Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

घारापुरी-राजबंदर जेट्टी कोसळण्याची भीती
उरण/वार्ताहर - महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या अखत्यारित असलेल्या घारापुरी- राजबंदर जेट्टीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ६० वर्षांहून जुन्या या जेट्टीची वेळीच दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यातील उसळत्या लाटांनी ही जेट्टी उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घारापुरी बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर आदी तीन गावांत चार जेट्टय़ा आहेत. मुंबईहून येणाऱ्या बहुतांश पर्यटकांची शेतबंदर बंदरातूनच ये-जा होते. मोराबंदर गावातील कच्ची जेट्टी कधीच उद्ध्वस्त झाली आहे.

ठाणे-पनवेल रेल्वेसाठी सिडकोची लॉबिंग
नवी मुंबई / प्रतिनीधी

ठाणे-नेरुळपाठोपाठ ठाणे-पनवेल रेल्वे सुरू करून या भागातील प्रवाशांना आशेचा किरण दाखविणाऱ्या रेल्वेने आता या दोन्ही मार्गावर गाडय़ांच्या फेऱ्या वाढवाव्यात, यासाठी सिडकोने प्रयत्न सुरू केले आहेत. सध्याच्या घडीस ठाणे-नेरुळ मार्गावर लोकलच्या ३४ (दोन्ही बाजूस) तर, पनवेल मार्गावर अवघ्या चार फेऱ्या होतात. या फेऱ्यांमध्ये वाढ व्हावी, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. हे लक्षात घेऊन या दोन्ही मार्गावर नऊ डब्यांची आणखी एक लोकल सुरू करावी, असा आग्रह सिडकोने रेल्वेकडे धरला आहे. विशेष म्हणजे, येत्या ३ जुलै रोजी सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पानंतर ठाणे-पनवेल मार्गावर रेल्वेने नवे वेळापत्रक जाहीर केले जावे, यासाठीही आता प्रयत्न सुरू झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस ‘दे धक्का’च्या मूडमध्ये
पनवेल/प्रतिनिधी - केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ‘प्रसंगी वेगळा विचार करून ठेवा’ असा नवी मुंबईमध्ये बुधवारी दिलेला सल्ला पनवेलमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमलात आणण्याची शक्यता आहे.

पनवेलमध्ये आज पाणी नाही
पनवेल/प्रतिनिधी -जलवाहिन्यांची तांत्रिक दुरुस्ती करण्यात येणार असल्याने पनवेलमध्ये १९ जून रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही. पाण्याचा साठा करून नागरिकांनी योग्य सहकार्य करावे, असे आवाहन पनवेल नगरपालिकेने केले आहे.

हजारो लिटर पाणी वाया
पनवेल/प्रतिनिधी - पनवेल-पुणे महामार्गावर कोळखे गावातील जलवाहिनीतून गेले १५ दिवस हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे उघड झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना कोळखे गावात मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाण्याचे भले मोठे तळे निर्माण झाले आहे. मुंबई-पुणे महामार्गावर टाटा मोटर सव्‍‌र्हिसच्या पुढे असणाऱ्या कोळखे गावात महाराष्ट्र जीवन प्रश्नधिकरणाची जलवाहिनी फुटल्याने धो-धो पाणी वाहत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रकार गेले १५ दिवस सुरू असून, तेथे एकही अधिकारी फिरकला नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. या नादुरुस्त जलवाहिनीमुळे तेथे मोठा ओहोळ तयार झाला असून, ते पाणी वाहत गावामागील भल्या मोठय़ा खोलगट भागात जमा होत असल्याने तेथे कृत्रिम तळे निर्माण झाले आहे. मोठय़ा प्रमाणावर साचत असलेल्या या पाण्याचा ग्रामस्थांना काहीएक उपयोग होताना दिसत नाही. या परिसरात काही काळासाठी थांबणारे ट्रकचालक मात्र या ओहोळात डुंबून उन्हाची काहिली कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मृत शेतकऱ्याच्या पत्नीला विमा
पनवेल/प्रतिनिधी - राज्य सरकारच्या व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत सुगंधा शिवराम पाटील या महिलेला गुरुवारी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. पनवेलजवळील हरीग्राम येथे राहणाऱ्या शिवराम रामा पाटील या शेतकऱ्याचे गेल्यावर्षी अपघाती निधन झाले होते. पनवेलमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या हस्ते या महिलेला धनादेश देण्यात आला. यावेळी आमदार विवेक पाटील, तालुका कृषी अधिकारी साळवी उपस्थित होते.

