Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

महापालिकेच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे धाव घेणार
पुणे, १८ जून / प्रतिनिधी

 

जैववैविध्य पार्कचे आरक्षण (बीडीपी) दाखवून शहरातील तीनशे ते चारशे भूखंडधारकांच्या प्रत्येकी तीन ते चार गुंठे जमिनीवर बांधकाम करण्यास महापालिकेने परवानगी नाकारली आहे. नागरी हक्क समितीने याबाबत मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचे ठरविले असून अखेर उपोषण करावे लागेल, असा इशाराही या समितीने दिला आहे.
समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुधीर काका कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी भूखंडाचे मालक डॉ. पी. बी. कुलकर्णी, कॅप्टन दीपकगुहागरकर आदींनीही यावेळी आपली बाजू मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामाच्या नकाशास मंजुरी देऊनही ते भूखंड अद्यापही मोकळेच राहिले आहेत. बीडीपीच्या आरक्षणाबाबत सी- डॅक व मोनार्क संस्थेच्या सव्‍‌र्हेक्षणाप्रमाणे दोघांच्या सव्‍‌र्हेक्षणात विसंगती असल्याने दोन्हींचा फेरविचार करून पालिकेने निर्णय घेऊन मंजुरीस पाठविणे अपेक्षित होते. मात्र पालिकेने प्रारूप विकास आराखडय़ाबाबत साठ दिवसांच्या आत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवलेल्या होत्या. त्याचा विचार न करता केवळ चित्रीकरण, रेकॉर्डिग, टेप करून घेण्याचा फार्स केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
बीडीपी आरक्षण रद्द करून मध्यमवर्गीयांना त्यांच्या मालकीच्या भूखंडावर घरे बांधण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. बीडीपीच्या नावाखाली साठ टक्के अर्थात तीनशे ते चारशे भूखंडधारकांच्या जमिनीवर बांधकामांना परवानगी नाकारण्यात आली आहे. डॉ. पी. बी. कुलकर्णी यांच्या धनकवडी येथील सव्‍‌र्हे क्र. २९/१/२/४/५ या धनकवडी येथील प्लॉट क्रमांक ८ वर बांधकामास परवानगी द्यावी, यासाठी दस्तुरखुद्द राष्ट्रपती डॉ. प्रतिभा पाटील आणि देवीसिंह पाटील यांनी पालिकेकडे शिफारस केली. तरीसुद्धा त्यांना अद्याप याबाबत परवानगी मिळाली नाही. बाणेर, बावधन, हिंगणे खुर्द, धनकवडी भागातील या जमिनीवर बीडीपीखाली आरक्षण ठेवण्यात आले आहे.
यातील अनेक ठिकाणी जमीन मालकांचे भूखंडाच्या चारही बाजूंनी असलेल्या जमिनी विकसित होऊन त्यावर इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र मध्यभागी असणाऱ्या जमिनीवर या मध्यमवर्गीयांनी पैशाअभावी बांधकाम केले नाही. मात्र बांधकामास जेव्हा परवानगी मागितली. त्यावेळी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून ती नाकारण्यात आली, असे सुधीर कुलकर्णी यांनी सांगितले.