Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वैष्णवांचा धर्म
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।
भेदाभेद भ्रम अमंगळ।।

 

संतांनी ज्या श्रीविठ्ठलाची भक्ती केली तो पंढरीचा पांडुरंग हा मूलत: गोकुळीचा श्रीकृष्ण असून खरा ‘लोकनेता’ आहे. सामान्यांतील असामान्य शक्ती ओळखून, त्यांना संघटित करून अलौकीक कार्य करणारा भगवान श्रीकृष्ण हा ‘पुरुषोत्तम’ आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन गोकुळातल्या सर्व गवळ्यांच्या पोरांना एका प्रेमाच्या धाग्यानं बांधून श्रीकृष्णानं अनेक मनोहारी लीला केल्या. गोवर्धन पर्वताच्या घटनेवेळी त्यानं गोकुळातील सामान्यांच्या संघटनशक्तीचा प्रत्यय देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास जागवला. ‘श्रीविठ्ठल’ हे या समतेचं, एकतेचं, आणि संघटनाचं प्रतीक आहे. त्याचे चरणही ‘समचरण’ आहेत! गरीब, श्रीमंत, उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्त्री-पुरुष असा कोणताच भेद तो मानत नाही. तो फक्त भक्तिप्रेमाचा भुकेलेला आहे. म्हणूनच उच-नीच काही नेणे भगवंत। निष्ठे भाव भक्ती देखोनिया।। असं तुकाराम महाराज आग्रहानं प्रतिपादन करतात. श्री विठ्ठलाचा आदर्श ठेवूनच सर्व संतांनी भक्तीला समाज संघटन शक्तीची जोड देऊन सुसंस्कृत- समाधानी आणि संपन्न समाज घडवण्याचं कार्य केलं.
‘धारयेत् इति धर्म:’ अशी धर्माची व्याख्या केली आहे. समाजव्यवस्था सुरळीत चालून समाजस्वास्थ्य टिकावं आणि मानवी जीवन आनंदी व्हावं यासाठी मूलभूत नीतिमूल्यांवर आधारित आचरणाचे जे नियम अथवा तत्व सांगितली जातात त्याला धर्म असं म्हणतात. गाडीला जर ‘ब्रेक’ नसेल तर ती सुसाट वेगानं जाऊन कोठेतरी आदळेल, त्यानुसार जर माणसाला धर्माच्या आचारबंधनाची चौकट नसेल तर मनुष्यप्राणी ‘पशुतुल्य’ अथवा त्यापेक्षाही भयानक आचरण करू शकतो. म्हणूनच समाजाची धारणा करून त्याला संघटित ठेवणाऱ्या मूलभूत नीतिमूल्यांची जोपासना करणारा ‘भागवत धर्म’ संतांनी सांगितला. अभ्युदय आणि नि:श्रेयस ही धर्माची दोन प्रधान अंग आहेत. अभ्युदय म्हणजे ऐहिक उन्नती आणि नि:श्रेयस म्हणजे पारलौकीक उन्नती. संतांनी आपल्या भागवत धर्मात या दोन्ही तत्वांचा योग्य समन्वय घातला. ऐहिक उन्नतीबरोबरच भक्ती, प्रेम, श्रद्धा, करुणा यांचीही माणसाला नितांत आवश्यकता आहे. नुसता ऐहिक उत्कर्ष हा पैसा-प्रतिष्ठा याचा ‘हव्यास’ निर्माण करतो. त्यातून अतिरेकी स्वार्थ जन्माला येऊन दुसऱ्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर गदा घालतो. संतांनी या समाजमनाचं सखोल चिंतन करून या दोन्ही विचारांची सांगड घातली. भक्ती म्हणजे कर्तव्यशून्यता नव्हे! जगण्यासाठी लागणारं अन्न मिळवण्याचं काम निसर्गातील मुंगीपासून सर्वच जीवांना करावं लागतं. म्हणूनच संतांनीही ‘श्रमप्रतिष्ठा’ या मूल्याला सर्वाधिक किंमत दिली. किंबहुना भागवत धर्मातील सर्वच संत हे प्रापंचिक असून अठरापगड जातीतील विविध उद्योग करणारे होते. ‘हाती काम मुखी नाम’ ही त्यांची जीवनशैली होती. कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी।। म्हणणारे संत सावतामाळी, आम्ही न्हाविक न्हाविक। करू हजामत बारीक।। असे म्हणणारे संत सेना न्हावी, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम। देह प्रपंचाचा दास सुखे करो काम।। म्हणणारे संत गोरा कुंभार, या सर्वच संतांनी आपलं विहित कर्म योग्य प्रकारे करून प्रपंच आणि परमार्थाचा योग्य आदर्श घालून दिला. जगद्गुरू तुकाराम महाराजांनंतर श्री समर्थ रामदासस्वामींनीही प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा योग्य समन्वय घालून समाजातील पुरुषार्थ जागवला. कष्टेविण फळ नाही। कष्टेविण राज्य नाही।। असं सांगून ‘यत्न तो देव जणावा’ हा प्रयत्नवादाचा मंत्र दिला. प्रपंच सांडूनी परमार्थ केला। तरी अन्न मिळेना खायाला।। ही वास्तवता समर्थानी अधोरेखित केली. आधी प्रपंच करावा नेटका। मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका। विवेकी हो।। असं त्यांनी स्पष्ट केले. या सर्वच संतांनी उद्यमशीलतेला महत्त्व देऊन सदाचार आणि नीतिमत्तेच्या पायावर घडवलेल्या आणि ईश्वरभक्तीनं परिपूर्ण झालेल्या शांत, समाधानी, तृप्त मानवी जीवनाचा आदर्श समाजासमोर ठेवला. सुमारे चारशे वर्षे यवनी सत्तेचा अंमल असतानाही संतांनी समाजात भागवत धर्म रुजवण्याचं जे अलौकीक कार्य केले, त्याचा पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात फार मोलाचा वाटा आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांनी संतांचं हे ‘आनंदवन भुवना’च स्वप्न प्रत्यक्षात साकार केलं!
दीपा भंडारे