Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

रेल्वे पतसंस्थेच्या निवडणुकीत हाणामारी
दोघे गंभीर जखमी
८० टक्के मतदान ल्ल आज मतमोजणी
नागपूर, १८ जून / प्रतिनिधी
मध्य रेल्वेतील आठशे कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या पतसंस्थेच्या आज झालेल्या संचालक पदासाठीच्या निवडणुकीत अजनी बुथवर मतदान सुरू असताना कर्मचारी संघटनांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान आज नागपूर विभागातील सात मतदारसंघात ८०.५९ टक्के मतदात्यांनी मतदानाचा हक्क बजावला. उद्या, शुक्रवारी सकाळी विभागीय रेल्वे कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

वीज आयोगाच्या सुनावणीदरम्यान गोंधळ
आमदार फडणवीसांना अटक
सुनावणी तासभर स्थगित
दरवाढीला ग्राहकांचा विरोध
नागपूर, १८ जून / प्रतिनिधी

वीज महावितरणच्या दरवाढीच्या प्रस्तावावर राज्य वीज नियामक आयोगाची जनसुनावणी सुरू असताना आमदार देवेन्द्र फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांनी आयोगाविरुद्ध गोंधळ घातल्याने सुनावणीचे कामकाज तासभर बंद पडले. फडणवीसांनी दडपण वाढवल्याने आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षांना आसन सोडून बाहेर पडावे लागले. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी फडणवीस यांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका केली. दरम्यान, आयोगाच्या सुनावणीदरम्यान वीज ग्राहकांनी महावितरणच्या कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करून प्रस्तावित दरवाढ रद्द करण्याचा आग्रह धरला.

शुद्ध पाणी पुरवठय़ासाठी जागतिक आरोग्य संघटना, नीरीची मदत
गळत्या शोधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

नागपूर, १८ जून/प्रतिनिधी

शहरातील अनेक भागांमध्ये होणारा गढूळ पाणी पुरवठा रोखण्यासाठी व पिण्याच्या पाण्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (नीरी) यांच्या सहकार्याने नागपूर महापालिका उपक्रम राबविणार आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांना उत्तम दर्जाच्या पाण्याचा पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. हैद्राबाद पाणी पुरवठा विभागात हा प्रकल्प राबविल्यावर नागपूर महापालिकेच्या विनंतीवर जागतिक आरोग्य संघटनेने हा प्रकल्प राबविण्यास सहमती दर्शविली आहे.

विकासानंतर आता संन्यासाची भाषा करणारा लोकप्रतिनिधी!
अनिल बाळसराफ

राजुरा विधानसभा मतदारसंघाचा संतुलित विकास करून एक प्रगतिशील मतदारसंघ म्हणून पुढे आणण्याचे बरेच श्रेय आमदार, शेतकरी संघटना समर्थित स्वतंत्र भारत पक्षाचे प्रश्नंताध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप यांना आहे. १५ वर्षे विधानसभा सदस्य असलेले अ‍ॅड. वामनराव चटप यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. आंध्र सीमेवरील या मतदारसंघाची स्थिती पूर्वी अत्यंत दयनीय होती. रस्ते, पूल, विद्युतीकरण, शासकीय व शैक्षणिक कार्यासाठी इमारती, सिंचन, वैयक्तिक लाभाच्या योजना यांचा मोठा अनुशेष होता. अ‍ॅड. वामनराव चटप १९८९ मध्ये निवडून आले आणि मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून गेला.

तपास अहवाल २९ जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश
योगिता ठाकरे मृत्यूप्रकरण
नागपूर, १८ जून / प्रतिनिधी
गडकरी वाडय़ाच्या आवारातील कारमध्ये योगिता ठाकरे ही मुलगी मृतावस्थेत आढळल्याप्रकरणी पोलिसांनी २९ जूनपर्यंत तपासाचा प्रगती अहवाल सादर करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले असून या प्रकरणाची सुनावणी १ जुलैला निश्चित केली आहे.

