Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

‘आरोग्य केंद्रांसाठीच्या वादग्रस्त खरेदीची चौकशी’
पुढील सभेत अहवाल - माने
नगर, १८ जून/प्रतिनिधी
निवडणूक आचारसंहितेच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचा दर्जा उंचावण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत झालेल्या सुमारे दीड कोटींच्या साहित्यखरेदीची त्रयस्थ व्यक्तीकडून चौकशी करून पुढील सभेपुढे अहवाल ठेवण्यात येईल, अशी घोषणा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने यांनी आज सर्वसाधारण सभेत केली. अंदाजपत्रकीय सभा जि. प. अध्यक्ष शालिनीताई विखे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली.

जेसीबीमुळे जलवाहिनी फुटली;‘न्यू आर्टस्’समोर पाण्याचे तळे
नगर, १८ जून/प्रतिनिधी

दिल्ली दरवाजा ते पत्रकार चौक रस्त्याचे रुंदीकरण सुरू असताना पोलीस मुख्यालयाकडे जाणाऱ्या जलवाहिनीला धक्का लागून ती फुटली. त्यामुळे न्यू आर्टस् महाविद्यालयासमोर सकाळी सगळीकडे पाणी साचले होते.महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता परिमल निकम यांनी मुख्य फीटर अपाक यांना सांगून तातडीने दुरुस्ती केली. मात्र, तोपर्यंत बरेच पाणी वाया गेले.

पुणे-मनमाड प्रवासी रेल्वे लुटण्याचा प्रयत्न
श्रीगोंदे, १८ जून/वार्ताहर

पुण्याहून मनमाडकडे जाणारी प्रवासी रेल्वे आज पहाटे साडेतीन वाजता श्रीगोंदे स्टेशनजवळ अज्ञात १०-१२ दरोडेखोरांनी अडविण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी डब्यात प्रवेश करून काही प्रवाशांना धमकावून धक्काबुक्की केली. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पोबारा केला. पंधरा दिवसांपूर्वीही (३ जून) असाच प्रकार येथे घडला होता.

असह्य़ उकाडय़ानंतर कोसळल्या जलधारा
नगर, १८ जून/प्रतिनिधी

सुमारे पंधरा-वीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शहरात सायंकाळनंतर पावसाचे आगमन झाले. विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाने मध्यम स्वरूपात हजेरी लावली. पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला. गेले ४-५ दिवस असह्य़ उकाडय़ाने हैराण झालेल्या नगरकरांना पावसामुळे सुखद दिलासा मिळाला.

बाभळेश्वर भागात पावसाने २५ लाखांची हानी
पिंप्रीत ७०० कोंबडय़ा दगावल्या
राहाता, १८ जून/वार्ताहर
बाभळेश्वर परिसरातील ६ ते ७ गावांना बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसून २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक घरे जमीनदोस्त झाली, तसेच विजेचे खांब उन्मळून पडल्याने या गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. पिंप्री निर्मळ येथे कुक्कुटपालन व्यावसायिकांचे छत उडाल्याने ७०० कोंबडय़ा दगावल्या. लोणी येथे झाडावर वीज पडली. सुदैवाने प्राणहानी झाली नाही.

तोफखान्याचे निकम यांच्यासह १० अधिकाऱ्यांच्या बदल्या
नगर, १८ जून/प्रतिनिधी

जिल्हा पोलीस अधीक्षक विजय चव्हाण यांनी आज १० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात जिल्ह्य़ाच्या बाहेरून आलेल्या निरीक्षकांचाही समावेश आहे. वादग्रस्त ठरलेले आणि गुन्ह्य़ाची संख्या वाढलेल्या तोफखाना ठाण्याचे निरीक्षक एम. डी. निकम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर एस. बी. गायधनी आले आहेत. पाथर्डीचा तात्पुरता पदभार असणारे निरीक्षक एच. बी. शेख यांना तेथेच नियमित करण्यात आले.

बाजार समितीचे बंडखोर संचालक उपसभापती मुठे यांच्यावरही नाराज
श्रीरामपूर, १८ जून/प्रतिनिधी

बाजार समितीचे सभापती नानासाहेब पवार यांच्याविरूद्ध संचालकांनी दंड थोपटले असताना आता बंडखोर संचालकांनी उपसभापती कामिनी मुठे यांच्याविरूद्धही नाराजी व्यक्त केली आहे.पवार हे विखेसमर्थक असले, तरी उपसभापती मुठे या आमदार जयंत ससाणे समर्थक आहेत. मुठे यांनी संघटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला नाही. सभापतिपदाची निवड झाल्यानंतर त्या एकाही बैठकीस हजर राहत नाहीत.

