Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

नवनीत

जी व न द र्श न
इस्लामी साहित्य

 

फार कमी लोकांना ही कल्पना आहे, की अरबी भाषेनंतर इस्लामी साहित्याचे सर्वाधिक भांडार उर्दू भाषेत आहे आणि उर्दू भाषा निव्वळ भारतीय असल्या कारणाने या साहित्याचा सर्वाधिक भाग भारतात आहे आणि त्यानंतर पाकिस्तान व इतर राष्ट्रांचा क्रमांक लागतो. उर्दू भाषेनंतर तिसरा क्रमांक पíशयन भाषेचा आहे, ज्यात मुबलक इस्लामी साहित्य उपलब्ध आहे. आता ही जागा इंग्रजीने घेतली असावी, परंतु आकडेवारी उपलब्ध नसल्या कारणाने कुठलाही तर्क करणे कठीण आहे. एक मात्र खरे की मुस्लीम साहित्यकारांनी इतिहास, समाजशास्त्र, शरीअत, विधिशास्त्र, विज्ञान, ललित वाङ्मय, शायरी, हदीस, कुरआनाचे भाष्य म्हणजे तफम्सीर, पैगंबर चरित्र इत्यादी विषयांवर खूप लिखाण केले. इमाम राज़ी, अलबैरूनी, अबुअली सीना (Arecinna) इत्यादींसारख्या विज्ञानशास्त्रज्ञांनी लिहिलेले ग्रंथ सहासहाशे, सातसातशे वर्षे युरोपच्या अनेक विद्यापीठांतून क्रमिक पुस्तक म्हणून शिकविले गेले.
इब्नेसीना (इ. स. ९८० ते १०३७) चा सर्वमान ग्रंथ कॅनन ऑफ मेडिसिन (अलम्कानून फिम्त तिब) म्हणजे औषधींविषयी फतवे एकूण ८७ वेळा युरोपमध्ये अनुवादिला गेला आणि सुमारे ६०० वर्षांपर्यंत तेथे पाठय़पुस्तक म्हणून वापरला गेला. सेंट थॉमस अ‍ॅक्विनॉसने आपला ग्रंथ ‘सुम्मा थियोलॉजिया’ मध्ये एकूण ४०० वेळा इब्नेसीनाचा उल्लेख केला आहे. त्याने या ग्रंथात औषधविज्ञान, शरीरशास्त्र, औषधनिर्मितिशास्त्र, औषधालये परीक्षण, रोगांची चिन्हे आणि रोगनिदानशास्त्र यांसारख्या विषयांवर शास्त्रशुद्ध लिखाण केले आहे. अ‍ॅविसिन्ना (बुअलीसीनाचे) दुसरे सुप्रसिद्ध ग्रंथ अश्शिफम (आत्मोप्चार- Healing of soul)असे आहे. इस्लामी साहित्याच्या इतिहासातील ही अत्यंत तुरळक अशी काही उदाहरणे आहेत.
अनीस चिश्ती

कु तू ह ल
ताऱ्यांची स्थाने
ताऱ्यांची स्थाने दर्शविण्यासाठी कोणत्या संदर्भपद्धती वापरल्या जातात?

