Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘सेनेत फूट पाडून पक्ष ‘हायजॅक’ करू इच्छिणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावले’
शिवसेना वर्धापनदिनानिमित्त विशेष मुलाखत

 

युतीच्या शासनाने केलेल्या विकासकामांचे, सुरू केलेल्या प्रकल्पांचे दान युतीच्या पदरात पडले नाही, याची खंत तर वाटतेच पण त्याचवेळेस २६/११ च्या घटनेनंतरही शहरी भागातील, विशेषत: मुंबईतील मतदार कॉँग्रेसलाच मते देतात याचे आश्चर्यही वाटते असेही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेवर आजपर्यंत शहरी पक्ष असा शिक्का होता, शेती-शेतकरी आणि त्यांच्या समस्या याविषयी सेनेला माहिती नाही आणि आस्थाही नाही असे चित्र होते. लोकसभेच्या निवडणुकीत एकीकडे शहरातून सेना उखडली गेली तर दुसरीकडे ग्रामीण भागात सेना हातपाय पसरते आहे असे चित्र निर्माण झाले. या पाश्र्वभूमीवर शहरातील पकड ढिली होत असल्याचे लक्षात आल्याने तुम्ही जाणीवपूर्वक ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले का, असे विचारले असता उद्धव ठाकरे यांनी नकारार्थी मान हलवत, आमचा शहरी भागातला अति आत्मविश्वास नडला असे प्रामाणिकपणे मान्य केले. गेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल, पोट निवडणुकांमधले यश आणि महापालिका निवडणुकांमध्ये आजवर मुंबईकरांनी दिलेली साथ लक्षात घेता शहरी भागातील यश आम्ही गृहीत धरून चाललो होतो. किंबहुना त्यामुळेच आम्ही ग्रामीण भागात जास्त सभा घेतल्या. तिथल्या सभांना होणारी गर्दी आणि थेट माझ्याशी संवाद साधण्याची ग्रामीण मतदारांची तयारी पाहून आम्हाला तिथल्या यशाचा अंदाज आला होता असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शहरी भागात मनसेमुळे युतीचे उमेदवार पडले या केल्या जाणाऱ्या विश्लेषणाबाबत स्पष्ट नापसंती दर्शवीत, अमराठी व मुसलमान मते एकवटल्यामुळेच कॉँग्रेस विजयी झाल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षासोबतच्या संभाव्य युतीच्या चर्चेमुळे शिवसेनेच्या पाठीराख्यांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाल्याचे मान्य करतानाच प्रत्यक्षात मात्र अशा हातमिळवणीची कोणतीही शक्यता नव्हती, तसे काहीही बोलणे देखील झालेले नव्हते, परंतु पवारांनी आजारपणाच्या निमित्ताने लीलावती रुग्णालयात जाऊन घेतलेली बाळासाहेबांची भेट, मराठी राष्ट्रपतीच्या पाश्र्वभूमीवर मराठी पंतप्रधानाचा आलेला मुद्दा यामुळे सेनेच्या भूमिकेसंदर्भात गोंधळ निर्माण झाला. त्यातच सामनामध्ये आलेल्या एका अग्रलेखामुळे या गोंधळात आणखी भर पडली. पवारांनी कदाचित कॉँग्रेसवर दबाव आणण्यासाठी या वातावरणाचा उपयोग करून घेतला असावा, माझ्यापेक्षा ते अधिक चाणाक्ष राजकारणी असल्याने असे घडले असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
युतीच्या काळात सुरू झालेल्या विकासकामांचे श्रेय युतीला मिळाले नाही, या कामांची दवंडी पिटण्यात आम्ही कमी पडलो, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी त्याची जंत्रीच समोर ठेवली. ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे’, ‘मुंबईतील ३३ उड्डाणपूल’ ही कामे युतीनेच केली आहेत. आयटीनगरी म्हणून तोवर बंगळूरचा लौकिक होता, पण मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्तेच हिंजेवाडी प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्याचे आज विशाल आयटी क्षेत्रात रुपांतर झाले आहे. वांद्रे ते वरळी आणि वरळी ते नरिमन पॉइंट असा ‘रज्जूसेतू’चा मूळ प्रकल्प युतीच्या काळात सुरू झाला होता. दहा वर्षांत त्याचा केवळ एक टप्पा पूर्ण झाला पण त्याचा खर्च मात्र चौपट वाढून १६०० कोटी रुपये झाला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. केवळ एका पुलाच्या बांधकामासाठी १६०० कोटी आणि संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्यासाठी असलेल्या ‘ब्रिम्स्टोव्ॉड’ प्रकल्पासाठीही १६०० कोटी, याला काय म्हणावे? त्यातही प्रत्यक्षात केवळ ४०० कोटीच आजवर पालिकेला मिळालेले आहेत. कृष्णा खोऱ्यातील रखडलेले प्रकल्प पाहून मनात उदासी दाटून येते आणि हे सर्व कसे सहन केले जाते असा प्रश्न पडतो, हे सांगताना उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरचा संतापही स्पष्टपणे जाणवला.
