Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शहरात रविवारपासून वीस टक्के पाणीकपात
महापालिकेला पत्र रवाना
पुणे, १८ जून / खास प्रतिनिधी

 

दीर्घकाळ लांबलेला पाऊस आणि धरणांतील झपाटय़ाने कमी होणारा पाणीसाठा यामुळे पुणे शहराच्या पाणीपुरवठय़ात रविवारपासून (दि. २१) वीस टक्के कपात करण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला आहे. पाणीकपातीबाबतचे पत्र पाटबंधारे खात्याने महापालिकेला दिले असून उद्या, शुक्रवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
खडकवासला धरणाच्या मुठा उजवा कालव्यातून शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी पाटबंधारे खात्याने पंधरा दिवसांपूर्वीच बंद केले आहे. हे पाणी बंद केल्यानंतर फक्त शहरासाठी कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. मात्र यातून पुरेसे पाणी उचलले जात नसल्याने पुणेकरांना यापूर्वीच पाणीकपातीला सामोरे जावे लागले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात ४.५ टक्के म्हणजे १.१४ अब्जघनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याचकाळात धरणांत ९ टक्के म्हणजे २.२४ टीएमसी एवढे पाणी होते. गतवर्षी १५ जूनपासूनच धरणांत पावसाचे पाणी येण्यास सुरूवात झाली होती. यंदा मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणांत कमी पाणीसाठा आणि पावसाची शाश्वती नाही अशी परिस्थिती आहे. मान्सूनचे यंदा वेळेवर आगमन झाले असले तरी बंगालच्या उपसागरात आलेल्या ऐला चक्रीवादळामुळे त्याची आगेकूच थांबली आहे. मान्सून गेल्या काही दिवसांपासून कोकणातच थबकला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारीपासून (दि. २०) पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. तथापि, पावसाला सुरूवात झाल्यानंतर धरणांत पाणी येण्यास लागणारा वेळ आणि पाणीसाठय़ाची परिस्थिती लक्षात घेता, येत्या रविवारपासून (दि. २१) शहराच्या पाणीपुरवठय़ात वीस टक्के कपात करण्याचा प्रस्ताव पाटबंधारे खात्याने तयार केला आहे. तसे पत्रही महापालिकेला दिले असल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय घोगरे यांनी सांगितले. शहराला वर्षांकाठी सुमारे १२ टीएमसी पाणी लागते. धरणात १.४ टीएमसी म्हणजे जुलैच्या पंधरवडय़ापर्यंत पुरेल एवढे पाणी शिल्लक आहे. परंतु पाऊस लांबल्यास पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पाणीकपातीची पावले उचलण्यात आली आहेत.