Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

धेंपो समूहाची मायनिंग उद्योगातून ‘एक्झिट’
गोव्याच्या भूमीत रुजलेल्या धेंपो उद्योगसमूहाने आपला प्रमुख व्यवसाय असलेल्या मायनिंग मधून अखेर ‘एक्झिट’ केले आहे. त्यांच्या या ‘एक्झिट’मुळे अनेकांना आश्चर्य वाटेलही. परंतु भविष्याचा विचार करता त्यांची ही ‘एक्झिट’ योग्य वेळीच होती असे म्हणावे लागेल. अग्रवाल उद्योगसमूहाची या उद्योगातील कंपनी सेसा गोवाने सर्व रोखीत केलेल्या व्यवहारात १७५० कोटी रुपयांना धेंपो समूहाचा मायनिंग विभाग खरेदी केला आहे. सेसा गोवा ही दोन वर्षांपूर्वीच आपल्या ताब्यात घेतलेल्या अग्रवाल समूहाने आपला मायनिंग उद्योगात झपाटय़ाने विस्तार करण्याचे धोरण जाहीर केले होते.

जनआंदोलनांचा अन्वयार्थ
नाशिक हे खरं तर सोशिकांचं शहर. पण, गत पंधरवडय़ात याच नाशकात सर्वसामान्यांनी पुढाकार घेत संपूर्ण राज्यापुढे दोन उदाहरणे घालून दिली. पैकी पहिल्या घटनेत ठेवीदार बचाव समितीने पहिलेच राज्यस्तरीय अधिवेशन बोलावून डबघाईस आलेल्या सहकारी बँका-पतपेढय़ांमध्ये अडकून पडलेल्या सर्वसामान्यांच्या ठेवी मोकळ्या करण्याबाबत संघर्षांचे रणशिंग फुंकले तर दुसऱ्या घटनेत पोलीस आयुक्तांच्या बदलीविरोधात लोक थेट रस्त्यावर उतरले. परिणामी, आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांच्या बदलीला स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर आली. या दोन्हीचा परस्परांशी तसा थेट संबंध नसला तरी सामान्यजनांचा त्यातील पुढाकार आणि लक्षणीय सहभाग या बाबी निश्चितच दिलासादायक म्हणाव्या लागतील.

पाणिनि, ‘ते’ आणि आपण!
पाकिस्तान, अफगाणिस्तानातील वाढत्या दहशतवादाबाबत अमेरिकेचा कठोर पवित्रा आणि भारत-अमेरिकेतील वाढती मैत्री यामुळे पाकिस्तानातील भारतविरोधी प्रसिद्धी माध्यमे सक्रीय झाली आहेत. मुळात सहा दशकापूर्वी जो भाग भारतीय संस्कृतीच्याच छत्राखाली होता तेथून या संस्कृतीच्या सर्व खाणाखुणा पुसण्यास सर्वप्रथम अग्रक्रम दिला गेला होता. पाकिस्तानातील शालेय शिक्षणात तर गोंधळाचीच स्थिती होती. शाळेत इतिहास शिकवायचा तर त्याची सुरुवात आणि मांडणी कुठून करायची, भारतीय स्वातंत्र्य लढय़ाचा इतिहास कसा लिहायचा, मोहंजदडोसारख्या खुणा कशा पुसायचा, असा प्रश्न होता. शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्यातील भारतीय संस्कृती गाडण्याची केविलवाणी धडपडही कशी झाली, हे आपण मागे एकदा पाहिले होते. गेल्या काही वर्षांत परिस्थिती बरीचशी पालटली असली तरी आता एक नवाच चमत्कारिक युक्तिवाद सुरू होत आहे. हा युक्तिवाद म्हणजे संस्कृत भाषेचे व्याकरण तयार करणारा पाणिनी आताच्या वायव्य सरहद्द प्रांतातील पेशावरलगत जन्मलेला त्यामुळे तो पाकिस्तानचा की भारताचा, आयुर्वेदातील चरकसंहिता लिहिणारा चरक हा आताच्या मुल्तानजवळचा त्यामुळे तो पाकिस्तानचा की भारताचा, जगातले पहिले अर्थशास्त्र मांडणारा आणि चंद्रगुप्ताच्या द्वारे राजकीय क्रांती घडविणारा कौटिल्य हा तक्षशीलेचा म्हणजे सध्याच्या पाकिस्तानातलाच, त्यामुळे तो पाकिस्तानचा की भारताचा, योगसूत्रे मांडणारे पातंजली ऋषीही मुल्तानचे. त्यामुळे ते पाकिस्तानचे की भारताचे? हा नवा सूर चमत्कारिक आहे तसेच हास्यास्पदही आहे. ‘पाकट्रिब्युन’ दैनिकाच्या २० मे रोजीच्या अंकात मुजफ्फर गफर यांनी लिहिलेल्या लेखात हा युक्तिवाद विस्ताराने आला आहे. लेखाचा बहुतांश भाग पाकिस्तानच्या अस्थिरतेत भारताचा कसा वाटा आहे, याचा दावा करण्यात खर्च झाला आहे तर शेवटी भारताच्या अनेक हेतूंपैकी ‘सांस्कृतिक गंडा’चा हेतू कसा आहे, हे सांगताना या जन्मस्थानांच्या कुंडल्या देण्यात आल्या आहेत! भारतीयांना ज्या गोष्टींचा अभिमान आहे आणि जग ज्या गोष्टींना भारतीयांची मक्तेदारी मानते त्या गोष्टी मुळात पाकिस्तानच्या भूमीत घडलेल्या आहेत, असा हास्यास्पद दावा गफर करतात. अर्थात पाणिनी जर आमचा म्हणता तर मग त्याचे संस्कृत शिकवणार काय, पतंजली आमचा आहे मग त्याचा योगविचारही आत्मसात करणार काय, चरक आमचा तर मग त्याच्या आयुर्वेदाला वाव देणार काय, हे प्रश्न पाकिस्तानी विचारवंतांना विचारण्यात अर्थ नाही. भारतावर टीका करण्याच्या नादात सांस्कृतिक गोंधळ कसा उडू शकतो, याचा हा लेख म्हणजे उत्तम नमुना आहे. असे असले तरी पाकिस्तानच्या भूमीत असलेल्या व प्राचीन भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचे घटक असलेल्या स्थानांचे पर्यटनदृष्टय़ा महत्त्व पाकिस्तानला उमगू लागले आहे, हेदेखील खरे. मोहंजोदडोतील मानवी संस्कृतीच्या खुणांवर त्यादृष्टीने प्रकाशझोत टाकला जात आहे. काही ऐतिहासिक मंदिरांचे जतनही केले जात आहे.
उमेश करंदीकर
umeshkaran9@gmail.com