Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

चिंचवड स्टेशन चौकात भर दिवसा तरुणाचा भोसकून खून
पिंपरी, १८ जून / प्रतिनिधी

 

चिंचवड स्टेशन येथील शिवाजी चौकात आज भर दुपारी पावणेतीनच्या सुमारास तरुणाचा पूर्व वैमनस्यातून भोसकून खून करण्यात आला. पिंपरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल भगवान पवार (वय १९, रा. पंचशील हॉटेलमागे, इंदिरानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील भगवान चंदन पवार (वय ४५) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अरुण लक्ष्मण मोरे, विलास माणिक मोरे, दत्ता माणिक मोरे, लहू विष्णू शिंदे, साळुंखे, अनिल दत्तू साळुंखे, हिरामण नागू पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अनिलच्या गाडीचा १६ तारखेला अरुण याच्या पत्नीला धक्का लागला होता. यावरुन पोलिसांत अदखलपात्र तक्रार देण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी शोध घेतला असता तो सापडला नाही. आज दुपारी अनिल चिंचवडच्या शिवाजी चौकात चौघा मित्रांसमवेत सरबत पिण्यासाठी गेला होता. तेथून परतत असताना चौकाच्या सर्कलमध्ये अनिलला अडवून तलवार व सुऱ्याने भोसकण्यात आले. तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्यावर कुणाल प्लाझा इमारतीच्या समोर वार करुन जखमी करण्यात आले. त्याला मित्रांनी तातडीने चिंचवड येथील निरामय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपींनी घटनास्थळी तलवार टाकून एका रिक्षातून पळ काढला. हाकेच्या अंतरावर असलेले पिंपरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी तालुक्याबाहेर गेले होते. अनिल पवार याच्याकडे बांधकामाचा ठेका मिळविण्यासाठी लागणारा परवाना होता. त्याची मागणी हिरामण पवार वारंवार करत होता. मात्र, तो न दिल्याने हा खून करण्यात आला असावा ,अशी शक्यता नातेवाईकांनी उपायुक्त डॉ. पाटील यांच्याकडे व्यक्त केली.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील, सहायक पोलीस आयुक्त प्रभाकर पाटील, निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद उगले, पिंपरी गुन्हे विभागाचे निरीक्षक नंदकुमार िपजण, निगडीचे राजेंद्र कुंटे, युनिट तीनचे अनिल कदम, भोसरीचे सर्जेराव गायकवाड, चिंचवडचे राजेंद्र सावंत आदी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत आरोपींना शोधण्याचे काम सुरु होते. हिरामण साळुंखे याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी त्यांच्या मूळ गावी पळून गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.