पावसासाठी सीनाशंकराला साकडे
नगर, १८ जून/प्रतिनिधी

पाऊस पडून सीना नदी दुथडी भरून वाहू द्या, अशी प्रार्थना नगरकरांच्या वतीने सीनाशंकराला करण्यात आली. त्यानंतर आज सायंकाळपासून पावसाच्या सरी पडायलाही सुरुवात झाली!
नगर शहराजवळून वाहणाऱ्या सीना नदीचा उगम नगर-औरंगाबाद रस्त्यावरील बायजाबाईचे जेऊर गावाजवळील ससेवाडी येथे आहे. नदीच्या उगमाजवळ सीनाशंकराचे मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला डोंगरात गोमुख असून, त्यातून पाणी वाहते. तांडवनृत्यानंतर शंकराने क्षीण झटकला. त्या घामातून नदी वाहू लागली.

आनंद सप्ताह
१ मे ते १५ जून. विद्यार्थ्यांसाठी दीर्घ सुटी, शाळा नाही, क्लास नाही, तास नाही, त्रास नाही. गृहपाठाला सुटी. कधीही झोपा, कधीही उठा, दिवसभर टी.व्ही.समोर बसा, कोणी हटकत नाही. संध्याकाळी छानपैकी गाडीवर जाऊन भेळ खावी, कोल्ड्रिंक प्यावीत, आइसक्रीमवर ताव मारावा; अशा आनंदाच्या अत्युच्च शिखरावर विद्यार्थी सुटीत विराजमान झालेले असतात. दिवसामागून दिवस जातात. हळूहळू १५ जून जवळ यायला लागतो, शेवटी तो येतो आणि शाळा सुरू होते. मुले वेगळ्याच मूडमध्ये असतात.

वनराई संवर्धनाशिवाय तरणोपाय नाही - थोरात
चौथ्या दंडकारण्य अभियानास प्रारंभ
संगमनेर, १८ जून/वार्ताहर
चांगले पर्जन्य, शुद्ध हवा व उत्तम आरोग्यासाठी वनराईचे संवर्धन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले. अमृत उद्योग समूह व जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून तालुक्यात दंडकारण्य अभियानाच्या बीजारोपण कार्यक्रमाच्या वेळी श्री. थोरात बोलत होते.

वारकऱ्यांच्या गाडीला बसची
धडक; एक ठार, ५ जखमी
सोनई, १८ जून/वार्ताहर

वारकऱ्यांच्या मालमोटारीला आरामबसची पाठीमागून धडक बसून एक वारकरी ठार, तर आरामबसमधील पाचजण जखमी झाले. नगर-औरंगाबाद मार्गावर घोडेगाव (तालुका नेवासे) येथ काकडेवस्तीजवळ आज पहाटे ४ वाजता हा अपघात झाला. हरी बाळा घुगे (वय ७०, बेलदारवाडी, चाळीसगाव) असे मृताचे नाव आहे. एमएच १९ जे ००३१ व जीटीओ ५८३२ या मालमोटारींतून चाळीसगावकडची वारकरी दिंडी पंढरपूरकडे निघाली होती. घोडेगावच्या काकडेवस्तीजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या या मालमोटारींना आरामबसची (एमएच १२ सीटी २१४३) पाठीमागून धडक बसली. आरामबसमधील प्रकाश भोसले, उत्तम चव्हाण, दीपक खरात, इंद्रजीत पाटील व उकर्डा सोनवणे (सर्व जळगाव) किरकोळ जखमी झाले. जखमींवर वडाळा मिशन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घुगे यांच्या मृतदेहाचे नगरच्या सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आरामबस चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तंटामुक्त अभियानातील स्पर्धेत ६८ गावांचा सहभाग
राहुरी, १८ जून/वार्ताहर
महात्मा गांधी तंटामुक्त अभियानांतर्गत नगर जिल्ह्य़ात यंदा ६८ गावे स्पर्धेत आहेत. तंटामुक्त झालेल्या गावांचे मूल्यमापन झाल्यानंतर गावांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. पोलीस स्टेशननिहाय राहुरी तालुक्यातील केंदळ, कोळेवाडी, गणेगाव, मोकळओहोळ, खडांबे बुद्रुक व खडांबे खुर्द, मल्हारवाडी, दवणगाव, वरशिंदे, वळण, कुक्कडवेढे या गावांचा समावेश आहे. तसेच अकोले ३, संगमनेर ९, राहाता ४, कोपरगाव ६, शेवगाव ७, पाथर्डी ४, कर्जत ४, श्रीगोंदे ३, तर पारनेर तालुक्यातील ६ गावांचा समावेश आहे. नगर जिल्ह्य़ातील जामखेड तालुक्यात एकही गाव या तंटामुक्त मोहिमेतील स्पर्धेत नाही. मूल्यमापन समितीचे ८ जून रोजी प्रशिक्षण झाले. २५ जूनपर्यंत या समित्यांनी तंटामुक्त गावांचे मूल्यमापन करून अहवाल पोलीस अधीक्षकांना द्यावयाचा आहे.