आपल्या छायाचित्रणकलेचा अभिमानाने उल्लेख करतानाच त्यांनी कलाक्षेत्रातील महाराष्ट्राच्या पीछेहाटीविषयी खंत व्यक्त केली. तुम्ही स्वत: कलाक्षेत्राशी संबंधित आहात, जे. जे. कला महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात, तरीही सांस्कृतिक चळवळी, अराजकीय आंदोलने यात सेनेने कधीच पुढाकार घेतलेला नाही याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘जेजे’च्या अवस्थेविषयी एवढे काही प्रसिद्ध होऊनही त्या संदर्भात काही केले जात नाही. परंतु जेजेसंदर्भात जेजे काही करणे आवश्यक व उचित असेल तेते आपण निश्चित करू असेही त्यांनी सांगितले. ‘जेजे’मध्ये एकेकाळी उत्तम शिक्षकवर्ग होता. तेथील विद्यार्थी कलाक्षेत्रात उत्तम कामगिरी करत होतो. आज जे.जे.ची रया गेलेली आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमानिमित्त मी तिथे गेलो होतो तेव्हा कोळिष्टकांनी भरलेले वर्ग आणि अवस्था मी पाहिली आहे. या संदर्भात अराजकीय असे आंदोलन करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी योग्य ती पावले उचलण्यासंबंधी मी आदेश देणार आहे असे ते म्हणाले.
तुमच्याशी संपर्क साधणे कठीण जाते. त्यामुळे अनेकदा गैरसमज निर्माण होतात असे म्हटले जाते, यावर आपली बाजू स्पष्ट करताना, ‘काही लोकांपासून मी जाणीवपूर्वक दूर राहतो,’ असे त्यांनी न संकोचता सांगितले. प्रसारमाध्यमातील काही व्यक्तींपासून किंवा राजकीय नेत्यांपासून दूर राहण्यास त्या त्या वेळी घडलेल्या काही घटना कारणीभूत असतात, असे त्यांनी उदाहरणे देत स्पष्ट केले. ‘ज्यांच्या संपर्कात राहणे आवश्यक असते त्यांच्या संपर्कात मात्र मी राहतो,’ असे सूचकपणे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य पसरले होते.
मनसे आणि राज ठाकरे या विषयावर बोलण्यास ते फार उत्सुक नव्हते. परंतु आपण कार्याध्यक्ष झालो तेव्हाची परिस्थिती आणि त्यानंतर घडलेल्या काही घटना त्यांनी विस्ताराने सांगितल्या. ‘आपल्याला राजकारणात रस नव्हता किंवा त्यात गती नव्हती या सर्व अफवा आहेत. एकदा कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यावर सुरुवातीची काही वर्षे मी केवळ संघटना बांधण्याचे काम केले आणि सेनेत फूट पाडून पक्ष ‘हायजॅक’ करू इच्छिणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावले’ असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
या सर्व घटनाक्रमातील कौटुंबिक कलहाच्या आणि पुत्रप्रेमाच्या बाता धुडकावून लावत ‘बाळासाहेबांना पक्षाची काळजी होती आणि त्यांनी कोणतेही निर्णय घेताना नाती-गोती पाहिली नाहीत’, असे मात्र उद्धव यांनी ठासून सांगितले.