महागाईचा उणे निर्देशांक अर्थव्यवस्थेसाठी घातक
ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्याचे संकेत
तज्ज्ञांचे मत ल्ल महागाईचा दर उणे १.६१
नागपूर, १८ जून/ प्रतिनिधी
महागाईचा उणे दर याचा अर्थ मगागाई कमी होणे, असा जरी असला तरी त्याचा दुसरा अर्थ ग्राहकांची क्रयशक्ती कमी होणे, असाही होत असल्याने ही स्थिती फार काळ राहणे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरू शकते, असे मत नागपूरचे व्यापारी व अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

‘स्वाईन फ्लू’चा संशयित अकोलेकर नागपुरात!
नागपूर, १८ जून / प्रतिनिधी

‘स्वाईन फ्लू’चे लक्षणे आढळून आल्याने एका अकोल्यातील तरुणाला येथील मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्या रक्त व थुंकीच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतरच त्याला ‘स्वाईन फ्लू’ झाला किंवा नाही, हे कळणार आहे. असे असले तरी त्याच्यावर प्रश्नथमिक उपचार सुरू असल्याचे मेडिकलच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

पतंजली योग समितीचे रमना मारुती परिसरात प्रश्नणायाम शिबीर
नागपूर, १८ जून / प्रतिनिधी
नॅशनल इंटिग्रेशन मेडिकल असोसिएशन वुमेन्स फोरम व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रमना मारुती परिसरातील शिवमंदिरात प्रश्नणायाम शिबीर आयोजित करण्यात आले.
यावेळी पतंजली योग समितीचे अध्यक्ष अ‍ॅड नामदेवराव फटिंग, हंसराज मिश्रा, अ‍ॅड श्रीकांत खंडाळकर, डॉ. डी. ए. पोजगे, डॉ. मंगेश भलमे, डॉ. मृण्मयी मासोदकर, प्रदीप काटेकर आदी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. २४ जूनपर्यंत शिबीर चालणार असून जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पतंजली योग समितीतर्फे करण्यात आले आहे.

मर्ढेकर जन्मशताब्दीनिमित्त शनिवारी राजाराम वाचनालयात व्याख्यान
नागपूर, १८ जून / प्रतिनिधी
धरमपेठेतील राजाराम वाचनालयात मर्ढेकर जन्मशताब्दीनिमित्त शनिवारी, २० जूनला सायंकाळी ६ वाजता ‘मर्ढेकरी कवितेचा घाट आणि प्रतिमासृष्टी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानात अमरावतीचे हेमंत खडके विचार मांडतील. अध्यक्षस्थानी अलीगड मुस्लीम युनिव्हर्सिटीचे मराठी विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास सिरास राहतील. राजाराम वाचनालय आणि प्रश्नध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या व्याख्यानाचा काव्य व साहित्य रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन वाचनालयाचे कार्यवाह अनिल चनाखेकर यांनी केले आहे.

कन्हान रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलासाठी निवेदन
नागपूर, १८ जून / प्रतिनिधी

कन्हान रेल्वे क्रॉसिंग येथे उड्डाण पूल व्हावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष विलास गजघाटे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कन्हान रेल्वे क्रॉसिंगवर नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होतो, त्यावेळेस दोन्ही बाजूला एक किलोमीटर रांगा लागतात. यात अनेक रुग्ण, विद्यार्थी, वृद्ध अडकतात. अनेक वर्षापासून ही मागणी करण्यात येत आहे मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पूल बांधून जनतेच्या भावनेचा आदर करावा, अशी मागणी प्रसिद्धीपत्रकात करण्यात आली आहे. यावेळी कैलास वारके, शरद मेश्राम, देवा रंगारी, विकास बोरकर, राजू भोसले, विशाल काळे, अतुल पिल्लेवान आदी उपस्थित होते.