रुग्णवाहिकेचा रविवारी लोकार्पण सोहळा
राहाता, १८ जून/वार्ताहर
शिर्डी विधानसभा मतदारसंघात नव्याने समाविष्ट झालेल्या संगमनेर तालुक्यातील आश्वी महसूल मंडळातील २६ गावांतील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून घेतलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहला २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजता आश्वी येथील आश्वी इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात होणार आहे. शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका समाजसेवेसाठी देण्यात येणार आहे.आश्वी महसूल मंडळातील २६ गावांतील ग्रामस्थ आणि जनसेवा मंडळ, तसेच जनसेवा समता युवक संघटना यांच्या पुढाकाराने रुग्णवाहिकेचा उपक्रम साकार झाला आहे.

जवळ्यात पुन्हा पाऊण तास ‘रास्ता रोको’
जामखेड, १८ जून/वार्ताहर
तालुक्यातील जवळे येथे सैनिकास जागा देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात जामखेड-करमाळा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुमारे पाऊण तास चालले. नायब तहसीलदार संतोष कांबळे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सैनिकसेवेतील कांतिलाल जगन्नाथ चव्हाण यांना जवळे येथील नगर भूमापन क्रमांक ४४४मधील क्षेत्र ९५.६ चौरस मीटर जागा (ग्रामपंचायत मिळकत क्रमांक ५०५) जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याच्या निर्णयाविरोधात आज गावकऱ्यांनी हे सर्वपक्षीय आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किसनराव दळवी, आदिनाथ साखर कारखान्याचे संचालक डॉ. महादेव पवार, काँग्रेसचे रामलिंग हजारे, डॉ. गोविंद रासने, निवृत्त शिक्षक किसनराव मेहेर, युवक कार्यकर्ते प्रदीप दळवी, प्रशांत पाटील, प्रदीप पाटील, संजय आव्हाड, रफिक शेख, संतोष शिंदे, अरुण लेकुरवाळे, दयानंद कथले आदी यावेळी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक कैलास गावडे, उपनिरीक्षक लक्ष्मण राख यांनी बंदोबस्त ठेवला.

‘इमारत बांधतानाच झाडे लावून पर्यावरण जपा’
नगर, १८ जून/प्रतिनिधी
इमारतींचे बांधकाम करताना वृक्षारोपणालाही महत्त्व देऊन पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असे प्रतिपादन बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ए. के. युसूफ यांनी केले. युसूफ यांनी नुकतीच संघटनेच्या येथील कार्यालयाला भेट दिली. जिल्हाध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. युसूफ व संघटनेचे राज्याध्यक्ष प्रताप साळुंके यांच्या हस्ते वाडिया पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. व्हॅट, प्रॉव्हिडंड फंड, टॅक्स, सिमेंटचे भाव यावर चर्चा करून आपण याबाबत लवकरच अर्थमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असे युसूफ यांनी सांगितले. आभार जवाहर मुथा यांनी मानले. डी. बी. जगताप, भगवान कदम, संजय गुगळे या वेळी उपस्थित होते.

संत निळोबारायांची पालखी रवाना
वाडेगव्हाण, १८ जून/वार्ताहर
श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील संत निळोबारायांच्या पालखीचे आज सायंकाळी ४ वाजता आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. टाळ-मृदंगाचा निनाद, निळोबा, ज्ञानोबा-तुकोबाच्या गजराने वातावरण चैतन्यमय झाले होते. दुपारी मंदिरात हरीकीर्तन झाल्यानंतर पालखीने प्रस्थान ठेवले. पिंपळनेर ते पंढरपूर दिंडी (कै.) रामदासबुवा यांच्या प्रेरणेने, बबनमहाराज पायमोडे यांच्या आशीर्वादाने दिंडी सुरू आहे. पिंपळनेर येथे निळोबांची संजीवन समाधी आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडय़ातील दिंडय़ा समाधीचे दर्शन घेतल्यानंतरच पंढरीसाठी मार्गस्थ होतात. येथे तीर्थक्षेत्र विकास योजनेतून विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