कामोठे-घणसोलीत आज पाणी नाही
खारघर - मोरबे जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी उद्या कामोठे ते घणसोली परिसरातील पाणीपुरठा बंद ठेवण्यात येणार आहे. मोरबेच्या कळंबोली-दिघा मुख्य जलवाहिनीवरील तळोजा येथे दुरुस्तीचे काम अभियांत्रिकी विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे १९ जून रोजी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत १६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे कामोठे, खारघर, बेलापूर, सानपाडा, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे व घणसोली या भागांतील रहिवाशांना पाणीपुरवठा होणार नाही. सदर काम पूर्ण झाल्यावर देखील किमान दोन दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

युनियन बँकेला ३५ लाखांचा गंडा
कोपरखैरणे - खोटय़ा कागदपत्रांद्वारे युनियन बँकेला ३५ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना कोपरखैरणे येथे नुकतीच घडली. याप्रकरणी आठ जणांच्या एका टोळीचा पोलीस शोध घेत आहेत. युनियन बँक ऑफ इंडियाच्या कोपरखैरणे शाखेत खोटय़ा कागदपत्रांचा वापर करून वाशीतील विनोद मोरे व शिल्पा मोरे या दाम्पत्याने ३५ लाख रुपये कर्ज काढले. २००७ साली या दाम्पत्यासोबत भवरलाल भारी, शांताराम शिंदे, अनिल करंजकर, बाबू शिंदे, जितू धनगर व जयंत मेश्राम यांनी संगनमताने वरील कर्ज काढले होते. दोन वर्षांत या सर्वांनी कर्जाची परतफेड न केल्याने त्यांच्या कागदपत्रांची छाननी केल्यावर बँक अधिकाऱ्यांना बँकेची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी कौपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

बस मार्गात बदल करण्याची मागणी
बेलापूर - बेस्ट उपक्रमाने नुकतीच सुरू केलेल्या वडाळा ते नेरुळ सेक्टर-४६ या बसच्या मार्गात बदल करण्यात यावा, अशी मागणी नेरुळवासीयांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत भारतीय विद्यार्थी सेनेचे उपविभाग संघटक विशाल विचारे यांनी शेकडो विद्यार्थी व पालकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन बेस्टच्या महाव्यवस्थापकांना दिले आहे. त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, वडाळ्याहून आलेली बस गायमुख चौकातून थेट सेक्टर-४६ येथे जाते; मात्र सेक्टर ४८ मध्ये अंतर्गत भागातील अनेक रहिवासी व विद्यार्थी दररोज मुंबईमध्ये ये-जा करत आहेत. बेस्टने सुरू केलेली ही बस नेरुळवासीयांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याने सेक्टर ४८ मधील रहिवाशांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी ही बस सेक्टर-४८ मधून नेण्यात यावी, अशी मागणी विचारे यांनी केली आहे.

सानपाडा येथे भरदिवसा महिलेस लुटले
सानपाडा - सानपाडा येथे रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याची घटना नुकतीच घडली. फिर्यादी नमिता साळुंखे या सायंकाळी ३ वाजता सानपाडा सेक्टर १० येथील रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या गळ्यातील २७ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून चोरून नेले. या प्रकरणी साळुंखे यांनी तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सीबीडीत दोन लाखांची घरफोडी
बेलापूर - बंद घराचे कुलूप तोडून आतील दोन लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरटय़ांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. फिर्यादी गणेश मुलबिंद्रा हे बाहेरगावी गेले असता चोरटय़ांनी ८ ते १६ जून या कालावधीत त्यांच्या घरात चोरी केली. या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुर्भे येथे अपघातात वृद्ध महिला ठार
तुर्भे - तुर्भे स्टोअर येथे रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेस भरधाव वेगातील ट्रकने जोरात धडक दिली. या अपघातात गोजाबाई लांडगे (७३) जागीच ठार झाल्या. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गोजाबाई या ठाणे-बेलापूर मार्ग तुर्भे स्टोअर येथे ओलांडत होत्या. यावेळी केजी-१९-एजी ४९४४ भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना जोरात धडक दिली. या प्रकरणी फरार ट्रकचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

साखळी उपोषण
बेलापूर - नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य, पाणीपुरवठा, मलनिस्सारण विभागातील कामगारांच्या विविध मागण्या प्रशासनाने मान्य न केल्याने महाराष्ट्र कर्मचारी युनियनने गुरुवारपासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. कंत्राटी कामगारांना समान काम, समान वेतन लागू करणे, दहिसर भागातील २४ कामगारांना कामावर घेणे, कामगार विमा योजना लागू करणे, वेळेवर वेतन मिळावे, हजेरी शेड बांधून मिळावी, सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळावे, अनुकंपा तत्त्वावर कामगारांच्या मुलांना कामावर घेणे आदी मागण्या एका निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केल्या आहेत.