Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

अक्कलपाडा प्रकल्पाच्या मुद्द्यावरून रोहिदास पाटील पुन्हा सक्रिय
वार्ताहर / धुळे

राजकीय विरोधकांकडून आपल्याबद्दल कितीही काथ्याकूट सुरू असला तरी आता निम्न पांझरा अर्थात अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाकडे लक्ष केंद्रीत करून तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्धार माजी मंत्री आ. रोहिदास पाटील यांनी व्यक्त केला असून साक्री तालुक्यातील प्रकल्पस्थळी प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींनी घेऊन जात त्यांनी कामाच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. धुळे लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळाले नाही आणि गेल्या पाच-सहा वर्षापासून पक्षाने काहीसे बाजूला टाकले असले तरी काँग्रेसची साथ न सोडलेल्या रोहिदास पाटील यांची दूरदृष्टी जिल्ह्य़ातील काँग्रेस-राष्ट्रवादीसह त्यांच्या विरोधकांनाही ठाऊक आहे.

नांदगावमध्ये वीज भारनियमनात वाढच!
वार्ताहर / नांदगाव

राज्याला अतिरिक्त वीज उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागात एक तासाने तर शहरी भागात १५ मिनिटे भारनियमन कमी करण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली होती. त्यामुळे भारनियमन कमी होण्याची आशा नांदगावकरांना वाटत असतानाच भारनियमन अध्र्या तासाने वाढल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

हरसूल रुग्णालयाचे काम तीन वर्षापासून ‘जैसे थे’
वार्ताहर / हरसूल

आदिवासी दुर्गम, अतिदुर्गम भागात आरोग्य सुविधा पुरविण्याचे शासनाचे धोरण असताना परिसरातील ५८ गावांसाठी असलेल्या हरसूल रुग्णालयाचे काम तीन वर्षापासून रखडले आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वारंवार निवेदन देऊनही संबंधितांनी कोणतीच दखल घेतली नसल्याचे उघड झाले आहे.

रिपाइं ग्रामीण जिल्हा बैठक
मनमाड / वार्ताहर

नाशिक जिल्ह्य़ात रिपाइं विधानसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढविणार असल्याची माहिती ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांनी पत्रकाद्वारे दिली. लोकसभा निवडणुकीत रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा दोन्ही काँग्रेसने पराभव केला. तसेच सर्व दलित नेत्यांचाही पराभव केला. याचाच अर्थ सर्वच पक्षांना रिपाइंचे वावडे असून ते फक्त वापरण्याचे साधन झाले आहे. सदर पक्षांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. विधानसभेच्या निवडणुका या स्वबळावर लढविण्यात येणार असून सर्व जिल्हा कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या स्वबळावर लढण्याची भूमिका व नियोजनाच्या हेतुने ग्रामीण जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुका पदाधिकाऱ्यांनी बैठकीचे आयोजन करावे, असे आवाहनही आहिरे यांनी केले आहे.