ताऱ्यांचे आकाशातील प्रत्यक्ष स्थान दाखविण्यासाठी स्थानिक संदर्भ पद्धतीचा वापर होतो. यामध्ये क्षितिज हे संदर्भवर्तुळ मानण्यात आले असून क्षितिजावरील उत्तरिबदू हा संदर्भिबदू म्हणून वापरला जातो. या पद्धतीनुसार तारा क्षितिजापासून किती अंशात्मक अंतरावर आहे, हे उन्नतांश हा संदर्भाक दर्शवितो आणि तो तारा क्षितिजाच्या संदर्भात कोणत्या दिशेला आहे हे क्षित्यंश हा संदर्भाक दर्शवितो. एखाद्या ताऱ्याचे संदर्भाक काढण्यासाठी त्या ताऱ्यापासून क्षितिजावर लंब टाकायचा. या लंबाची अंशात्मक लांबी म्हणजे त्या ताऱ्याचे उन्नतांश. हा लंब क्षितिजावर जिथे पडतो त्या िबदूचे उत्तरिबदूपासूनचे क्षितिजालगत मोजलेले अंशात्मक अंतर म्हणजे त्या ताऱ्याचे क्षित्यंश. स्थानिक पद्धतीनुसार दर्शविलेले ताऱ्यांचे संदर्भाक हे निरीक्षणाच्या वेळेवर आणि निरीक्षणाच्या जागेवर अवलंबून असतात.
ताऱ्यांचे संदर्भाक दर्शविणाऱ्या इतर पद्धती म्हणजे वैषुविक आणि आयनिक पद्धत. वैषुविक पद्धतीत खगोलाला दोन भागांत विभागणारे वैषुविकवृत्त हे संदर्भवर्तुळ मानले गेले असून वसंतसंपात िबदू हा संदर्भिबदू मानला गेला आहे. यातल्या क्रांती या संदर्भाकावरून तारा हा वैषुविकवृत्तापासून किती अंश अंतरावर आहे ते कळते. विषुवांश या संदर्भाकावरून तो तारा वैषुविकवृत्ताच्या संदर्भात कोणत्या दिशेला आहे ते कळते. आयनिक पद्धत ही वैषुविक पद्धतीसारखीच असून फक्त त्यात वैषुविकवृत्ताऐवजी सूर्याचा आकाशातला मार्ग दर्शविणारे आयनिकवृत्त हे संदर्भवर्तुळ म्हणून वापरले जाते. या पद्धतीनुसार ताऱ्याचे आयनिकवृत्तापासूनचे अंशात्मक अंतर हे शर या संदर्भाकाद्वारे दर्शविले जाते आणि तो तारा आयनिकवृत्ताच्या संदर्भात कोणत्या दिशेला आहे ते भोग या संदर्भाकाद्वारे दर्शविले जाते. वैषुविक आणि आयनिक पद्धतींचा निरीक्षणाच्या वेळेशी आणि जागेशी संबंध नसल्यामुळे नकाशे तयार करण्यासाठी या पद्धती उपयुक्त ठरतात.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
ऑंग सान सू की
रंगून येथे १९ जून १९४५ रोजी आँग सान सू की यांचा जन्म झाला. १९४८च्या सुमारास ब्रह्मदेश ब्रिटिशांच्या जोखडातून सोडविण्यात तिच्या वडिलांचा उ आँग सानचा वाटा मोठा होता. पण देशाला स्वातंत्र्य मिळताक्षणी त्यांचा खून झाला. तिची आई डाव खीन की १९६६च्या सुमारास भारतात ब्रह्मदेशाच्या राजदूत म्हणून आल्या. येथेच सू की ची जडणघडण होत गेली. ऑक्सफर्डमधून राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. मायकेल एडिस या ब्रिटिश गृहस्थाशी त्यांनी विवाह केला. आईच्या निधनाने त्या योगायोगाने राजकारणात ओढल्या गेल्या. साम्यवाद आणि लष्करशाहीवाद्यांनी ब्रह्मदेशाला पार भिकारी बनवले, हे त्यांच्या लक्षात आले. या लष्करशाहीच्या विरोधात तिने उडी घेतली. अल्पावधीत ती ब्रह्मदेशाच्या लोकशाहीच्या चळवळीचा एक आवाज बनली. परिणामी, लष्करी हुकूमशहा नेविलने राजीनामा दिला. नॅशनल लीग फॉर डेमॉक्रामी या पक्षाच्या त्या प्रमुख बनल्या. निवडणुकीत त्यांच्या पक्षाला ८२ टक्के जागा मिळाल्या. पण सू की यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले. काही अटींवर त्यांना सोडण्याची तयारी लष्कराने दाखविली. त्यांनी या गोष्टीला असहमती दर्शविली. ब्रह्मदेशाच्या लष्करशहाने जरी तिची दखल घेतली नाही तरी जगाने मात्र घेतली. शांततेच्या नोबेल पारितोषिकाची ती मानकरी ठरली. ‘फ्रीडम फ्रॉम फीअर अँड अदर रायटिंग्ज’ हे पुस्तकही त्यांनी प्रसिद्ध केले. अलीकडे ब्रह्मदेशात लष्करशाहीच्या विरोधात तिच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने झाली. गांधीजींच्या तत्त्वावर विश्वास असणाऱ्या आँग सान सू की चा ब्रह्मदेशात लोकशाही स्थापण्याचा लढा अजूनही अव्याहतपणे सुरू आहे.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
प्रचंड मोठी लाट

