Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘जंगली महाराज आणि फग्र्युसन महाविद्यालय रस्त्यावरील दुभाजक काढण्याचा निर्णय योग्यच’
पुणे, १८ जून / प्रतिनिधी

 

जंगली महाराज आणि फग्र्युसन महाविद्यालय रस्त्यावर एकेरी वाहतूक योजनेची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यासाठी तेथील दुभाजक काढण्याचा निर्णय हा योग्यच असल्याचा दावा, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी आज केला.
कोणाचीही परवानगी न घेता महापालिका अधिकाऱ्यांनी परस्पर दुभाजकांची तोडफोड केल्यामुळे त्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले होते. त्यानंतर वाहतूक पोलिसांचा कोणताही प्रस्ताव यापुढे स्थायी समितीमार्फतच मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाश्र्र्वभूमीवर वाहतूक उपायुक्त मनोज पाटील यांनी त्यांच्या निर्णयाचे आज जोरदार समर्थन केले.
वाहतूक शाखेतर्फे शहरातील अपघातप्रवण क्षेत्रांचा अभ्यास करून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह आणि सहआयुक्त राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तिकेविषयी माहिती देताना उपायुक्त पाटील बोलत होते. शहरातील रस्ते आणि वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठा वाव असल्याचे पाटील यांनी यावेळी नमूद केले.
पाटील म्हणाले, ‘‘दुभाजक काढण्याचा निर्णय घेण्यामागची भूमिका महापालिकेच्या अधिकाऱ्यांना समजावून सांगण्यासाठी कोणत्याही बैठकीत किंवा स्थायी समितीसमोर जाण्याची आमची तयारी आहे. सुमारे सहा ते सात बैठकांमध्ये याविषयावर चर्चा झाली आहे. स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव आल्यावर संबंधित अधिकाऱ्यांना या योजनेचे महत्त्व आणि दुभाजक काढण्याचा निर्णय योग्य कसा होता याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल.’’
‘‘जंगली महाराज आणि फग्र्युसन रस्त्यावर एकेरी वाहतूक योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी देखील तेथील दुभाजक काढण्याची गरज होती. नाहीतर तेथे अपघात होण्याची शक्यता वाढली असती. पूरम चौकामध्ये एकेरी योजना राबविण्यापूर्वी दुभाजक न काढल्याने अशी परिस्थिती उद्भवली होती, मात्र त्याची तात्काळ दखल घेऊन दुभाजक काढण्यात आले. आता तेथे अपघाताची शक्यता कमी झाली आहे,’’ असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
वाहतूक शाखेतर्फे तयार करण्यात आलेली पुस्तिका स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमे, महापालिका अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आदी संस्थांना देण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांनाही या पुस्तिकेचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.