Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

पावसाचे आगमन लांबल्याने पाणीपुरवठय़ात १० टक्के कपात
प्रतिनिधी / नाशिक

पावसाचे आगमन अपेक्षेहून कितीतरी अधिक लांबल्याने गहिऱ्या बनलेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्य़ातील धरणांमध्ये सद्यस्थितीत जो जलसाठा शिल्लक आहे, त्याचा काटकसरीने वापर व्हावा म्हणून जिल्हयात सर्वत्र पाणी कपातीचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार नाशिक व मालेगाव महापालिकांसह सर्व नगरपालिका, छावणी मंडळ, पाणी पुरवठा योजना, औद्योगिक वसाहती व लष्करी विभाग आदींच्या पाणी पुरवठय़ात १० टक्के कपात करण्यात येईल. चणकापूर धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने मालेगाव शहर व आसपासच्या भागात जूनच्या अखेरीस दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे.

ठेवीदार बचाव समितीतर्फे ‘जोडे मारो’ आंदोलन
प्रतिनिधी / नाशिक

अनियमित व बेशिस्त आर्थिक गैरव्यवहारांमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बँका व पतसंस्थांच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत कराव्यात या मागणीसाठी ठेवीदार बचाव समितीने गुरुवारी सहकार विभागातील भ्रष्ट अधिकारी व अडचणीत सापडलेल्या बँकांच्या नाम फलकावर जोडे मारून आपला रोष प्रगट केला. यावेळी प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारण्यास पोलिसांनी अटकाव केल्याने आंदोलकांना फलकावर जोडे मारून समाधान मानावे लागले.

माझा पाठिंबा, माझी अपेक्षा
प्रतिनिधी / नाशिक
शहरवासियांच्या अभूतपूर्व आंदोलनामुळे पोलीस आयुक्तांची बदली स्थगित करण्याचा निर्णय अखेर राज्य शासनाला घ्यावा लागला असला तरी आता पोलीस आयुक्त म्हणून काम करताना विष्णुदेव मिश्रा यांची जबाबदारी अधिकच वाढली आहे. अर्थात, ही बाब खुद्द मिश्रा यांनाही मान्य असली तरी त्यांना समर्थन देण्यासाठी जे-जे नाशिककर हिरीरीने रस्त्यावर उतरले त्यांच्याही पोलीस आयुक्तांकडून काही अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. या अपेक्षा त्यांच्याच शब्दात मांडणारी मालिका..

सुरक्षेच्या दृष्टीने नियोजनात्मक उपायांवर भर : मिश्रा
वार्ताहर / नाशिकरोड

अशांत व असुरक्षिततेच्या वातावरणात वावरणाऱ्या नाशिककरांना दिलासा देतानाच सर्वसामान्य जनता खऱ्या अर्थाने भयमुक्त व्हावी म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजनात्मक उपाय योजण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केल्याची ग्वाही पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांनी येथे पत्रकात परिषदेत दिली.

नागरी सहकारी बँका : जागतिकीकरण आणि विकासाची नवी आव्हाने
‘देशातील सहकारी चळवळीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशातील एका भागात असेलेली सहकारी चळवळसुद्धा संपूर्ण राष्ट्राचे स्वरुप बदलून टाकते. म्हणूनच माझी इच्छा आहे की, महाराष्ट्रातील सहकारी चळवळींतील काही क्षेत्रांचे अनुकरण इतर राज्यांनीसुद्धा करावे.’

लाच स्वीकारताना महापालिकेच्या लिपीकास अटक
नाशिक / प्रतिनिधी

नवीन घराच्या मालकी हक्कात बदल करण्यासाठी ५०० रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या महापालिकेच्या घरपट्टी विभागातील वरिष्ठ लिपीक सुधीर कचेश्वर दाणी याला आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले. मालकी हक्कात बदल करण्यासाठी दाणीने तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली होती. तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंडित कॉलनीतील महापालिकेच्या इमारतीत सापळा रचलाा. दुपारी साडे तीनच्या सुमारास ५०० रूपये स्वीकारत असताना पथकाने दाणीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे साक्षांकन
नाशिक / प्रतिनिधी

महाविद्यालयीन प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्रे साक्षांकित करून देण्याची मोहीम नाशिक जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे के. टी. एच. एम. महाविद्यालयात सुरू करण्यात आली आहे. मोहीमेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत नऊशेहून अधिक विद्यार्थ्यांनी दस्ताऐवज साक्षांकित केले आहेत. याशिवाय पक्ष सभासद मोहीमेत ५२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्हा अध्यक्ष सचिन पिंगळे, तालुका अध्यक्ष शरद आढाव, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के यांनी या मोहीमेचे आयोजन केले होते. या मोहीमेत पश्चिम विभाग अध्यक्ष अनिल चौघुले, नगरसेवक मनोहर बोराडे, डॉ. जगन्नाथ तांदळे, प्रतिभा पवार यांच्यासह पक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. हा उपक्रम सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या दरम्यान शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सुरू राहील, अशी माहिती पिंगळे यांनी दिली.

उद्योगपती नंदलाल केला यांचे निधन
नाशिकरोड / वार्ताहर

येथील प्रसिद्ध उद्योगपती तथा हॉटेल नटराजचे व्यवस्थापकीय संचालक नंदलाल हिरालाल केला यांचे ८० व्या वर्षी निधन झाले. शहराच्या सामाजिक, आर्थिक क्षेत्रात त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. के. एन. केला हायस्कूल व नाशिक माहेश्वरी समाजात त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे. सिन्नर औद्योगिक वसाहत सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुलगे, नातवंडे असा परिवार आहे.

नाशिकमध्ये ‘ॠतुरंग’तर्फे स्पर्धेतील लघुपटांचा महोत्सव
नाशिक, १८ जून / प्रतिनिधी
येथील ॠतुरंग परिवारतर्फे आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेतील सर्व लघुपटांचा विशेष महोत्सव २० जून रोजी होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. सायंकाळी सहा वाजता उंटवाडीरोडवरील इन्स्टिटय़ुट ऑफ इंजिनिअर्सच्या अशोका व्हच्र्यु सभागृहात हे लघुपट दाखविले जाणार आहेत. जिल्ह्य़ातील कलावंतांना व्यासपीठ मिळावे या हेतुने ॠतुरंग परिवारच्या वतीने लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा हौशी व व्यावसायिकांसाठी खुली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून शासकीय, निमशासकीय कर्मचारी, व्यावसायिक तसेच महिलाही या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. स्पर्धेसाठी विषयाचे बंधन नसल्यामुळे रसिकांना विविधांगी विषयांच्या लघुपटांचा आस्वाद या महोत्सवानिमित्त घेता येणार आहे. सर्व स्पर्धकांनी व रसिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.