Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नव्या गाडय़ांची खरेदी पीएमपीच्या नावानेच करण्याचे आदेश
पुणे, १८ जून/ प्रतिनिधी

 

केंद्र सरकारच्या नेहरू योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून पीएमपीने नव्या गाडय़ांची खरेदी खासगी वाहतूकदारांच्या नावाने न करता नव्या गाडय़ा स्वत:च्या नावानेच खरेदी कराव्यात, असा स्पष्ट आदेश मुंबईत झालेल्या बैठकीत आज पीएमपी प्रशासनाला शासनातर्फे देण्यात आला.
पीएमपीने सुरू केलेली गाडय़ा खरेदीची प्रक्रिया वादग्रस्त ठरलेली असतानाच आज मंत्रालयात या बाबत बैठक बोलावण्यात आली होती. नगर विकास खात्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी ही बैठक बोलावली होती. विभागीय आयुक्त दिलीप बंड, महापालिका आयुक्त महेश झगडे, पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नितीन खाडे यांची प्रमुख उपस्थिती या वेळी होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू योजनेतून मिळणाऱ्या अनुदानातून गाडय़ांची जी खरेदी होणार असेल, ती सर्व पीएमपीच्या नावानेच करावी लागेल, असे या बैठकीत श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. पीएमपीला नव्या गाडय़ा खासगी वाहतूकदारांच्या नावाने घेता येणार नाहीत. नेहरू योजना निधीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच ही खरेदी झाली पाहिजे, असेही श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे.
‘आतातरी हस्तक्षेप थांबवा’
पीएमपी ही स्वतंत्र कंपनी असताना राज्य शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी खरेदी प्रक्रियेत केलेला हस्तक्षेप आतातरी थांबवावा आणि कंपनीला गाडय़ा खरेदीची प्रक्रिया स्वत:च्या अधिकारात करू द्यावी, असे आवाहन भाजपाचे प्रवक्ते, नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले. पीएमपी प्रशासनानेही आता गाडय़ांची खरेदी प्रक्रिया तातडीने सुरू करून पुणेकरांना चांगली प्रवासी सेवा द्यावी, असे ते म्हणाले.
पीएमपीने नेहरू योजनेअंतर्गत सुरू केलेली २०० वातानुकूलित गाडय़ांच्या खरेदीची प्रक्रिया सध्या वादग्रस्त ठरली असून या गाडय़ा खासगी वाहतूकदारांनी स्वत:च्या नावावर घ्याव्यात व या खरेदीसाठी पीएमपीने अर्थसहाय्य करावे असे आदेश विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी पीएमपीला दिले होते. वाहतूकदाराने या गाडय़ा नऊ वर्षांसाठी पीएमपीच्या नावाने गहाण ठेवाव्यात व त्यानंतर त्यांची मालकी वाहतूकदाराकडे सोपवावी, असा बंड यांचा प्रस्ताव आहे.
पीएमपीने नवीन गाडय़ांच्या खरेदीसाठी पत्र दिले असेल, तर ते पत्र मागे घेण्यात यावे व नवीन गाडय़ांची खरेदी पीएमपीने करू नये. ही खरेदी खासगी वाहतूकदारांच्या सहभागातूनच करावी, असेही बंड यांनी स्पष्ट केले होते. या बरोबरच शहरातील १६ मार्गाचे खासगीकरण करण्याचीही प्रक्रिया सुरू करण्याबाबत बंड यांनी आदेश दिले होते.