Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ‘स्वाईन फ्लू’साठी स्वतंत्र वॉर्ड!
पुणे, १८ जून / प्रतिनिधी

 

‘स्वाईन फ्लय़ू’च्या संशयित रुग्णांच्या संख्येत चांगलीच भर पडत असल्याने आरोग्य विभागाने आता राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड (आयसोलेशन वॉर्ड) तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संशयित रुग्णांवर त्या त्या जिल्ह्य़ातील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येतील. दरम्यान, पुण्यात आणखी दोन ‘स्वाईन फ्लय़ू’ च्या रुग्णांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच काल दाखल झालेल्या चार रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
स्वाईन फ्लय़ूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्याने याबाबत आरोग्य विभागाने गांभीर्याने पावले उचलली असून त्यासाठी पावले उचलली आहेत. दरम्यान, ताप, जुलाब, खोकला यासारखी स्वाईन फ्लय़ूची लक्षणे जाणवत असलेले अनेकजण नायडू संसर्ग रुग्णालयास संपर्क करीत असून ‘आम्ही रुग्णालयात दाखल होऊ का?’ अशी विचारणा करीत आहेत. मात्र स्वाईन फ्लय़ूचे संशयित रुग्ण कोण याची व्याख्या ठरविण्यात आली असून स्वाईन फ्लय़ूचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून प्रवास करून आल्यानंतर सात दिवसांमध्ये लक्षणे आढळलली असतील तर ती व्यक्ती रुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल होऊ शकते. मात्र सात दिवसांपेक्षा अधिक काळ लोटल्यानंतर केवळ थोडासा त्रास होत असल्याने दाखल होण्यास इच्छुक असलेल्यांना रुग्णालयात दाखल करून घेता येत नाही. किंबहुना खासगी डॉक्टरांकडे उपचार घेऊन त्यानंतर पुन्हा नायडू रुग्णालयात दाखल होण्यास इच्छुक असणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. त्यामुळे विनाकारण या आजाराचे गांभीर्य वाढत आहे, असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
याच पाश्र्वभूमीवर आरोग्य विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, ‘‘ स्वाईन फ्लय़ूच्या संशयित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात एक स्वतंत्र वॉर्ड (आयसोलेशन वॉर्ड) तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बहुतांश जिल्ह्य़ात अशा प्रकारचे वॉर्ड तयार करण्यात आले असून तेथील वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पुणे आणि अन्य शहरातील संशयित रुग्णांची संख्या ही ३२ च्या घरात गेली असून पुण्यातील रुग्णांची संख्या अधिक आहे. ३२ जणांच्या पाठविलेल्या चाचण्यांचे अहवालापैकी २७ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. पाच रुग्णांचे अहवाल येणे अपेक्षित आहेत.’’

आणखी दोनजण दाखल
काल चार दाखल झालेल्या रुग्णांचे राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. मात्र काल उशिरा आणि आज सकाळी असे आणखी दोन संशयित नायडू संसर्ग रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज दाखल झालेला एक रुग्ण पॅरिसहून मुंबई असा प्रवास करून आलेला आहे. त्याला त्रास होत असल्याने आज रुग्णालयात दाखल करण्यात झाले. या दोघांच्या रक्ताच्या नमुन्यासह विविध चाचण्या घेण्यात आल्या असून त्यांचे अहवाल येणे अपेक्षित आहेत, अशी माहिती सहायक संचालक डॉ. कल्याण देशपांडे यांनी दिली.