिम रेल्वेकडे तक्रारी नोंदविल्या होत्या. त्याची दखल घेऊन पश्चिम रेल्वेने या लोकलमधील प्रथम वर्गाच्या डब्यांतील लेगस्पेस वाढविण्याचे काम हाती घेतले असून, आसनांचे कुशनही बदलण्यात येणार आहेत.

कुलाबा पोलीस ठाणे कारवाईची माहिती देत होते, पण..
राघवेंद्र राव, अनुभूती विष्णोई आणि स्वाती खेर
‘ताज’ बाहेर जमलेल्या पत्रकारांना राज्य सरकारतर्फे दहशतवाद्यांविरूद्ध कोणती कारवाई केली जात आहे याची माहिती कुलाबा पोलीस ठाण्यातून छापील पत्रकाद्वारे देण्यात येत होती. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना घटनास्थळापासून दूर राहाण्यास सांगण्यात येत होते. पोलीस कॉन्स्टेबल पत्रकारांना माहितीपत्रके वाटत होते; परंतु क्वचितच एखादा वार्ताहर ते घेत होता. मात्र बहुतांश वार्ताहर हे त्या माहितीपत्रकाऐवजी प्रत्यक्ष दृश्ये टिपण्यात, पाहाण्यात मग्न होते. ज्यांनी माहितीपत्रके घेतली; तेसुद्धा त्यावर वरवर नजर टाकून, कुत्सितपणे हसून, पत्रके फेकून देत होते.

पॉलिटेक्निकचे अभ्यासक्रम केंद्रीभूत पद्धतीने होणार
प्रतिनिधी

शासकीय व अनुदानित पॉलिटेक्निक (पदविका) महाविद्यालयातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी यंदापासून केंद्रीभूत पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा तत्त्वत: निर्णय महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. लवकरच या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

दुर्लक्षित स्मारके
अरबी समुद्रात शिवरायांचे भव्य स्मारक बांधण्यावरून सध्या वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळे वाद होत आहेत. त्या वादाकडे क्षणभर दुर्लक्ष करून महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांची अवस्था पाहिली तर कमालीची निराशा पदरी येते. तसे पाहता उठता-बसता राजकारण्यांसहीत सारेच मराठीजन शिवरायांच्या नावाचा जयजयकार करतात. त्यांचे पुतळे उभे करतात. अरबी सुमद्रात महाराजांचे भव्य स्मारक उभे करण्याचे ठरविण्यात आले आहे.

स्वप्ने साकार करू पाहणाऱ्या सौदागरांचा मेळावा
प्रशांत मोरे

वैयक्तिक आशा-आकांक्षांच्या क्षितिजाला गवसणी घालतानाच सामाजिक वास्तवाचे भान बाळगून निरनिराळ्या क्षेत्रात विशिष्ट ध्येय बाळगून कार्यरत असणाऱ्या तरुणांचे अनुभव ऐकण्याची संधी रविवारी २१ जून रोजी दुपारी ३ वाजता माटुंगा येथील कर्नाटक संघ सभागृहात आयोजित एका मेळाव्यात मिळणार आहे. केवळ अधिक चांगल्या परिस्थितीची स्वप्ने न पाहता ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करणारे सौदागर या मेळाव्याच्या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार आहेत.

इमारतनिधीसाठी ‘स्त्री मुक्ती संघटने’चे आवाहन
प्रतिनिधी

स्त्रिया व मुले यांच्या विकासाचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून विविध सामूहिक चळवळींत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘स्त्री मुक्ती संघटने’ची विचारधारा आणि उपक्रमांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळत आहे. त्याचबरोबर संघटनेच्या कामाचा व्यापही वाढू लागला आहे. संघटनेने आजवर मुंबई व उपनगरांत ठिकठिकाणी भाडेतत्त्वावर जागा घेऊन काम केले. परंतु, आता संघटनेने कोपरखैरणे-नवी मुंबई येथे सामाजिक कार्यासाठी राखून ठेवलेला प्लॉट सिडकोकडून विकत घेतला आहे.

केंद्राच्या निर्यात ऋण विभागात मराठी कर्मचाऱ्यांना न्याय
प्रतिनिधी

भारतीय ऋण गॅरंटी निगम लि. (ई.सी.जी.सी.)मध्ये चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी गेली १० ते १७ वष्रे हंगामी तत्त्वावर कार्यरत आहेत. आपल्याला नोकरीत कायम करावे अशी मागणी हे कर्मचारी गेली अनेक वष्रे करत आहेत. पण या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नव्हता. अखेर या कर्मचाऱ्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची मदत घेतली. यानुसार मनसेच्या कामगार सेनेचे उपाध्यक्ष गजानन राणे यांनी ई.सी.जी.सी. चे अध्यक्ष ए. व्ही. मुरलीधरन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सात दिवसांच्या आत केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या वाणिज्य विभागाकडे या कर्मचाऱ्यांच्या मागणीची शिफारस करू, असे आश्वासन दिले.