जमिनीच्या मोजणीनंतर दोषींवर कारवाई - आयुक्त
गायकवाड यांचे उपोषण मागे
नगर, १८ जून/प्रतिनिधी
जमिनीची मोजणी करून दोषी आढळल्यास नगरसेवक व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन आयुक्त कल्याण केळकर यांनी दिल्याने अंतोन गायकवाड यांनी आज सकाळी मनपा कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण सायंकाळी थांबवले. प्रभाग ११मध्ये असणाऱ्या स्वतच्या मालकीच्या भूखंडावर नगरसेवक पोपट बारस्कर यांनी मनपाच्या खर्चाने रस्ता तयार करून अतिक्रमण केले असल्याचा आरोप करून त्याच्या चौकशीसाठी गायकवाड यांनी उपोषण सुरू केले होते.लहुजी साळवे बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष असलेल्या गायकवाड यांनी सांगितले की, मनपा प्रशासनाला वारंवार या संदर्भात माहिती देऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती. नगरसेवकाने अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेले हे अतिक्रमण असून, त्यात आपल्या भूखंडाचा भाग गेल्याने उपोषण करावे लागले, असे ते म्हणाले. या भूखंडाची, तसेच मनपाच्या जागेची मोजणी करून सीमा निश्चित करण्याचे आश्वासन आयुक्तांनी गायकवाड यांना सायंकाळी लेखी दिले. मोजणीनंतर त्यात कोणी दोषी आढळले, तर कायदेशीर कारवाई करण्याचेही आयुक्तांनी मान्य केले.

मनपाच्या वर्धापनदिनानिमित्त दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन
नगर, १८ जून/प्रतिनिधी

महापालिकेच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त २९ व ३० जूनला महावीर कलादालनात दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन व ३० जूनला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे आज ठरले. महापौर संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी आज मनपात बैठक झाली. उपमहापौर नजीर शेख, आयुक्त कल्याण केळकर, उपायुक्त अच्युत हांगे, सहायक आयुक्त आर. ए. देशमुख, नगरसेवक बाळासाहेब पवार, संजय गाडे, अरिफ शेख यावेळी उपस्थित होते. दि. ३० जून २००३ हा मनपाचा स्थापना दिन. या दिवशी मनपातर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येतात. यावर्षी दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. महापौर जगताप यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लोकप्रिय नाटकाचा प्रयोग आयोजित करता येईल का, याबाबत विचारणा केली. त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केळकर यांनी सहायक आयुक्तांना केली. याशिवाय अन्य काही कार्यक्रमही आयोजित करण्याचा निर्णय झाला. त्याचा तपशील निश्चित करण्यास महापौरांनी सांगितले.

जामीन रद्द करण्याबाबत आरोपींना नोटिसा
दत्तात्रेय राऊत खूनप्रकरण
नगर, १८ जून/प्रतिनिधी

केडगाव येथे सन २००१मध्ये झालेल्या दत्तात्रेय राऊत खून प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन रद्द करण्यात का येऊ नये, अशा नोटिसा बजावल्या आहेत.राऊत खूनप्रकरणी नगरसेवक भानुदास कोतकर, गणेश नन्नवरे, अंकुश गायके, नयन गुरव, महसूल अधिकारी विठ्ठल शेळके, सर्जेराव शिंदे, चंद्रकांत नागवडे, भीमराज दातरंगे, मंजूर शेख, तुकाराम सुतार आदींविरुद्ध कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केले. मात्र, ते फेटाळण्यात आले. आरोपींनी खंडपीठात अर्ज केल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. या प्रकरणी तपास लवकर होत नाही, असे फिर्यादी शंकर विठ्ठल राऊत यांनी खंडपीठाचे न्यायमूर्ती ए. व्ही. निरगुडे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर सुनावणी होऊन खंडपीठाने आरोपींचे जामीन रद्द करण्यात का येऊ नये, अशा नोटिसा बजावल्या. पुढील सुनावणी दि. २२ला होणार आहे. राऊत यांच्यातर्फे जगदीश देशपांडे, अरुण कानडे, प्रशांत देशमुख, एम. ए. कंधारकर, सुनील थिटे, नाईक काम पाहात आहेत.