जादूटोण्याच्या संशयावरून एकावर हल्ला
नागपूर, १८ जून / प्रतिनिधी

जादूटोण्याच्या संशयावरून एका तरुणाने शेजाऱ्यावर भाल्याने हल्ला केल्याची घटना नरखेडजवळील अंबाळा देशमुख गावात गुरुवारी दुपारी पावणेबारा वाजताच्या सुमारास घडली. बाबा भोला डायरे (रा. अंबाळा देशमुख) हे गंभीर जखमीचे नाव असून त्याला नरखेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो दुपारी घरी बसला असताना त्याच्या शेजारी राहणारा आरोपी रामदास रामा उके त्याच्या घरात शिरला. ‘तू माझ्या बायकोवर जादूटोणा केला आहे’ असे म्हणत त्याने भाल्याने बाबावर हल्ला केला. या हल्ल्यात बाबा गंभीर जखमी झाला. बाबा डायरे याच्या तक्रारीवरून नरखेड पोलिसांनी आरोपी रामदास रामा उके याच्याविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली.

स्टुडंट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांची कुलगुरूंशी चर्चा
ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन(एआयएसएफ)च्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंशी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. ज्यामध्ये बोगस पदवी प्रकरणे आणि इंडियन बार काऊंसिलच्या वयोमर्यादेसंदर्भात चर्चा करण्यात आली. बोगस पदवी प्रकरणात संघटनेने वेळोवेळी विद्यापीठाला निवेदन सादर केले. मात्र बऱ्याच महिन्यांपासून बोगस पदवी प्रकरणातील तथ्य विद्यापीठ शोधू शकलेले नाही, याची आठवण एआयएसएफने करून दिली. कुलगुरूंनी यासंदर्भात भरीव आश्वासन दिल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सेझमधील टेलिफोन एक्सचेंज इमारतीच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार
नागपूर, १८ जून/ प्रतिनिधी

सेझमधील टेलिफोन एक्सचेंजच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण जून अखेरीस नागपुरात येण्याची शक्यता आहे. सेझमधील बहुतांश पायाभूत सुविधांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. तर, काही विकासकामे पूर्ण झाली आहेत. त्यामध्ये टेलिफोन एक्सचेंजची इमारत, एमएडीसीची सेंट्रल फॅसिलिटी इमारत (सीएफडी), खापरी रेल्वे जवळील उड्डाण पुल, रस्ते उभारणी जलशुद्धीकरण व जलपुरवठा केंद्र, आदींचा समावेश आहे. टेलिफोन एक्सचेंजच्या इमारतीचे उद्घाटनासाठी ३० जूनला मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचवेळी ते प्रकल्पाचा दौराही करतील या कार्यक्रमास एमएडीसीचे उपाध्यक्ष व नवीन मिहान इंडिया प्रश्न. लि.चे. अध्यक्ष आर.सी. सिन्हा उपस्थित राहणार आहेत.

नागपूर मंडळाला झोनचा दर्जा देण्याची मागणी
नागपूर, १८ जून/ प्रतिनिधी

नागपूर परिसराचा औद्योगिकदृष्टय़ा विकास होत असल्यामुळे नागपूर मंडळाला झोनचा दर्जा मिळावा, अशी मागणी भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी रेल्वे बोर्डाला पाठवलेल्या पत्रातून केली आहे. जबलपूर हे वेगळ्या झोनमध्ये परिवर्तीत झाले आहे. नागपूर भुसावळ, सोलापूरला एक करून स्वतंत्र झोन होऊ शकतो. झोनच्या निर्मितीमुळे परिसरातील रेल्वेच्या अनेक समस्या सुटू शकतात. नागपूर रेल्वे स्थानकावर पार्किंगची सोय करण्यासाठी गणेश टेकडी समोरील मध्यप्रदेश परिवहन मंडळाला देण्यात आलेल्या जागेचा वापर होऊ शकतो, अशी सूचना शुक्ला यांनी केली आहे. गरीब आणि मध्यवर्गीय प्रवाशांना हॉटेलचे भाडे देणे परवडत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकावरच यात्री निवासाची सोय करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीनेही रेल्वे प्रशासनाने पावले उचलावीत, असेही शुक्ला यांनी या पत्रात नमूद केले आहे.