ओनामी नावाच्या तरुण जपानी मल्लाची ही गोष्ट आहे. ओनामी ताकदवान होता. खूप मेहनतीने त्याने शरीर कमावले होते. कुस्तीशास्त्रात तो निपुण झाला होता. कुस्तीतले अनेक डाव सहजपणे खेळून तो प्रतिस्पध्र्याला लीलया चीतपट करत असे. एवढेच नव्हे तर तो आपल्या गुरूंनाही कुस्तीत हरवू शके. खूप लोकांसमोर मात्र ओनामी बुजे. घाबरून जाई. गर्दी समोर पाहिली की कुस्ती खेळण्याऐवजी त्याचे सारे अवसान गळून जाई. हातापायांना कापरे भरे. तोंड कोरडे होई. त्यामुळे प्रतिस्पर्धी जरी त्याच्यापेक्षा कमजोर, कमी निष्णात असला तर स्पर्धेच्या वेळी गर्दीतले लोक ओरडून प्रोत्साहन देऊ लागले, की ओनामी हमखास कुस्ती हारे. आपल्या भित्रेपणाची, दुबळेपणाची त्याला चीड येई, पण करणार काय? त्याचा स्वत:वरचा, स्वत:च्या मल्लविद्येतील कौशल्यावरचा विश्वास डळमळीत होऊ लागला. तो निराश झाला. अशा मनस्थितीत गुरूशिवाय दुसरा कोण योग्य मार्ग दाखवणार? असा विचार करून ओनामी गुरूंकडे आला. त्याने सारे कथन केले आणि आदराने वाकून तो म्हणाला, ‘‘आपण मला मार्गदर्शन करावे.’’ गुरू म्हणाले, ‘आज तू माझ्याबरोबर या मंदिरात राहा. माझ्या शेजारी बस. अगदी शांत बस. विसरून जा की तुला भीती वाटते. विसर की तू मल्ल आहेस. कल्पना कर की तू एक लाट आहेस. एक प्रचंड मोठी लाट. ही लाट समोर येईल त्याला स्वत:च्या वेगात वाहून नेते आहे. डोळे मीट. स्वत:ची प्रचंड लाट पाहा.’ ओनामी गुरूशेजारी डोळे मिटून बसला. मनात येणारे वेगवेगळे विचार हळूहळू विरून गेले. हळूहळू त्याला वाटायला लागले, की आपण एक प्रचंड मोठी लाट आहोत. लाट आणखी मोठी होऊन वेगाने पुढे जाऊ लागली. जाताना आसपासचे लाटेत वाहून गेले. तो बसला होता ते मंदिरही प्रचंड लाटेत झाकून गेले. लाट वाढतच गेली, इतकी की तिचा एक प्रचंड समुद्र झाला. ओनामीच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटले. ते स्मित होते आत्मविश्वासाचे, स्वत:मधल्या या सामर्थ्यांचा साक्षात्कार झाल्याचे. गुरूंनी त्याच्या खांद्याला हलकेच स्पर्श केला. ते ओनामीला म्हणाले, ‘आता यापुढे तुला कसलीही भीती वाटणार नाही, कारण तू एक प्रचंड लाट आहेस आणि पुढे येणारी प्रत्येक गोष्ट वाहून नेण्याची प्रचंड शक्ती तुझ्यात आहे.’ त्या दिवशी बऱ्याच काळानंतर ओनामी पुन्हा कुस्ती स्पर्धेमध्ये उतरला.जिंकला. नंतर कधीही हरला नाही.
आपल्यामधले सामथ्र्य कळणे आवश्यक असते. आपल्यात सामथ्र्य आहे हे एकदा जाणून घेतले की मनात आणू ते उत्तमरीत्या करून दाखवू, हा विश्वास आणि शक्ती तुमच्यात निर्माण होते की नाही ते पाहा. एक लक्षात ठेवा. तुमच्यात खूप शक्ती आहे.
आजचा संकल्प : माझ्यात कुठलीही गोष्ट करण्याचे सामथ्र्य आहे.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com